पालिकेच्या टाकीत ठेकेदाराचे गोदाम !

भाईंदर दि . ३ ( वार्ताहर )  – मीरा भाईंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मौदानातील पडीक  पाण्याच्या टाकीत ठेकेदाराने चक्क गोदाम थाटले आहे. ठेकेदारास अन्य एका संस्थेने देखील बेकायदा बांधकाम करुन पालिकेची वीज व पाणी चोरी चालवली आहे . या शिवाय मद्यपान व जेवणावळी झडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
भाईंदर पश्चिमेला असलेल्या बोस मैदानाच्या एका कोपरयात महापालिकेच्या पाण्याच्या दोन उंच टाक्या आहेत. तर एक टाकी अर्धवट अवस्थेत अनेक वर्षा पासुन पडुन आहे. पालिकेचे ठेकेदार असलेल्या शेखर इलेक्ट्रीकल्स याने सदर अर्धवट टाकी मध्ये चक्क आपले सामान ठेवण्याचे गोदाम थाटले आहे. यात त्याची कामे देखील चालत असल्याचे सुत्रंनी सांगीतले. त्यासाठी टाकीला छोटा दरवाजा केला असुन आत पत्र शेड उभारली आहे. आतील गोदामाला पालिकेच्या मीटर मधुन वीज जोडणी घेतली आहे.
इतकेच नव्हे तर पालिकेची वापरात असलेल्या उंच पाण्याच्या टाकी खाली देखील गोदाम थाटले आहे. तेथे रॅक उभारुन आपले साहित्य ठेकेदाराने ठेवले आहे. येथे ठेकेदाराने लोखंडी जाळ्यांचे कुंपण बांधुन  त्याला स्वतंत्र गेट बसवला आहे.
येथील उंच पाण्याच्या टाकी खालीच अर्धे बांधकाम करुन त्यावर पत्रे लाऊन युनिटी स्पोर्टस् या नावाने चक्क बेकायदा कार्यालय थाटले आहे. याला देखील पालीकेचीच वीज वापरण्यात आली आहे.  या ठिकाणी व्हॉलीबॉलसाठी कांदळवन क्षेत्रत भराव करुन काँक्रिट चे पक्के लहान मैदान केले असुन त्याला लोखंडी जाळ्या व गेटने बंदिस्त केले आहे.  या ठिकाणी मोठमोठे दिवे लावण्यात आले आहेत. त्यासाठी देखील पालिकेचाच वीज पुरवठा वापरण्यात आलाय. या कार्यालयाचे व मैदानाच्या प्रवेशद्वाराची चावी सुध्दा ठेकेदारा कडे व संस्थेच्या लोकां कडे असल्याचे आढळुन आले आहे. बेकायदा पाण्याची टाकी बनवून त्यात मोटार लावली असून त्या द्वारे पालिकेचे पाणी सुद्धा चोरून वापरण्यात येत आहे .
धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी येणारया मंडळी कडुन सर्रास मध्यपान, धुम्रपान केले जाते. पाटर्य़ा व जेवणावळीचे आयोजन येथे केले जाते. मुळात सदर जागा शासनाची आहे. परंतु पालिकेच्या ताब्यातील सदर जागेत ठेकेदार व युनिटी स्पोर्टस संस्थेने कब्जा करुन लोखंडी कुंपण, प्रवेशद्वार, बेकायदा कार्यालय, पाणी व वीजेची चोरी व ओल्या पार्ट सर्रास चालत असताना पालिकेचा पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग व येथील सुरक्षा रक्षक डोळेझाक करत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
बालाजी खतगावकर (आयुक्त) – आपण त्वरीत घटनास्थळाची पाहणी करण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागास दिले आहेत. सबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल.
कृष्णा गुप्ता (सत्यकाम फाऊंडेशन) –  महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या व त्यांच्या ताब्यातील जागेत असे कब्जा करुन ठेकेदार गोदामं तर संस्था कार्यालयं थाटुन वीजचोरी, पाटर्य़ा करत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. पालिका अधिकारयांवर सुध्दा कारवाई झाली पाहिजे.
दुष्यंत भोईर (स्थानिक शिलोत्री व ग्रामस्थ) – आमच्या मीठाराची जागा असुन पालिकेने ती बळकावुन येथील कांदळवन नष्ट करुन बेकायदा कामे केली आहेत.  मैदान भाडय़ाने देऊन स्थानिकांना खेळायला पालिका जागा नाही सांगते. पण ठेकेदार व परप्रांतियांच्या संस्थाना मात्र सर्वकाही फुकट देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!