पालघर जिल्ह्यावर हितेंद्र ठाकूर यांचेच वर्चस्व

पालघर जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचं राहील याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. शिवसेनेने पूर्ण ताकदीने या जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी कंबर कसली होती. जिल्ह्यातील सहापैकी चार जागांवर शिवसेना लढत होती. तर दोन जागांवर भाजपा. भाजपाच्या वाट्याला आलेले डहाणू व विक्रमगड हे त्यांचे परंपरागत मतदारसंघ होते. पास्कल धनारे हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तर विष्णू सवरा हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे या दोन जागा भाजपा सहज जिंकेल असे भाजपाला वाटत होते तर शिवसेनेचे या जिल्ह्यामध्ये अमित घोडा हे एकमेव आमदार होते. त्यांच्या जोडीला बोईसरचे आमदार विलास तरे यांना बहुजन विकास आघाडीमधून शिवसेनेमध्ये घेतले. त्यामुळे शिवसेनेचेही दोन आमदार झाले. हे दोन मतदार संघ व वसई, नालासोपारा हे मतदार संघ भाजपाकडून मागून घेतले. तेथे विजय पाटील व प्रदीप शर्मा हे मातब्बर उमेदवार शिवसेनेने निवडणुकीमध्ये उतरवले. त्यामुळे चारही जागांवर आपण सहज जिंकू व पालघर जिल्ह्यावर भगवा फडकवू, असे शिवसेनेचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न शिवसेना-भाजपाच्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये पुरतेच भंगले.

जे महाराष्ट्रभर झाले तेच पालघर जिल्ह्यामध्येही झाले. ‘मुख्यमंत्री आमचाच’ हे सांगत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी केल्या. आमदारांचा ‘आकडा’ कमी करण्याच्या नादात एकमेकांचे उमेदवार पाडले. त्याचा फटका महाराष्ट्रभर दोन्ही पक्षांना बसला तसाच तो पालघर जिल्ह्यामध्येही बसला. पाडापाडीच्या राजकारणाची सुरुवात भाजपाने केली. बोईसर विधानसभा मतदार संघामधून संतोष जनाठे यांना विलास तरे यांच्या विरोधात बंडखोरी करायला लावून भाजपाची पुर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली. भाजपाचे प्रमुख पदाधिकारीही खुल्लमखुल्ला त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. संतोष जनाठे हेही आपण भाजपा जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवण्यासाठीच निवडणूक लढवत आहोत, असे सांगून प्रचार सभा घेत होते. त्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या विलास तरे यांच्याविरुद्ध केलेले बंड हे उघड झाले होते. बोईसरमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उघड-उघड बंड केले तर वसई – नालासोपारामध्येही आतुन बहुजन विकास आघाडीलाच भाजपा मदत करत होता, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे शिवसेनेनेही आपला करिष्मा दाखवला. शिवसेनेची ताकद असलेल्या विक्रमगड विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाचे डॉ. हेमंत सवरा यांच्या विरोधात काम केले तर डहाणूमध्येही पास्कल धनारे यांच्या विरोधातही काम केले. त्यामुळे भाजपाने शिवसेनेचे तीन तर शिवसेनेने भाजपाचे दोन उमेदवार पाडले. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे एकमेव उमेदवार निवडून आले. ते तर विजयी होणारच होते. पालघर विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथे शिवसेनेशिवाय कुणाचीच ताकद नाही. त्यामुळे भाजपाचे येथे काही चालले नाही तर योगेश नम यांच्या रुपाने दिलेला उमेदवारही खूपच नबळा होता. त्यामुळे ही लढत एकतर्फीच होती. या एका विजयाने जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे अस्तित्व अबाधित राहिले. भाजपाचा मात्र सुफडा साफ झाला. जिल्ह्यातून भाजपा हद्दपार झाली.
भाजपाचा हा एवढा दारुण पराभव का झाला? याची कारणमीमांसा केली तर सहज लक्षात येते की, या पराभवाची बीजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्येच रोवली गेली होती. त्यावेळी भाजपाने आपल्या निवडून आलेल्या खासदारासह ही जागा शिवसेनेला दिल्याचा घाव भाजपा कार्यकर्त्यांच्यावर्मी बसला होता. २०१८ च्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपाचे खासदार स्व. चिंतामण वनगा यांच्या मुलाला अत्यंत चलाखीने शिवसेनेत घेतले व भाजपाला शह देवून निवडणुकीमध्ये उभे केले. त्यावेळी भाजपा स्वबळावर लढली. शिवसेनेला जबरदस्त टक्कर दिली व लोकसभेची जागा जिंकली. त्यामुळे जिल्ह्यावर भाजपाचेच वर्चस्व आहे हे सिद्ध झाले. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने देशभर नको त्या तडजोडी केल्या त्यापैकीच एक तडजोड म्हणजे भाजपाने पालघर लोकसभेची स्वबळावर जिंकलेली जागा शिवसेनेला उमेदवारासकट दिली. त्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र या विरोधाला कुणीही जुमानले नाही. त्याचवेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधातच बंड पुकारले. अगदी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार म्हणून शिवसेनेला मतदान करा असे सांगूनही पदाधिकाऱ्यांनी मतदान केले नाही. त्यांनी राजेंद्र गावित यांच्या विरोधात जाऊन मतदान केले. त्यामुळे विक्रमगड व डहाणू येथे भाजपाचे आमदार असतानाही राजेंद्र गावित हे या दोन्ही विधानसभा मतदार संघामधून मागे पडले. त्यांच्यापेक्षा जास्त मते ही बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती. त्याचवेळी भाजपाने हा नाराजीचा सूर ओळखला असता आणि जिल्ह्यामध्ये चांगली बांधणी करून चांगल्या नेत्याच्या हातात सूत्रं दिली असती तर आज ही वेळ आलीच नसती. भाजपाकडे जिल्ह्यात खंबीर नेतृत्वच नाही. त्यामुळे पक्ष केवळ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर चालत होता. मात्र हे पदाधिकारीही या विधानसभा निवडणुकीमध्ये कमालीचे नाराज होते.
