प्रा.दिलीप जगताप यांच्या ३ नाटकांचे तालुक्यात प्रयोग

विरार (प्रतिनिधी) : मराठी हौशी व प्रायोगिक रंगभूमीशी सलग ५ तपे आपले नाते एका विशिष्ट जाणीवेने व निष्ठेने जपणारे प्रा.दिलीप जगताप यांच्या ३ नाटकांचे प्रयोग वसई तालुक्यात दोन ठिकाणी सादर झाले. त्यापैकी २४  डिसेंबरला विरारच्या स्व.प.भाऊसाहेब वर्तक हॉल मध्ये ‘एक तळ गाळात’तर नालासोपाऱ्यात स्व.नाना पाटील रंगायतनात ‘गस्त’ चा प्रयोग झाला. याच ठिकाणी ८ डिसेंबरला ‘ राजदंड’ हे नाटक सादर झाले. एकाच नाटककाराचे ३ नाटयप्रयोग रंगभूमीवर आल्याने या उपक्रमाला   दिलीप जगताप नाटय महोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

विरारचा प्रयोग विलक्षण रंगला. विविधा एक सामाजिक संस्था व महाराष्ट्र सेवा संघ निर्मित येथे एक तळ गाळात या नाटकाचा अप्रतिम प्रयोग स्व.भाऊसाहेब वर्तक हॉल मध्ये झाला. राजीव वेंगुर्लेकर यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभले आहे. एक तळ गाळात या प्रयोगात सर्वच पात्रांनी आपल्या भूमिका समजून घेऊन,समरस होऊन साकारल्या आहेत.विशेषत: आलू ( वरदा साळुंके.) ईरु (मिहीर पुरंदरे) या कलावंतांनी जीव ओतून भूमिका केल्या.

 पहिल्या अंकातील पहिल्या प्रसंगा पासूनच हे नाटक मनाची पकड घेते. नेपथ्य रचनाच अशी आहे की हे नाटक ओपनिंगलाच रसिकांची नजर खिळवून ठेवते. या अंकात आलू व माकूरी या वयस्क जोडप्याचा ‘लव्ह सीन’ राजू वेंगुर्लेकर यांच्या दिग्दर्शंनाची साक्ष देणारा होता. तो सीन म्हणजे सुंदर न्रित्य नाटयाची झलक होती. प्रयोगा नंतर नाटक सादर करणारे आणि उपस्थित रसिक व रंगकर्मी यांच्यात चर्चा झाली. अनेकांनी एक नवे आणि अस्सल प्रायोगिक नाटक पहायला मिळाल्याचे या वेळी सांगितले.

श्रेय नामावली लेखक प्रा.दिलीप जगताप, दिग्दर्शक : राजू वेंगुर्लेकर, नेपथ्य : सचिन गोताड.,  संगीत : किरण सहाणे.,संगीत संयोजन : रितीक., प्रकाश योजना : शीतल तळपदे.,संयोजन : नितेश पाताडे., वेशभूषा : निकिता तांबे., रंगभूषा : उलेश खंदारे., रंगमंच व्यवस्था: सोमेश धुरु.

भूमिका – माकोरी : आकाश सावंत., आलू : वरदा साळुंके.,ईरु : मिहीर पुरंदरे., भिकारी : प्रशांत, गुरव., कालुया : महेंद्र भंडारे., सेवक : शुभम् सुर्यवंशी, राहुल बेलकर, निशांत वालावलकर.,  निर्मिती प्रमुख : दिनेश चव्हाण व जयप्रकाश बर्वे., विशेष सहाय्य : महेंद्र तरेदेसाई.

 विरारच्या प्रयोगात ज्येष्ठ रंगकर्मी व प्रशिक्षक शिवदास घोडके, को.म.सा.प. विरार शाखेचे अध्यक्ष उमाकांत वाघ,नगरसेविका सुरेखा कुरकुरे, कवी अमोल पाटील, जयंत देसले,विनोद देशमुख,दिनेश शिंदे, बिपीनचंद्र ढापणे यांनी नाटकावर झालेल्या चर्चेत भाग घेतला. प्रयोग आयोजकांच्या वतीने उमाकांत वाघ यांनी उपस्थितांचे व ‘टीम एक तळ गाळात’ चे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!