पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गणेशोत्सवानिमित्त किमान ५ दिवस सुट्टी देण्यात यावी – आमची वसई

वसई : गणेशोत्सव हा भारतीय संस्कृतीचा व स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार असलेला उत्सव आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात गणेशोत्सव सर्वधर्मीयांतर्फे उत्साहाने साजरा केला जातो. वसईतील बौद्ध, ख्रिस्ती व मुस्लिम बांधव तसेच अनेक ख्रिस्ती प्रचारक, फादर, ब्रदर व सिस्टर्स ही गणेशोत्सवात बाप्पाच्या दर्शनासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून जातात. १२६ वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात सर्व समाज एकत्र येतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रमात प्रोत्साहन मिळते.

सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी होतात, नव्या पिढीला ज्येष्ठांचे मार्गदर्शन व माया मिळते. आज विभक्त कुटुंबपद्धतीत नाती दुरावली आहेत , मित्र नातेवाईकांच्या भेटी होत नाहीत. परंतु गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबच नव्हे तर समाजसुद्धा एकत्र येतो. ज्या शाळांमध्ये गणेशोत्सवाची सुट्टी नाही, तिथले विद्यार्थी ह्या आनंदाला मुकत आहेत. विद्यार्थ्यांना कुटुंबात किंवा समाजात प्रत्यक्ष सामील व्हायला वेळ कमी पडत आहे. शैक्षणिक तणाव वाढत चालला असल्याचे शिक्षणक्षेत्रातील तज्ञ व मानसोपचार तज्ञ सातत्याने सांगत आहेत. गणेशोत्सवाची सुट्टी  विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना देखील आवश्यक आहे.
आमची वसईने मागील ३वर्ष आवाहन करित आहे. त्यानुसार बहुतांश शाळा- कॉलेज ने ५-७ दिवस सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. तेव्हा या वर्षीही सर्व विद्यालये व महाविद्यालयांनी गतवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांचा व समाजाचा विचार करत सद्भावनेने व सामाजिक बांधिलकी म्हणून श्री गणेश चतुर्थी, दीड दिवसाचे गणेश विसर्जन, गौरी आगमन व गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी ह्या दिवशी सुट्टी लवकरात लवकर जाहीर करावी. जाणूनबूजून सुट्टी न देता स्वत:वर धर्मांधतेचा शिक्का मारून घेउ नये व सामाजिक वातावरण बिघडवू नये. अशी सूचना आमची वसई या सामाजिक समुहाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: