पालघर जिल्ह्यात महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी लवकरात लवकर करणार – ज्योती ठाकरे

बोईसर (प्रतिनिधी) : आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर व युवराज्ञी येसुबाई महिला उद्योजक संघ बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता शिक्षण प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’सन्मान सोहळा बोईसर (वंजारी हॉल) येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.यावेळी डॉ. लीना वर्तक,वैभवी पाटील,दिपाली पडघण, उज्जवला सूर्यवंशी,स्मिता माळवदे,वृषाली म्हात्रे,चंदना जाधव,सुमन किशोर पाटील, कांचन भालेराव या शैक्षणिक, सामाजिक, शासकीय,वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामान्य ते अतिसामान्य महिलांना ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.महिलांची लक्षणीय उपस्थिती हे या सन्मान सोहळयाचे वैशिष्टय ठरले.

बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्टया स्वावलंबी झाल्याशिवाय त्यांना समाजात अपेक्षित असा मान-सन्मान मिळणे शक्य नाही.त्यासाठी पालघर जिल्ह्यात महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न असून महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक-सामाजिक दृष्टया कमकुवत महिलांसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले.तर महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यावसायिक संधींचा उपयोग,व्यवसाय प्रशिक्षण,व्यवस्थापन आणि विक्री संदर्भात कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास कारेक्रमाच्या अध्यक्षा मा सौ सुनिताताई काटकर कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी,महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे,सक्षम कन्या विकास संस्था अध्यक्षा विद्या गडाख, श्री शांतिनिकेतन फाउंडेशन,मुंबई अध्यक्षा सुनीता काटकर,वसुंधरा फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्षा मनीषा काटकर,सरावली ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मी चांदणे,दलित पँथरचे अध्यक्ष अविश राऊत, ई. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर अध्यक्ष प्रकाश कुऱ्हाडे,युवराज्ञी येसुबाई महिला उद्योजक संघ बोईसर अध्यक्षा उर्मिला काटकर,सौ रुपाली कोळेकर ,सौ विशाका पाटील श्री महेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा गुंजाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!