प्राचीन लेण्यांकडे डोळसपणे पाहताना : भाग २

लेण्यांतील विविध मूर्त्यांचे कुतूहल आजही अभ्यासकांना कायम आहे. उदाहरणार्थ बौद्ध पौराणिक कथेतील यक्ष जोडपे म्हणजे हारीती व पाच्चीक हे होय. पाच्चीक गांधार देशाचा राजा होता. बुद्धाच्या शिकवणुकीमुळे तिच्या स्वभावात बदल होऊन ती अहिंसक व परोपकारी बनली. नंतर ती मुलांचे संगोपन करणारी “शिशुसंरक्षिता” म्हणून मान्यता पावली. बौद्ध लेण्यात हारीती व पाच्चीक मंचकावर बसलेली दाखवतात. हारीतीच्या मांडीवर नेहमी मूल असते. वेरूळ व औरंगाबादच्या लेण्यात या उभयंताची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत.

महाराष्ट्रातील लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे निरनिराळ्या पंथानी, संपद्रायांनी व धर्मांनी त्यांस दिलेला आश्रय वा राजाश्रय होय. या लेण्यांचे धर्मप्रकारानुसार बौद्ध (इसवी सनपूर्व पाचवे ते इसवी सनाचे दुसरे शतक), शैव वैष्णव (हिंदू) इसवी सनाचे पाचवे ते चौदावे शतक, जैन (इसवी सनाचे आठवे शतक ते पंधरावे शतक) असे एकूण तीन प्रकार, कालखंड मानण्यात येतात. प्रदीर्घ परंपराची वाटचाल व धर्माचा विविध कालखंडातील चढउतार लक्षात घेऊन लेण्यांच्या स्थापत्याकडे व त्यातील सुक्ष्म कलाकृतीकडे पाहणे गरजेचे आहे.

भारताच्या चित्रकला, स्थापत्यकला, व्यापार उदीम इत्यादी विषयांचा इतिहास संकलित करण्यासाठी लेण्यांतील चित्रे, कलासृष्टी यांकडे डोळसपणे व चिकित्सक वृत्तीने पाहणे महत्वाचे ठरेल. लेण्यांतील मानवी अलंकाराप्रमाणे निसर्गाचे अलंकार ही एक महत्त्वाची बाब लक्षात येते. लेण्या खोदणाऱ्या कलाकारांनी निसर्ग व मानवी जीवन यांतील बंध एका वेगळ्याच नजरेत टिपण्यासाठी विलक्षण कष्ट घेतलेले दिसतात. यात पानाफुलांच्या वेलबुट्टीचे नक्षीकाम, फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण माला, फुलांच्या उमलत्या पाकळ्या व त्यातील लय, विविध फुलांचे प्रकार इत्यादी शिल्पांकीत रुपकातून व्यक्त केलेले आढळतात. यातच या निसर्गाशी एकरुप झालेले वानर, विविध पक्षी, खारी यांचे एक अनोखे नाते प्रतिबिंबित होते. लेण्यांतील देवता, गण, याप्रमाणेच लेण्यांच्या निर्मितीसाठी दान देणाऱ्या विविध कालखंडातील सर्व पंथीय व्यक्तींच्या मुर्त्या व शिलालेख आपणास तत्कालीन सामाजिक, आर्थिक जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी मदत करतात. विविध प्रांतातील विविध उद्योग व्यवसायात कार्यरत असणारे स्थानिक व्यापारी, सामान्य वर्ग या व्यक्तींचे उल्लेख व त्यांच्या देणग्या अर्पण करण्यामागील भावना, श्रद्धा समाजाच्या एका नव्या अंगांचे विश्लेषण करताना आढळतात. भारतीयांना मूर्तिकला अतिप्राचीन काळापासून माहीत व अवगत होती याचे असंख्य पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. या लेण्यांतील प्रमुख दैवतांची स्थाने व त्यातील पौराणिक धार्मिक कथांचा मागोवा घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. यातील शिल्पांत अत्यंत वेगळेपण सिध्द करणारी शीघ्रकोपी शिव, शिवाचे मंगलमय रूप, रावणानुग्रह, शिवपार्वती विवाह, अर्धनारी नटेश्वर, अंधकासुरवध, त्रिपुरांतक, शिवगण, भैरव, नटराज, लकुलीश, लिंगोध्दव, गंगावतरण, शिव पार्वती सारीपाट खेळ, शिव परिवार, वृषभ, सप्तमातृका, विष्णू, महिषासुर मर्दिनी, ब्रम्हा, गजलक्ष्मी, बुध्द देवता, लक्ष्मी, बोधिसत्व, अवलोकितेश्वर इत्यादी मुर्त्या मागील पौराणिक कथा आख्यायिका संकलित करणे काळाची गरज आहे.

क्रमशः

लेखनसीमा. श्री श्रीदत्त राऊत किल्ले वसई मोहीम ९७६४३१६६७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!