पालिकेने वसई परिसरातील दुकानातील वजनकाटे तपासावेत

वसई (वार्ताहर) :  महानगरपालिकेच्या वसई ‘आय’ प्रभागा अंतर्गत येणाऱ्या पापडी आठवडा बाजार, होळी मार्केट तसेच वसई परिसरातील सर्व दुकानातील वजनकाटयामध्ये छेडछाड करून गिऱ्हाईकांची फसवणूक करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वसईमध्ये विशेषत: मार्केटमध्ये किरकोळ विक्रेते व मोठे व्यापारी यांचा समावेश आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तेव्हाच्या नगरपालिकेने दुकानावर व मार्केटमधील किरकोळ विक्री करणाऱ्या भाजी व फळविक्रेत्यांवर धाडी टाकून गिऱ्हाईकांची फसवणूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. परंतु त्यानंतर अशी कारवाई केल्याचे निदर्शनास आलेले नाही.

तसेच काही किरकोळ दुकानदार मेडिकल स्टोअर्समध्ये एम.आर.पी. पेक्षा अधिक किमतीने वस्तू व औषधे विकत आहेत. कालबाह्य झालेली औषधे अथवा इतर प्रकारच्या बनावट वस्तू विकून गिऱ्हाईकांची फसवणूक केली जात आहे. याकरिता महानगरपालिकेच्या वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधूनमधून छापे टाकून प्रमाणित केलेली वजनमापे तपासणे तसेच कालबाह्य झालेली औषधे, खाण्यायोग्य नसलेली फळे व इतर वस्तू तपासून अशा दुकानदारांवर व फळविक्रेत्यांवर योग्य ती कडक कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!