
नालासोपारा (प्रतिनीधी) : पोलिसांच्या एकूण कारभारावर नागरिकांकडून खुले भाष्य केले जाते ते व्यासपीठ म्हणजे आपण सुरु केलेल्या मोहल्ला कमिट्या. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी अत्यंत गरजेचा असतो. खरं तर पोलीस हा वर्दितील नागरिक आणि नागरिक हा सुद्धा बिनवर्दिचा पोलीस असतो. आपल्याला हे नाते जपायचे आहे. म्हणून या पुढे प्रत्येक महिन्याला सर्व मोहल्ला कमिटीची बैठक झाली पाहिजे. असे विचार मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे प्रथम आयुक्त सदानंद दाते यांनी येथे बोलताना व्यक्त केले.नालासोपारा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन मोहल्ला कमिट्यांच्या संयुक्त बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

तिवारी काॅलेज सभागृह मदर मेरी हायस्कूल, श्री प्रस्थ नालासोपारा पश्चिम येथे ही बैठक काल संध्याकाळी संपन्न झाली. विभागीय पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, अश्विनी पाटील, नालासोपारा पोलीस निरीक्षक वसंत लब्दे हे मान्यवर या वेळी व्यासपीठावर होते.
आपल्या भाषणात आयुक्त सदानंद दाते पुढे म्हणाले की
पोलीस खात्यावर होणारे भ्रष्टाचार आणि दप्तर दिरंगाईचे
आरोप होतात, त्यावर आपण आपल्या कार्यकाळात प्रत्यक्ष कृतीत बोलू. ३ नवी पोलीस स्टेशन्स आणि चौक्या आपल्या या वसई तालुक्यात होणार आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हे प्रमाण वाढले आणि यावर उपाय म्हणून शासनाने इकडे आयुक्तालय दिले. सुधारणा होत आहे आणि आम्हाला हवे असलेले सहकार्य लाभते आहे. आमच्या उपक्रमात नागरिकांचा सहभाग आम्हाला प्रेरणा देणारा आहे,असेच सहकार्य पुढे ठेवावे असे आवाहन आयुक्त सदानंद दाते यांनी केले. ज्येष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम राबविला जात आहे. धारावीत वकार खान आणि भाऊ कोरडे यांनी दंगल काळात जे काम केले आहे ते अविस्मरणीय आहे. असा जुन्या आठवणींना उजाळा देत दाते यांनी सभेचा निरोप घेतला.

शांतता आणि समृद्धी बरोबरीने नांदत असते. गतिमान विकासाला शांतता हवी असते. पोलिसांचा कारभार त्याला अपवाद नाही. आम्हाला समाजातील शांतताच अपेक्षित आहे. वसई विरार भागात कधी जातीयवादी संघर्ष झाले नाहीत. दंगली झाल्या नाहीत. या भागातील सर्वधर्मीय नागरिकांचे, सर्वपक्षीय नेत्यांचे हे श्रेय आहे. या भागातील हा समंजसपणा अभिनंदनीय आहे. अशा शब्दांत मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आता आयुक्तालय आले आहे आणि नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.आम्हाला नव्या रचने प्रमाणे वाढीव पोलीस अधिकारी मिळाले आहेत जरुर मात्र कर्मचारी संख्या वाढली नाही. किंबहुना म्हणूनच आज पोलीस बळाला सजग नागरिक आणि पोलीस मित्रांचेबळ गरजेचे आहे. मोहल्ला कमिटी बनवतात ती सर्वसमावेशक होईल असे धोरण असावे ही बाब बीट अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावी असेही पाटील यांनी सूचित केले.

या संयुक्त सभेत व.पो.नि.वसंत लब्दे यांनी प्रास्ताविक केले. आवाहनाला प्रतिसाद देत येथील नगरसेवक व उद्योजकांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांचे आभार मानले. प्रथम उपमहापौर सगीर डांगे, प्रभाग समिती सभापती अतुल साळुंखे, किशोर पाटील, नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेवक आब्बास फौजी, समाजसेवक मुजफ्फर घन्सार, वसिम खान, शुभांगी गायकवाड, नरेश जाधव, विवेक पाटील, जितेंद्र पाटील, नितीन पेंढारी, तुस्कानो घोन्सालो, भालचंद्र होलम आणि प्रविण म्हाप्रळकर या मान्यवरांनी या सभेत आपल्या सूचना व तक्रारी मांडल्या. नालासोपारा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, प्रामुख्याने पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर माचेवाल आणि शहर शांतता समिती सदस्य एड.रमाकांत वाघचौडे यांनी या संयुक्त सभेसाठी प्रयत्न केले. सभेला तुळींज, वालीव, माणिकपूर, वसई, पेल्हार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रस्ते वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक गोंदे यांनी वाहतूक कोंडी करण्याऱ्या पार्किंगची समस्या गंभीर असल्याचे मान्य केले. रेल्वे स्टेशन जवळील रहदारीत उभी असलेली वाहने आता आमच्या समोरची मोठी अडचण आहे. महापालिकेच्या वतीने सुद्धा आम्हाला सहकार्य हवे आहे असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन सोपारा इंग्लिश हायस्कूलच्या शिक्षिका आरती वगळ-हातोडे यांनी केले. राष्ट्रगीत गायनाने समारोप झाला.