प्रत्येक मुलाला मातृभाषा लिहिता वाचता आलीच पाहिजे ! सातव्या महाराष्ट्र गुजराती परिषदेत ठराव मंजूर

मुंबई दि.२० (विशेष प्रतिनिधी) : प्रत्येक मुलाला मातृभाषेत लिहिता वाचता आलेच पाहिजे, ऊर्दू आणि हिंदी साहित्य अकादमी ला जितका निधी देण्यात येतो तितकाच निधी गुजराती साहित्य अकादमीला सरकारने द्यावा, असे गुजरात भाषा आणि गुजराती भाषिकांच्या संदर्भातील महत्वपूर्ण ठराव महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या सातव्या महाराष्ट्र गुजराती परिषदेत मंजूर करण्यात आले.

महामंडळाचे अध्यक्ष हेमराजभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. अंधेरी येथील सात मजली भव्य अशा ‘गुजरात भवन’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील गुजराती समाजाच्या विविध अशा ४६ संघटनांच्या प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग घेतला होता. महाराष्ट्र गुजराती परिषदेच्या खुल्या अधिवेशनात गुजराती भाषिक परिवारात प्रत्येक बालकाला गुजराती भाषा लिहिता वाचता येण्यासाठी परिवारातील आईवडिलांनी मनापासून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी कोणतीही हरकत नाही परंतु घरात प्रत्येक व्यक्ती ने मातृभाषेतच बोलले पाहिजे, आपल्या दैनंदिन व्यवहारात गुजराती भाषेचा वापर/उपयोग प्रकर्षाने करण्यात यावा, याची दक्षता प्रत्येक परिवाराने घेतली तर आणि तरच गुजराती भाषेचा, मातृभाषेचा प्रसार आणि प्रचार होईल. इंग्रजी भाषेचा बाऊ न करता आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा. प्रत्येक गुजराती भाषिक परिवारात किमान एकतरी गुजराती वृत्तपत्र/ गुजराती मासिक वाचण्यासाठी मागवावे, असा ठराव सुध्दा या परिषदेत मंजूर करण्यात आला. घरात प्रत्येक आईवडिलांनी मुलांबरोबर मातृभाषेतच बोलणे आवश्यक आहे, असेही मंजूर करण्यात आलेल्या ठरावात आवर्जून नमूद करण्यात आले आहे.

स्वत:च्या गावात मराठी आणि गुजराती भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुट्टी च्या दिवसांत आयोजित करण्यात यावेत. महाराष्ट्रात जसे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे दरवर्षी २४ ऑॅगस्ट रोजी कवि नर्मद यांच्या जयंतीदिनी विश्व गुजराती भाषा दिवस साजरा करतात यावा, महाराष्ट्र सरकार कडून ज्याप्रमाणे ऊर्दू आणि हिंदी साहित्य अकादमी ला निधी देण्यात येतो, तितक्याच रक्कमेचा निधी महाराष्ट्र गुजराती साहित्य अकादमी ला राज्य सरकारने द्यावा, असाही ठराव या सातव्या महाराष्ट्र गुजराती परिषदेत मंजूर करण्यात आला. छोटया छोटया गावांमध्ये विवाहोत्सुक मुले/मुली यांच्या लग्नाच्या संदर्भात अडचणी निर्माण होतात, त्या सोडविण्यासाठी प्रत्येक गावात वधुवर सुचक मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे, अशा विवाहोत्सुक युवक/युवतींची त्यांच्या विस्तृत माहिती सह यादी तयार करण्यात यावी, प्रत्येक व्यक्ती ने राजकारणात अवश्य सहभागी व्हावे, कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून राजकारणात भाग घेऊन सुदृढ आणि स्वच्छ राजकीय वातावरण तयार करुन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, सक्रीय राजकारणाच्या माध्यमातून समाज, राज्य आणि पर्यायाने देशसेवा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात यावेत, आपापल्या भागात सार्वजनिक श्री गणेशोत्सव, श्री नवरात्रोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, दीपावली असे उत्सव सक्रीय सहभाग घेऊन साजरे करण्यात यावेत, असेही मंजूर करण्यात आलेल्या ठरावात नमूद करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष हेमराजभाई शाह यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!