पालिकेच्या जागेवर आर.सी.सी इमारत ; सहाय्यक आयुक्ताला निलंबीत करण्याची मागणी

वसई (वार्ताहर) : महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या इमारतीला पाठीशी गालणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे समन्वयक हरिश्चंद पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

नवाळे-निर्मळ येथील महापालिकेच्या मालकीची जागा प्रभाग समिती ‘इ’ च्या सहाय्यक आयुक्तांनी महासभेची परवानगी न घेता अथवा टेंडर न काढता ऍंथोनी परेरा यांना यांना भाडेपट्टयाने दिली होती. मात्र,परेरा यांनी ही जागा व्हिक्टर डिमेलो या व्यक्तीस हस्तांतर केली. त्यामुळे पालिकेने परेरा यांचा भाडेपट्टा कागदोपत्री रद्द केला. मात्र,सदर जागा आपल्या ताब्यात घेतली नाही, त्यामुळे संधी साधून या जागेवर डिमेलो यांनी अतिक्रमण करून आर.सी.सी इमारत उभी केली. या इमारतीला पालिकेने एम.आर.टी.पीच्या नोटीसीही बजावल्या. मात्र,कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पालिकेच्या जागेवर अशाप्रकारे अनधिकृत इमारत उभी करून तीचा व्यावसायिक वापर करण्यात येत असताना आणि वारंवार तक्रारी केल्या असतानाही सहाय्यक आयुक्त रागेश राठोड यांनी या इमारतीला पाठीशी घातले. त्यामुळे त्यांची कार्यालयात वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होत नाही. फोन केला तर उचलत नाहीत आणि व्हॉट्सऍप मेसेज केला तर वाचून प्रतिसाद देत नाहीत.अशी अवस्था तक्रारदार शिवसेनेचे विधानसभा समन्वयक हरिश्चंद्र पाटील यांची झाली. आपल्याच जागेवरील अतिक्रमण पालिकेचे अधिकारी दुर करीत नाहीत. त्यामुळे या इमारतीला पाठीशी घालणाऱ्या रागेश राठोड यांना त्वरीत निलंबीत करावे अशी मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

तसेच पालिकेची नवाळे येथील जुनी इमारत मोडकळीस आल्यामुळे येथील कार्यालय वाघोली येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे हे कार्यालय डिमेलोने अतिक्रमण करून उभारलेल्या आरसीसी इमारतीत सुरु करावे अशी मागणीही पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: