पेरले ते उगवले ! युतीमध्ये ‘इनकमिंग’ जोरात तर काँग्रेस आघाडीत घबराट !! – योगेश वसंत त्रिवेदी

लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी चे वेध लागले आहेत. ‘दिवस सुगीचे सुरु जाहले…….!’ या प्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या सत्ताधारी युतीकडे वळणाऱ्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी मंत्री, विद्यमान अध्यक्ष अशा असंख्य लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्ये आपापल्या जागा सुरक्षित करण्यासाठी प्रारंभ केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील, रणजित सिंह नाईक निंबाळकर, निवेदिता माने, धैर्यशील माने, संजय सदाशिव मंडलिक अशा अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत प्रवेश केला. डॉ. सुजय विखे पाटील, रणजित सिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील माने, संजय मंडलिक युतीच्या माध्यमातून संसदेत पोहोचले.लोकसभेच्या निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांनी युतीमध्ये येत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावले. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतांना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीच्या महत्वाच्या घटकपक्षांत येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढू लागला. तसं पहायला गेलं तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जेमतेमच होती. शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी जेंव्हा मुंबई पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवली तेंव्हा त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते उभे राहिले आणि त्यांनी असे वातावरण निर्माण केले की बास्स, आता तर नवलकर यांचं डिपॉझिट जप्त होणार. परंतु नवलकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जी बांधणी केली होती की त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते कुठच्या कुठे अंतर्धान पावले. नवलकर यांच्या बांधणीचा उपयोग डॉ. दिपक सावंत यांनाही झाला होता. तर सांगायचं तात्पर्य हे की राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत तेवढे प्राबल्य नव्हते. तरीही सचिन अहिर यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळतांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेतृत्व केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला जिवंत ठेवण्याचे काम केले होते.
या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेना नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाने भारावून जात मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. काही दिवसांपूर्वी शहापूर चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनीही एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हजेरी लावत शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती साठी गेले तेंव्हा तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल आणि बबनदादा शिंदे यांनी या दिग्गज नेत्याकडे चक्क पाठ फिरवली. दिलीपराव हे शिवसेना भाजप युतीच्या पहिल्या शिवशाही सरकारमध्ये राज्यमंत्री होते. १९९५ साली ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे वावडे असण्याचे कारण नाही. तसं कुणालाच कुणाचं वावडं नसतं आणि राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रूनसतो की कायमचा मित्र नसतो. अर्थात, राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार विरोध हा केवळ निवडणुकीपुरताच असावा, नंतर सर्वांनी देशासाठी आणि राज्याच्या हितासाठी काम करावे. बबनदादा शिंदे हे आपल्या मुलासाठी भारतीय जनता पक्षात स्थान पक्के करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. काहीही असले तरी आता बबनदादा हातावर घड्याळ बांधून ठेवण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. आणि हेही खरेच आहे की बुडत्या जहाजावर कोण आणि कितीकाळ राहणार ? नाकातोंडात पाणी शिरु लागले की हातपाय मारावेच लागणार आणि आपल्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार हे ओघाने आलेच. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक आणि वडाळ्याचे काँग्रेस पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या मार्गाने वाटचाल सुरु केली आहे. आपल्या मतदारसंघात पोलिस आणि गिरणी कामगारांच्या समस्या जो सोडवील त्यांना आपले समर्थन राहील, अशी स्पष्ट भूमिका कालिदास कोळंबकर यांनी घेतली आहे. नायगाव वडाळा या भागांत स्प्रिंग मिल भागात कोळंबकर यांचे काम आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९० साली कोळंबकर यांना विधानसभेत जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली तेंव्हापासून कोळंबकर हे सातत्याने या भागात निवडून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांच्या साठी मेहनत घेतली त्याची जाणीव राहुल शेवाळे यांच्या बरोबरच स्थानिक शिवसैनिकांनी ठेवायला हवी. ‘गरज सरो अन्…. !’ अशी भूमिका योग्य नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य आणि माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड हे भारतीय जनता पक्षाच्या वैभवात भर घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. शरद पवार यांच्या राजकारणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्याचा विडाच जणू राधाकृष्ण विखे पाटील यांनी उचलला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. २०१४ सालीच बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या समुहात दाखल झाले आहेत. आता मधुकरराव पिचड यांच्या चिरंजीवांच्या माध्यमातून तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आलाय. ‘जे पेराल तेच उगवेल !’ ‘जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर !’ या केवळ उक्ती वा म्हणी नाहीत तर त्या आपल्याला पदोपदी अनुभवायला मिळतात. आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढू लागताच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थयथयाट करु लागले आहेत आणि पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांबद्दल पात्रता नसलेलेही आपापल्या प्रतिक्रिया (गरज नसतांना) देऊ लागलेत.
