पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे   

मुंबई, दि. 23 (विशेष प्रतिनिधी) : भाजपवाल्यांनी गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मते घेतली, अजूनही ते वारंवार खोटेच बोलत आहेत. त्यात मी वाटेकरी होणार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मला माफ करणार नाहीत. मी सरकारच्या विरोधात नाही तर जनतेच्या बाजूने आहे. जनतेचे प्रश्न मांडत आहे. सरकार चूकत असेल तर आसूड ओढणारच. आम्ही राजकारण करीत नाही. जनतेच्या मदतीला धावून जातो. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा विश्वास शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
केंद्रातील मोदी सरकार हे भंपक सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. शिवसेनेच्या वतीने मंगळवारी  येथे आयोजित पक्षाच्या
गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे,
खासदार रवि गायकवाड, नेरूळकर, सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, धोंडू पाटील आदी उपस्थित होते.
राज्यात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळ पडला आहे. मुख्यमंत्री पंचांग पाहून
दुष्काळ जाहिर करणार आहेत की काय? पंचांग पाहून काम करणारे सरकार काय कामाचे आहे. मुख्यमंत्र्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही का उपग्रहाद्वारे मॅपिंग करून अहवाल आल्यानंतर दुष्काळ जाहिर करणार म्हणे.
मग तुम्ही कशाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला आहात. उपग्रहालाच
मुख्यमंत्री करून टाका, असा उपरोधिक टोलाही ठाकरे यांनी लगावला.
गेल्या निवडणुकीत खोटे बोलून मोदी सरकार सत्तेवर आले. 27 सभा पंतप्रधानांनी घेतल्या. आज महाराष्ट्रात दुष्काळ आहे. कोठे आहेत पंतप्रधान? दुष्काळात केंद्राचे पथक येणार, समिती नेमणार, अहवाल घेणार असे सांगितले जात आहे. नोटाबंदीच्या वेळी काय समिती नेमली होती का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
निवडणुकीत राम मंदिर, 370 कलम, समान नागरी कायदा, प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख असा आश्वसानाचा पाऊस पाडला गेला. आज मात्र त्याचा विसर पडला आहे. या सरकारचा भंपकपणा सुरु आहे. आम्ही राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला. मंदिरासाठी गोळा केलेल्या विटा कोठे लपवून ठेवल्या हे अगोदर सांगा. 25 नोव्हेंबरला मी त्यांना आठवण करून देण्यासाठी आयोध्येत जाणार आहे, असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!