प्रस्तावित वडोदरा महामार्ग बदलण्याचा घाट ?

बदलापूर ता. 4 (बातमीदार) : मुंबई – वडोदरा – जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग जाहीर झाल्यानंतर आता तो चामटोली गावाच्या हद्दीत बदलण्याचा घाट काही धनदांडगे बिल्डरांना हाताशी धरून प्रशासकीय अधिकारी चालवत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी बाळाराम जाधव यांनी केला आहे. यापूर्वी शासनाने या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून फेरफार देखील चढवले आहेत. त्यामुळे शासनाने आता पुन्हा या रस्त्याच्या बदलीचा घाट घातला तर येथील शेतकरी तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे बाळाराम जाधव यांनी सांगितले.

बदलापूर जवळून जाणार्‍या या महामार्गाला पूर्वीपासूनच शेतकर्‍यांनी विरोध केला होता. मात्र केंद्र शासनाने या शेतकऱ्यांना नवीन भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याचे मान्य केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. मात्र या जमिनी दिल्या नंतर काही धनाड्य बिल्डरांच्या जमिनी आणि ईमारती वाचवण्यासाठी या शेतकऱ्याच्या जमिनीवर नांगर फिरवून रस्ता वळविण्याचा घाट काही अधिकारी घालत आहेत. याबदलाला चामटोली विभागातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे.

जवाहरलाल नेहरू बंदर ते बडोदा हा प्रस्तावित द्रुतगती महामार्ग अंबरनाथ तालुक्यातून जात आहे. त्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील जागा संपादित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यावेळी बदलापूर पालिका क्षेत्रातील एरंजाड आणि सोनिवलीतील 2 लाख 58 हजार चौरस मीटर तर ग्रामीण भागातील दापिवली, आंबेशिव, ढोके, बेंडशिळ आणि खुंटवली या गावांतील 3 लाख 81 हजार चौरस मीटर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. या रस्त्याचा कामासाठी 2011 साली सर्वेक्षण झाले. मात्र 2013 नंतर नव्या भुमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. अखेर नव्या कायद्याचा आधार घेत त्यांना मोबदला जाहिर करण्यात आला आहे. मात्र या मार्गाचे अंतिम परिपत्रक अद्यापही जाहिर करण्यात आलेले नाही. त्यामुळे चामटोली भागातील शेतकरी संभ्रमात आहेत.

चामटोली भागातून जाणाऱ्या या मार्गात काही बड्या बांधकाम व्यावसायिकांचे मोठे प्रकल्प आणि जमिनी जात असल्याने या रस्त्याचा मार्ग अंतिम करण्यात येत नसल्याचा आरोप चामटोली येथील शेतकरी बाळाराम जाधव यांनी केला आहे. धनदांडगे व्यावसायिक हा मार्ग वळवण्य़ासाठी वरिष्ठ कार्यालयांच्या फेऱ्या मारत असून त्यांच्या मागणीवरून या रस्त्याचा मार्ग बदलण्याची शक्यता आहे. ठरलेल्या नियोजनानुसार रस्ता झाल्यास त्याचा फटका अनेक मोठ्या प्रकल्पांना बसेल. तर काही जागाही यात गेल्याने बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम आराखडाही जाहिर केला जात नसल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत. मार्ग बदलल्यास आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनीवर नांगर फिरणार असून आमचे मोठे नुकसान होणार असल्याचे अरूण जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम आराखडा नियोजित प्रस्तावानुसार जाहिर करावा अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

रस्ता जाहीर झाल्यानंतर तो बदलण्यासाठी राजकीय दबावाचा वापर करून हा रस्ता बदलला जाणार असल्यास आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी देखील आपल्या भागातून हा रस्ता नको अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेमुळेही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.  त्यामुळे या महामार्गाचा मार्ग बदलू नये आणि पूर्वी जेथून जात होता तिथूनच प्रस्तावित महामार्ग जावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

चामटोली नजीक सापे गावात कोणतेही गावठाण नसताना या भागात मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांवर अन्याय ना होता हा रस्ता पूर्वीप्रमाणेच करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच रस्ता बदलल्यास गावातील शेतकरी उग्र आंदोलन छेडतील असा इशारा बाळाराम जाधव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!