पण ही सुरुवात कुणी केली ? याचे जनक कोण ? याचा इतिहास जरा या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी उघडून पहावा. पायाखालची वाळू घसरु लागली की हे नेते वैफल्यग्रस्त होतात. शरद पवार हे ज्यांचे मानसपुत्र म्हणवतात त्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांनी शेतकरी कामगार पक्षातून यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते पाटील यांना काँग्रेस पक्षात आणले होते, हे खरे आहे नां ? शरद पवार यांनी कितीवेळा काँग्रेस सोडली ? १९७८ साली वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या शरद पवार यांनी वयाच्या सदतीसाव्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला तो पक्ष फोडूनच नां ? १९९१ साली छगन चंद्रकांत भुजबळ यांच्या सह शिवसेनेचे पंधरा आमदार फोडून काँग्रेस मध्ये आणण्याचे कर्तृत्व कुणाचे ? ‘करावे तसे भरावे’ लागतेच. मी नाही त्यातली असं म्हणून राजकारणात स्वतःला चाणक्य समजणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. अर्थात तशी अपेक्षा कुणी बाळगण्याची गरज नाही, कारण ही मंडळी तसं वागण्याइतपत नैतिकता त्यांच्यात असायला हवी नां ? राजकारणात कुणी भगवे वस्त्र परिधान करून कुणी आलेले नाही. एखादेच योगी आदित्यनाथ किंवा साक्षीमहाराज. पण राजकारणात येऊन केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्याऐवजी राजकारणाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून देशाची आणि पर्यायाने राज्याची सेवा करणे हेच महत्त्वाचे ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या विधानसभेच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन !’ असे सांगतांना मी पुन्हा कशासाठी येईन याचे थोडक्यात पण विस्तृत असे जे विधान केले ते लक्षणीय आणि अनुकरणीय असेच आहे. समाजातील तळागाळातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी या सत्तेचा उपयोग सत्ताधाऱ्यानी करावा. सर्वांना अच्छे दिन दाखविण्यासाठी ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सूत्र अंमलात आणावे, हेच महत्त्वाचे. पक्षांतरावरुन नाकं मुरडणाऱ्यांनी जरा आपल्या अंतर्मनात डोकावून पहावे आणि मग वायफळ बडबड करावी. भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि संयुक्त महाराष्ट्र हा १ मे १९६० साली अस्तित्वात आला तेंव्हापासून वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या/उपभोगणाऱ्यांना आता सत्तेत आलो तर ७५% नोकऱ्या स्थानिकांना देण्याची घोषणा करावी लागते, मग आतापर्यंत काय केलंत ? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करुन मराठी माणसाचा आवाज बुलंद केला आणि सुधीरभाऊ जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ स्थापन करुन पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये ऐंशी टक्के स्थानिक मराठी माणसाला नोकऱ्या उपलब्ध करुन देण्यासाठीचे शिवधनुष्य उचलले, तेंव्हा संकुचित आणि जातीयवादी असा शिक्का मारायला कमी केले नाही. राहुल गांधी यांच्या पासून तर अजित पवार यांच्या पर्यंत वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या/उपभोगलेल्या नेत्यांना सत्ता हातातून जाताच शेतकरी आठवू लागले, कामगार आठवू लागले, महिलांवरील अत्याचार आठवू लागले, अल्पसंख्याक समाजाची जाणीव होऊ लागली, मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाची प्रकर्षांने आठवण झाली. पाण्यातून काढलेला मासा जसा तडफडतो, तशी या माजी सत्ताधाऱ्यांची अवस्था झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याची केलेली घोषणा सुशीलकुमार शिंदे यांनी उचलली आणि सत्तेवर येताच पहिले तीन महिने मोफत वीज दिलेल्यांना भरमसाट बिले पाठवून सामान्यांचे कंबरडे मोडले. आता अजितदादांना ७५% स्थानिकांना नोकऱ्या आठवल्या आहेत. पण राज्यातली जनता सूज्ञ आहे. “लबाडाघरचं आवतण जेवल्यावर खरं !” हे पक्के  लक्षात आहे. आजमितीला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीमध्ये ‘इनकमिंग’ जोरात तर काँग्रेस आघाडी मध्ये घबराट, अशी परिस्थिती आहे. जे पेरले तेच उगवले, हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी पक्के  ध्यानी ठेवावे. ।। जय महाराष्ट्र ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: