प्रहर जनशक्ती पक्षाचे रास्ता रोको आंदोलन यशस्वी

विरार (वार्ताहर) : विरार पूर्वेला मुख्य रस्त्यावर तसेच सबवे समोर गेले अनेक वर्षे वाहतूक कोंडी होत असून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 8 मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको आंदोलन करून रस्त्यावर ठिय्या दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वसई तालुक्याच्या वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन प्रहार पक्षाला दिले आहे.

विरार पूर्वेला होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. सबवेच्या समोर श्री. चिंतामणी गणपती मंदिर सबवे समोर ते नवीन रेल्वे पूल, रिलायन्स फ्रेश जवळ परिसरात सकाळ, दुपार,सायंकाळपर्यंत नागरिकांना चालणे मुश्कील झाले आहे. येथे रस्त्यावर रिक्षा स्टॅण्ड आहेत. त्यातच दुचाकी, चारचाकी, मोठे ट्रक यांची रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. सकाळी त्यामुळे आपल्या कामावर जाणा-यांची लोकल सुध्दा चुकते व अनेक लोक कामावर उशिरा पोहोचतात. त्यामुळे नागरिकांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. शाळकरी मुले सुध्दा पायी किंवा बसने उशिराने शाळेत पोहोचतात. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विरार पूर्वेला रस्ता रूंदीकरण करावे, येथे 4सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत अशा विविध मागण्या घेऊन प्रहार पक्षाने रास्ता रोको आंदोलन जाहीर केले होते.

8 मार्च रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयापासून प्रहारचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक, रिक्षा चालक, वाहन चालक असे एकत्र येऊन सगळे घोषणा देत मोर्चाने निघाले. प्रहारचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा घोषणा देत निघाला. विरार पूर्वेला सबवेसमोर प्रतिकात्मक रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर महापालिका मुख्यालयाला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. जोपर्यंत महापालिकेचे अधिकारी खाली येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी घेत पालिका मुख्यालयाच्या बाहेर अर्धा ते पाऊण तास घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यानंतर अखेरीस पालिकेचे उपायुक्त किशोर गवस यांनी खाली येऊन प्रहारच्या मागणीकडे लक्ष देऊन सुरक्षा रक्षक विरार पूर्वेला तैनात करण्यात येतील असे आश्वासन दिले.

या आंदोलनाच्या वेळेस वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कोणत्या उपाययोजना करणार याचे लेखी पत्र दिले व उपस्थित जनतेसमोर माइकवरही आपली बाजू मांडली. विरार पूर्वेकडील मजेठिया नाका, सबवे नाका व विरार पोलिस स्टेशनसमोर असे सकाळी7 ते दुपारी 3 व दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत एकुण 6 वाहतूक कर्मचारी तात्काळ नेमण्यात येत आहेत, असे वाहतूक पोलिस निरिक्षकांनी सांगितले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वॉर्डन पुरविण्यात यावेत अशी मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केली आहे. महापालिकेने फेरीवाल्यांवर तसेच अनधिकृत वाहनतळांवर कारवाई करावी, असे पत्रही वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिले. एकुणच विरार पूर्वेकडील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस नियंत्रण शाखा पूर्ण प्रयत्न करेल, प्रहार जनशक्ती पक्षाने केलेल्या मागण्यांकडे पूर्ण लक्ष देऊन उपाययोजना करेल असे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जर विरार पूर्वेकडील वाहतूक कोंडी सुटली नाही तर पुन्हा मोठे आंदोलन करू व ते आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल, असे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात 500 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे वसई तालुकाध्यक्ष दुशांत पाटील, विराज कोचरेकर , कमलेश सिंग, राजेश भोसले , विवेक ठाकूर ,सचिन सावंत , गणेश सावंत, अफसर अली शेख, जया सावंत, निता देसाई, मीना मखिजा, मीनल धुरी, मानसी नारकर, प्रतिभा कवळी, सीमा शर्मा, ज्योती सेन, तसेच एकत्व मित्र मंडळाचे अध्यक्ष मारुती पेडामकर,योगेश पांढरे,राम राठोड, सुरज कांबळे, स्वप्नील घाडी, चंद्रकांत तेली,संदेश पांढरे, नितीन तरल, राहुल वर्मा, महिला संघटनेतले सुरेखा घाडीगावकर, कल्पना दहरिया, जानवी कीशिरसागर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!