पूर्वी दिवाळी ही दिवाळीलाच यायची ! – प्रा.सौ नयना रेगे

पूर्वी दिवाळी दिवाळीलाच यायची ! अहो खरंच सांगते. हवं तर नीट आठवून बघा. दिवाळीच्या आधी सर्व शाळांच्या  सहामाही परीक्षा संपलेल्या असायच्या . सुट्टीत दरदिवशी अभ्यास, लेखन करण्यासाठी सायक्लोस्टाईल हातात पडायची. तरीही आम्ही मुले खुश असायचो.  कारण निखळ आनंद व्यक्त करण्याचे ते दिवस असायचे. आपलं घर स्वतःच्या हाताने  स्वच्छ करण्यात कोणाला कमीपणा वाटत नसे. उलट  घरोघरी दारे खिडक्या सफाई चे अभियान चालायचे. 

मग दोन चार दिवसात एका एका घरातून लाडू च्या भाजणीचा दरवळ यायचा. मग शेजारच्या घरी फराळ करण्यासाठी बोलावलं जायचं, रात्र रात्र जागून खूप चविष्ट फराळ बनवला जायचा, आता सारखे हजार जिन्नस तेंव्हा मिळायचेच असं नव्हतं, पण जे काही बनवलं जायचं ते जिभेला गोड लागायचं. शेजारणी एकमेकींना चकल्या खुसखुशीत कशा होतील यांच्या टीप्स द्यायच्या. सर्व फराळ खुप मेहनत घेऊन बनवला जायचा. घरातील स्त्री तिचं पूर्ण कौशल्य पणाला लावायची आणि जेव्हा कौतुकाची दाद मिळायची तेंव्हा सार्थकी लागायचे. दिवसभर इतक्या मोठ्या कुटुंबासाठी राबणारे तिचे हात अगदी  आवडीने सर्व पदार्थ करीत.
मग एके दिवशी बाबा कामावरुन लवकर घरी येऊन सर्वांना कपडे खरेदीसाठी घेऊन जात. अगदी वाढत्या अंगाचे कपडे घेतले जायचे. मुख्य म्हणजे आईवडिलांच्या आवडीचे कपडे आवडीने घातले सुद्धा जायचे. त्या नवीन कपड्यांचा तो एक वेगळा गंध आठवणींच्या कुपीत अजूनही शिल्लक आहे. दिवाळी म्हटली की फटाके आलेच.  पण त्यामध्ये निर्भेळ असा सणांचा शकुन होता. त्यामध्ये इतरांना त्रास देऊन मोठेपणा दाखवण्याची  वृत्ती नव्हती. मध्यमवर्गीय बाबा अगदी मोजकेच फटाके मुलांच्या समाधानासाठी घेत.फटाक्यांच्या खरेदी नंतर त्यांची सर्व भावंडांत वाटणी व्हायची. अगदी छोट्या लवंगी माळेतून काढून पुरवून पुरवून वाजवण्याची मजा वेगळी होती. ते थोडेसे फटाके सुद्धा खूप आनंद देऊन जायचे.
मग एका संध्याकाळी सर्व घराबाहेर कंदील सजायचे. करंजीचा,  षटकोनी, चांदणी आकाश कंदील तर खूपच मोहक असायचे. प्रत्येक घर त्या कंदिलाच्या मंद प्रकाशात सुंदर दिसायचं. कंदिलाच्या जाळीतून सुंदर कवडसे दिसत. त्याकडे एकटक पाहत राहावंसं वाटे. जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे कंदिलच असावा असं वाटू  लागे. किती सुंदर. वर्षभर का लावू नये हा कंदील ? असा भाबडा प्रश्न माझ्या मनाला पडे.
आणि दिवाळीचा तो पहिला दिवस, आदल्या रात्री पासूनच दिवाळीची स्वप्न पडायची.
