पोलिसांना सहकार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांनाच पोलिसांनी दिली जमावबंदीची नोटीस !

वसई  (वार्ताहर) : पुणे येथील एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा दंगल पेटली होती. या एल्गार परिषदेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी वसई येथील कार्यक्रमात पुन्हा चिथावरणीखोर वक्तव्य करू नये, यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने 25 डिसेंबर या दिवशी नवघर पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते; मात्र निवेदन देऊन कायदा आणि सुव्यवस्था यांसाठी पोलिसांना सहकार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांनाच जमावबंदीची नोटीस बजावून पोलिसांनी त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला. 28 डिसेंबर या दिवशी येथील हरित वसईच्या पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने वसई येथे घेण्यात येणार्‍या पर्यावरण संवर्धन मेळाव्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून आमदार जिग्नेश मेवाणी यांना निमंत्रित केले होते. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्याकडून 8 हिंदुत्वनिष्ठांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांच्या या उफरट्या कारभाराविषयी स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी राष्ट्र प्रथम चे शिवकुमार पांडे, हिंदू गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील, मातृभूमी प्रतिष्ठानचे श्री. जीतेंद्र हजारे, साईनाथ मित्रमंडळाचे श्री. योगेश सिंग, आपोळे गणेश मंदिराचे श्री. नीलेश खोकाणी, विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. लक्ष्मण सिंग, बजरंगदलाचे श्री. राजेश पल, जय महाकाल ट्रस्टचे श्री. चंद्रशेखर गुप्ता यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, कार्यक्रमात अनधिकृतपणे कोणताही अडथळा निर्माण केल्यास किंवा सर्वसामान्य नागरिकांना आपल्यामुळे कोणताही त्रास झाल्यास तसेच आपणाकडून अथवा आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्य यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असे कोणतेही कृत्य केल्यास, काही अनुचित प्रकार करून कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याच आपण, आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्य यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.’

पर्यावरण संवर्धनक्षेत्रात कोणतेच योगदान नसतांना जिग्नेश मेवाणी यांना निमंत्रण कशासाठी ? हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्‍न

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, वसई येथील पर्यावरणाची स्थिती पहाता, याठिकाणी पर्यावरण संवर्धन मेळावा होणे आवश्यकच आहे यात दुमत नाही; मात्र या मेळाव्याच्या प्रमुख वक्तेपदी जिग्नेश मेवाणी यांना बोलावण्याचे नेमके कारण काय ? मेवाणी यांचा पूर्व इतिहास पहाता त्यांच्या बेलगाम वक्तव्यातून जातीय, धार्मिक आणि प्रांतीय तेढ निर्माण होऊ शकते. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी मेवाणी यांच्यावर ‘एफ्.आय्.आर.’ नोंदवण्यात आली आहे. जिग्नेश मेवाणी यांचे पर्यावरण संवर्धनक्षेत्रात कोणत्याही प्रकारे योगदान नसतांना त्यांना या कार्यक्रमाला बोलवण्यामागे जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू तर नाही ना ? याची कसून अन्वेषण करून तसे आढळल्यास जिग्नेश मेवाणी आणि आयोजक यांना योग्य ती समज देण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!