पालघर जिल्ह्यामध्ये भाजपाने त्यांच्या विद्यमान खासदारासह ही जागा शिवसेनेला दिली होती, त्याबदल्यात जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागा भाजपाने घ्यायला हव्या होत्या. विक्रमगड, डहाणू बरोबरच वसई व नालासोपारा या चारही जागांवर भाजपाला दावा करता आला असता. मात्र तो दावा शिवसेनेने केला. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना नालासोपारा मतदार संघामधून पुढे होती, मात्र ती मते त्या मतदार संघातील मतदारांनी नरेंद्र मोदींना दिली होती. शिवसेनेला उगीचच वाटले की आपली ताकद वाढलीय. त्यामुळे शिवसेनेने ती जागा हट्टाने मागून घेतली व प्रदीप शर्मांना नोकरीचा राजीनामा द्यायला लावुन उभे केले. वसईची जागाही विवेक पंडित यांची होती. तीही भाजपाने त्यांच्यासाठी घ्यायला हवी होती. मात्र तीही शिवसेनेला दिली. ज्या जागा निवडूनच येणार नाही त्या जागा शिवसेनेला द्यायला काय हरकत आहे? त्यातच तेथे बहुजन विकास आघाडीचे आमदार निवडून आल्यानंतर आपल्यालाच पाठिंबा देतील आणि शिवसेनेच्या दोन जागा कमी होतील अशी गणितं या दोन्ही मतदार संघामध्ये भाजपाच्या चाणक्यांनी मांडली. हेच गणित त्यांनी बोईसरमध्येही मांडले. बोईसरची जागा शिवसेनेला सोडुन तिथे भाजपाचा बंडखोर उभा करायचा आणि त्याला निवडून आणून शिवसेनेवर मात करायची. म्हणजे भाजपाचे जिल्ह्यात तीन आमदार निवडून येतील व शिवसेनेचा एक आमदार निवडून येईल. बहुजन विकास आघाडीचे निवडून आलेले दोन आमदार आपल्यालाच पाठिंबा देतील अशी गणितं भाजपाने मांडली होती. मात्र ही गणितं भाजपाच्याच अंगलट आली. शिवसेनेचा जिल्ह्यामध्ये एकच आमदार होता. तो त्यांनी टिकवला. भाजपाचे दोन्ही आमदार मात्र पराभूत झाले. विशेष म्हणजे भाजपाच्या जिल्हा अध्यक्षांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विनोद निकोले या नवख्या उमेदवाराने हरवले तर माजी मंत्री विष्णू सवरा यांच्या मुलाला राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांनी कुठलीही मेहनत न करता सहज हरवले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजपाची फार नाचक्की झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार पाडा असे आदेश देणारे चांगलेच तोंडघशी पडले आहेत. त्यांनी जिल्ह्यातून भाजपाला पार हद्दपारच केले आहे. हा पाडापाडीचा खेळ शिवसेनेने भाजपावरच उलटवला आहे. शिवसेनेनेही भाजपाचे उमेदवार पाडा असे आदेश दिले होते, त्यामुळे शिवसेनेने भाजपाचे तर भाजपाने शिवसेनेचे उमेदवार पाडले याचा फायदा हितेंद्र ठाकूर यांना झाला आणि त्यांचे जिल्ह्यावर पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित झाले.
२०१९ ची विधानसभा हितेंद्र ठाकूर यांनी महाआघाडीतूनच लढली. महाआघाडी करताना त्यांनी बहुजन विकास आघाडीकडे आपले बोईसर, वसई व नालासोपारा तिन्ही मतदार संघ ठेवले तर पालघर काँग्रेसला, डहाणू मार्क्सवादीला तर विक्रमगड राष्ट्रवादीला असे तीन मतदारसंघ वाटून दिले. त्यापैकी एकच जागा ते हरले ती म्हणजे पालघरची. तेथे काँग्रेसचे योगेश नम यांचा पराभव झाला. मात्र उर्वरित पाचही विधानसभा मतदार संघ त्यांनी जिंकले आहेत.हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, सुनिल भुसारा व विनोद निकोले असे पाच आमदार त्यांनी निवडून आणले आहेत. सहा पैकी पाच मतदार संघ जिंकून पालघर जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व अबाधित आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. सतत दहशतवादाचा मुद्दा पुढे करून हितेंद्र ठाकूर यांना पराभूत करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेना-भाजपा नेत्यांच्या स्वप्नांचीच धुळधाण हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये हितेंद्र ठाकूर हेच ‘ किंग ‘ आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
– शरद यशवंत पाटील, (पत्रकार, वाडा, जि. पालघर – ८६००००११११)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!