पालघर जिल्ह्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी “दुर्गसंवर्धन जागृती वर्ष” जाहीर

पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकोटांचा वारसा, प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारे अवशेष, आरमारी संघर्षाच्या आठवणी जपणारी ठिकाणे, प्राचीन धार्मिक स्थळे इत्यादी सारेच गतवैभवाची साक्ष जपत आहेत. गेली अनेक वर्षे जागृत दुर्गमित्र व दुर्गमित्र संस्था यांच्या माध्यमातून गडकोटांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रमदान मोहीमा आयोजित करण्यात येत असून गडकोटांचे अस्तित्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालघर जिह्यातील ऐतिहासिक स्थळांसोबतच महाराष्ट्रातील शेकडो गडकिल्ल्यांवर दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा, अश्लील छायाचित्रणे, दुर्गसंवर्धनाचा अभाव व दुर्लक्षितपणा इत्यादी प्रश्न कायम आहेत. पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर गेली १६ वर्ष किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत दुर्गसंवर्धन मोहिमा, इतिहास संकलन व अभ्यास सफर मोहिमा सातत्याने सुरू आहेत. सदर गडकोट संवर्धन मोहिमेच्या माध्यमातून गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी शेकडो तरुण वर्ग व प्रामाणिक दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था एकत्र येत आहेत. गडकिल्ल्यांचे अस्तित्व व पावित्र्य कायम राहावे या एकमेव उद्देशाने समस्त दुर्गमित्र संघटनांच्या एकत्रित सहभागाने पालघर जिल्ह्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी यंदाचे २०१९ हे वर्ष “दुर्गसंवर्धन जागृती वर्ष” जाहीर करण्यात येत आहे. किल्ले वसई मोहीम परिवार सदर मोहिमेसाठी पुढाकार घेत असून नुकताच एल्गार आंदोलनात प्रत्यक्षात सहभागी झालेल्या ३५ संघटना या दुर्गसंवर्धन जागृती वर्षे अभियानात सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत हे विशेष. किल्ले वसई मोहीम अंतर्गत याबाबत अधिकृत नोंदणी सुरू करण्यात आलेली असून जिल्ह्यातील विभागवार दुर्गसंवर्धक संस्था आपल्या विभागातील गडकोटांवर आवश्यक असणाऱ्या दुर्गसंवर्धन बाबींचा लेखाजोगा तयार करण्यात दुर्गमित्रांच्या बैठका आयोजित करीत आहेत. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरातत्वीय किंवा शासकीय बाबींवर विसंबून न राहता लोकसहभागातून जिल्ह्यातील गडकोटांचे नियोजनबद्ध संवर्धन व्हावे या एकमेव भावनेने दुर्गमित्र संघटना पुढाकार घेत आहेत. या उपक्रमात दुर्ग इतिहास संकलन, प्रगत मोडी लिपी माध्यम, श्रमदान मोहीम, दुर्ग उत्सव, शिवचरित्र मार्गदर्शन उपक्रम, ऐतिहासिक प्रदर्शन इत्यादींचा समावेश होणार आहे. सदर उपक्रमाची संपूर्ण माहिती किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत दुर्गमित्रांची संयुक्त बैठक घेऊन देण्यात येत आहे.

किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक श्री श्रीदत्त राऊत यांच्या मते “पालघर तसेच महाराष्ट्र प्रांतातील गडकोटांवर संवर्धनासाठी वाढता पुढाकार व इतिहास संकलनाची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन सदर उपक्रमाचा कालावधी, उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!