मला अजूनही आठवते. दिवाळीची रम्य पहाट. बाहेर अजूनही काळोखच असायचा. आम्ही खुप आतुरतेने सकाळची वाट पाहायचो. एरव्ही सकाळी शाळेत जाताना उठायला खूप त्रास. पण त्या सकाळी मात्र आईच्या एका हाकेसरशी उठायचो. बाहेर हवेत नुकताच गारवा आलेला असायचा आणि  मग  अभ्यंगस्नानासाठी उटणे, सुगंधी साबण, गरम पाणी अगदी हवेहवेसे वाटायचं, त्यानंतर नवीन कपडे परिधान करून देवपूजा व्हायची. घरातील सर्वजण देवासमोर हात जोडून उभे राहायचे. घरात धनधान्य, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य दिल्याबद्दल देवाचे आभार मानले जायचे. मग दाराच्या दोन्ही बाजूला दोन पणत्या, सुरेख  रांगोळी असायची. प्रत्येक दारापुढे रांगोळीची जणू एक स्पर्धाच असायची. पण त्यातही इतरांच्या दारासमोर रांगोळी काढतांना, रंग भरत़ाना हेवा, मत्सर किंवा दुजाभाव नसायचा. असायचं ते फक्त कौशल्य आणि डोळ्यांना सुखावणारी कलाकृती.
उद्या पुसून नवीन काढायची हे माहीत असूनही तासनतास बसून काढली जायची.फराळाचा नैवेद्य दाखवून शेजारच्या घरी विणलेल्या रुमालाच्या आवरणाखाली ताटात फराळ भरून दिला जाई.घरातले सर्व एकत्र फराळ करत. तेंव्हा कितीही खाल्ले तरी वजन, डायबिटीस , कोलेस्टेरॉल कसली भिती नव्हती. ह्या गोष्टीचं मला आजही आश्चर्य वाटतं.
घर पाहुण्यांनी भरलेलं असायचं पण कधी काहीच कमी पडत नसे, काका, मामा, मावशी, आत्या, असे जवळचे, लांबचे सर्व नातेवाईक आधी न कळवता किंवा फोन न करता अचानक घरी आले तरी आनंदच वाटत असे. कधी कधी तर आम्ही मुलं पाहुण्यांची वाट पहायचो. तासनतास गप्पा मारणारे नातेवाईक कोणाला जड वाटत नसत.संध्याकाळी प्रत्येक घर प्रकाशाने उजळून निघायचं.  ते चार दिवस गरीब, श्रीमंत अशा सर्वांच्या घरात आनंद भरभरून वाहायचा.
ह्या सर्व गमतीमध्ये अभ्यास पण करावा लागायचा, पण तरीही मन खुश असायचं , दिवाळीच्या अभ्यासाची वही फटाक्यांच्या आवरण चित्रांनी, ज्यावर देवी देवतांची चित्रे असत त्याने  सजायची. तर कधी मिठाईच्या बॉक्स वरील चित्रे लावून वहीचे मुखपृष्ठ लाल निळ्या  जिलेटीन पेपरने घातले जायचे. दिवाळीचे चार दिवस मात्र  गरीब, मध्यम, श्रीमंत सर्वांच्या घरी सारखेच असायचे. कारण सण म्हणजे चंगळ नव्हती, उगीच भंपकपणा नव्हता ,त्यात फक्त साधेपणा होता. सण हा सणालाच साजरा व्हायचा.
आता पूर्वी सारखी दिवाळी दिवाळीत येत नाही. कारण स्वतः पुरत्या मर्यादित असलेल्या घरात घराबाहेरची माणसे तितक्याच आपुलकीने ते घर  स्वच्छ करतील का ? चकली, लाडू, शंकरपाळी तर वर्षभर खाल्ली जाते. त्याचं अप्रूप कधीच निघून गेलंय. आणि नविन कपडे  तर वर्षभर वेळ मिळेल तेंव्हा घेतो.
आजकाल क्रिकेटची मॅच, इतर सण, लग्नसराई ला फटाके काय कधीही फोडतो. आणि तेंव्हा  मात्र त्रासिक मुद्रेने हात कानावर जातात, ते नकोसं वाटू लागतं. आता समोरचा दिवाळीला काय भेट वाटतो, ह्या वर पुढचे संबंध टिकतात.  तेही तकलादूच ठरतात. मेड इन चायना सारखे. आता सणाला माणसंच माणसांना पूर्वी सारखी भेटत नाहीत. मग कसं म्हणावं बऱ दिवाळी आली ?   
     – प्रा. सौ. नयना रेगे
naynarege8jvm@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!