प्राचीन लेण्यांकडे डोळसपणे पाहताना

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक, आर्थिक, भोगोलिक, पाऊलखुणाचा मागोवा घेणारी व संशोधन, आध्यात्म, शिक्षण, वास्तूशास्त्र, कलावैभव यांचा वारसा जपणारी शेकडो लेणी आजही दुर्लक्षित आहेत. या लेण्यांची किमान महाराष्ट्र प्रांतातील संख्या आठशे पर्यंत आहे हे विशेषच. कालौघात व वाढत्या लोकसंख्येच्या लहान मोठ्या प्रभावात या लेण्यांचे अस्तित्व सावरू पाहत आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरी, कान्हेरी, कार्ल, भाजे, पितळखोरे, अगाशिव, अंकाई टंकाई, आंबीवले, आंबेजोगाई, औरंगाबाद, कऱ्हाड, कुडा मांदाड, कोंढाणे, खरोसा, खेड, गारोडी, गोमाशी, घटोत्कच, चांदवड, चांभारलेणी, चौल रेवदंडा, जीवधानी, जोगेश्वरी, टाकळी, ठाणाळे, त्रिंगलवाडी, धाराशिव, पन्हाळे काजी, पाटण, तामकणे, पाटणदेवी, पाताळेश्वर, पाटेश्वर, पांडवलेणी, पातूर अकोला, पुलू सोनाळे, पाले रायगड, पितळखोरे, महाड रायगड, महाकाली मुंबई, पोहोळे, बेडसे पुणे, भामेर धुळे, मंडपेश्वर, मांगी तुंगी, मोहिडा तर्फ हवेली, येरफळ सातारा, लेणवली, लोणाड भिंवंडी, शिउर नाशिक, शिरवळ, विदर्भ, हरिश्चंद्रगड इत्यादी असंख्य लेण्यांनी शेकडो वर्षे शिलालेख, राजमार्ग, व्यापार संदर्भानी इतिहासात महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक लेण्यांची बांधणी व त्यास उपलब्ध असणारा प्रस्थर खडक यानुसार विविधता वाढत जाते. प्राचीन लेण्यांकडे डोळसपणे पाहताना त्यातील शिल्पे, आकृती, देवता, देवतांसोबत असणाऱ्या व्यक्ती, लेण्यांतील पाण्याची व्यवस्था, लेण्यांतील छताचा गिलावा, चित्रे, रंगकाम, मुर्त्यातील शस्त्रे, मुर्त्यामधील भाव, लेण्या खोदण्यासाठी दान दिलेल्या व्यक्तींच्या प्रतिमा, लेण्यांतील पंथ इत्यादी शेकडो विषय अभ्यासकांना खुणावत असतात. सातवाहन काळात उपलब्ध होणारा अक्षयनीवी संदर्भ म्हणजे मोठे व्यापारी व सावकार ह्यांनी आपले धन सुरक्षित ठेवण्यासाठी पतपेढ्यांची स्थापना केली, त्यांना अक्षयनीवी म्हणत. 

लेण्यांतील विविध देवतांची विविधता व त्यांच्या हातातील शस्त्रांतील बदल लक्षात घेणे गरजेचे आहे. उपलब्ध संदर्भात गुप्तकाळात शैव व वैष्णव देवतांना विविध आयुधांनी, शस्त्रांनी मंडित करण्यात येऊ लागले. ह्या आयुधांचे मानवीकरण होऊन त्यांना दैवताच्या पाठशिळेवर स्थान मिळाले. वज्र, दंड, खड्ग, त्रिशूल ही आयुधे पुरुषरुपात तर गदा, धनुष्य व शक्ती इत्यादी आयुधे स्त्री प्रतिमेत दाखवण्यात येतात. लेण्यांतील स्थापत्य घटकांत चैत्य, भद्र, माटप, वितान, विधिका, दीर्घिका, वेदिकापट्टी, स्तुप, स्तंभशीर्ष, हर्मिका इत्यादी शब्द प्रयोगाचे उल्लेख येतात. यात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी दगडात कोरण्यात आलेली अर्धगोलाकार नलिका प्रणाल किंवा पन्हाळ असे संबोधण्यात येते. मंदिराच्या द्वारचौकटीच्या मध्यभागी वर्तुळ किंवा चौकोनात कोरण्यात आलेले इष्ट दैवताचे प्रतिकात्मक छोटे शिल्प ललट बिंब या नावाने ओळखण्यात येते. लेण्यांतील प्राणीमात्रांच्या शिल्पात व कलाकृतीत सर्वांत लक्ष वेधक म्हणजे व्याल प्रतिमा. व्याल हा दोन वेगळ्या पशूंचे मस्तक व शरीर एकत्र करून निर्माण झालेला काल्पनिक प्राणी. हत्तीचे शीर व सिहांचे पाय, पोट व पाठ ही एकत्र करून गजशार्दूल किंवा गजसिंह अशा मिथिक प्राण्यांची शिल्पे लेण्यांच्या द्वार शाखेवर किंवा मंदिराच्या अलंकरणात दिसून येतात. लेण्यांच्या भोगोलिक स्थळांशी जोडलेला व्यापार ही आणखीनच एक महत्वाची व तितकीच व्यापक बाब. प्राचीन काळात व्यापारी व लमाण ह्यांच्या तांड्याना मार्ग दाखविणारे वाटाडे त्यावेळीस सार्थवाह म्हणून ओळखण्यात येत असत. यांस थळनिय्यामक असेही संबोधण्यात येत असे.

क्रमशः

लेखनसीमा. श्री श्रीदत्त राऊत किल्ले वसई मोहीम ९७६४३१६६७८

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!