पालिकेच्या रुग्णालयातील एक्स-रे मशीन पडली आजारी

गरीब रुग्णांना सोसवेना हजारोंचा भुर्दंड

वसई (वार्ताहर) : वसई-विरार महापालिकेच्या नालासोपारातील रुग्णालयाची एक्स-रे मशीन महिनाभरापासून नादुरुस्त झाली असून,आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब रुग्णांना हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

नालासोपारा पुर्वेकडील विजयनगरात महापालिकेने १५ ऑगस्ट २०१५ ला हॉस्पीटल सुरु केले होते. या हॉस्पीटलच्या परिसरात मोरेगांव,नगीनदासपाडा, तुळींज, सर्वोदय वसाहत असे शहरी मात्र, दुर्गम प्रभाग येतात. मोलमजुरी करणारी हजारो कुंटुंबे या ठिकाणी वास्तव्य करून आहेत.त्यापैकी चाळीत राहणाऱ्या अनेक कुटुंबांना उपासमारीलाही सामोरे जावे लागते.त्यातच आजरपण आले तर उसनवार करून औषधोपचार करण्याची पाळी त्यांच्यावर येते.अशा वेळी महापालिकेने हे रुग्णालय सुरु करून त्यांना मोठा दिलासा दिला होता.मात्र,पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हे रुग्णालयच आजारी पडु लागले आहे.

गेल्या महिनाभरापासून या रुग्णालयातील एक्स-रे मशीन बंद पडली आहे.त्यामुळे पंधरा रुपयांचा केसपेपर काढून मोफत उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खाजगी केंद्रात जावे लागत आहे.त्यामुळे हजारो रुपयांचा भुर्दंड त्यांना ऐपत नसतानाही सोसावा लागत आहे. ही बाब नालासोपारा शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष कुमार काकडे आणि वसई-विरार जिल्हा युथ काँग्रेस अध्यक्ष संजय मीना यांच्या निदर्शनास आल्यावर एक्स-रे मशीन ताबडतोब दुरुस्त न केल्यास आरोग्य अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.

तर एक्स-रे मशीन नादुरुस्त असल्याची कबुली देतानाच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल अशी माहिती येथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!