प्रचंड शक्तीप्रदर्शनात भरले बविआने अर्ज

वसई (वार्ताहर) : पालघर लोकसभेसाठी जबरदस्त शक्तीप्रदर्शन करीत बहुजन विकास आघाडीने आपल्या दोन उमेदवारांचे अर्ज आज दुपारी दाखल केले. मात्र,बविआला पाठींबा देणाऱ्या काँग्रेसच्या शिंगडा यांनीही अर्ज दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी काल सकाळी 11.30 वाजता पंचायत समिती पालघर येथून बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,मा्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,जनता दल,रिपब्लीकन पार्टी ऑफ  इंडिया,शेतकरी कामगार पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय किसान सभा यांची जबरदस्त रॅली निघाली.वसई-विरार, पालघर, बोईसर,डहाणू, मोखाडा,तलासरी,जव्हार येथील पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.तारपा नृत्य,देवी-देवतांची सोंगे रचणारे नृत्य,ढोलताशे आणि घोषणांच्या गजरात हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी आपल्या उमेदवारांचा उत्साह वाढवला.

बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकुर,क्षितीज ठाकुर,विलास तरे, महापौर रुपेश जाधव, माजी महापौर प्रविणा ठाकुर,राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकुर, काँग्रेसचे डॉमणिक डिमेलो,विजय पाटील यांच्यासह जनता दल, आरपीआय, सीपीएम, सीपीआय यांचे पदाधिकारी यावेळी सहभागी झाले होते. दुपारी बविआतर्फे बळीराम जाधव आणि राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर हितेंद्र ठाकुर यांनी बळीराम जाधव यांची उमेदवारी घोषीत केली. निशाणी मात्र अजूनही गुलदस्त्यातच राहिली आहे.

दरम्यान,काँग्रेस पक्षाने बहुजन विकास आघाडीला पाठींबा दिला असतानाही,काँग्रेसचे माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष दामोदर शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा यांनी काँग्रेस पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे. सचिन शिंगडा यांनी यापुर्वी भिवंडीमधून लढत दिली होती. आता पालघरमधून खासदारकी लढवणार आहेत. काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो नाही मिळाला तर आम्ही अपक्ष अर्ज दाखल केलेलाच आहे. अपक्ष लढवू अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सदस्य ऍड.जिमी घोन्सालवीस यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!