पालघर, रायगड जिल्ह्यातील विकासकामांना मिळणार गती

मुंबई : मुंबई महानगराच्या कक्षा आणखीनच रुंदावल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात आता पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघरच्या वसई तालुक्यालाही एमएमआरड़ीएच्या कक्षेत आणले आहे. तर रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचाही एमएमआरडीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महानगराचा आणखीनच विस्तार झाला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, पेण, खालापूर आणि पालघर जिल्ह्यातील वसई या भागांना एमएमआरडीए क्षेत्रात जोडण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे पालघरमधील वसई ते पेणपर्यंतचा भाग एमएमआरडीएच्या अधिकारकक्षेत येणार आहे. त्यामुळे भागातील विकासकामांना गती मिळणार आहे. विकास कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देण्यात आली.

गेली अनेक वर्षांपासून या भागातील विकासकामे रखडली होती. या विकासकामांना अधिक चालना मिळावी म्हणून मुंबई महानगरचा विस्तार वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. या भागांमधील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका अशा क्षेत्रांमधून जाणारे रस्ते नेमके कोणी करायचे यावर निर्णय होत नव्हते. त्याच प्रमाणे या भागातील विकासकामे कोणी करायची यावरून देखील वाद होत होता. हे लक्षात घेत हे भाग एमएमआरडीए क्षेत्रात आणले गेले तर मुंबई आणि ठाणे या लगतच्या शहरांना लागून अथवा जवळच असलेल्या या भागांचा विकास योग्य पध्दतीने आणि जलदगतीने होण्यासाठी मुंबई महानगरचे क्षेत्र वाढविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

विरार- अलिबाग कॉरिडोर निर्मितीसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. एकूण 14 हजार कोटी रुपये खर्चाचा आणि 16 मार्गिका असलेला हा कॉरिडोर बांधण्याची जबाबजदारी राज्य सरकारने एमएमआरडीएकडेच सोपवलेली आहे. आजच्या या निर्णयामुळे या कॉरिडोरची निर्मिती होत असताना या प्रकल्पाशी संबंधित कामे, तसेच आसपासच्या परिसराचा जलद आणि योग्य दिशने विकास होण्यास आता अधिक चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!