फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ आत्मचरित्राने मराठी साहित्यात मोलाची भर – डॉ. सदानंद मोरे

वसई, दि. १८  (वार्ताहर) : फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा यशु ख्रिस्ताने निर्मिलेल्या प्रवासावरून संत तुकोबाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न हा चमत्कार असून, त्यांच्या ‘नाही मी एकला ‘ या अतिशय वाचनीय झालेल्या आत्मचरित्राने मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे, असे गौरवोद्गारमराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज सायंकाळी नंदाखाल, विरार (प.)येथे बोलतांना काढले.

ज्येष्ठ विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते,तथा सुप्रसिध्द साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांच्या राजहंस प्रकाशन द्वारा प्रस्तुत ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राचे प्रकाशन वसईचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो ह्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ मोरे बोलत होते. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर आणि संपादक डॉ. सदानंद बोरसे, आगस्टीन दिब्रिटो, विविध धर्मीय प्रमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यात येऊन शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.तसेच डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी शहिदांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली.

डॉ. मोरे पुढे बोलतांना म्हणाले, फादरांची स्रियांकडे पाहण्याची दृष्टी कमालीची संवेदनशील असून, साहित्यात इतक्या निकोपपणे स्त्रीयांवर अपवादानेच लिहिले गेले आहे. मी आधी भारतीय आणि नंतर ख्रिस्ती आहे, या फादरांच्या विधानातून त्यांची राष्ट्रनिष्ठा व्यक्त झाली आहे. कौटुंबिक नातेबंधावर मात करीत, त्यांनी एक आदर्श धर्मगुरू होण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला असून, सामाजिक परिवर्तनाच्या लढयात मेधा पाटकर यांच्याशी तुलना होऊ शकेल असे कार्य त्यांच्या हातून झाले असल्याचेही डॉ मोरे यांनी सांगितले.

राजहंस प्रकाशनचे दिलीप माझगावकर यावेळी म्हणाले की,ओ एसिसच्या शोधात आणि सुबोध बायबल या पुस्तक प्रकाशनाच्या प्रवासात आधी फादर दिब्रिटो यांच्याशी मैत्री झाली आणि त्यांच्या जादुई व्यक्तिमत्वामुळे आता प्रेमात पडलो. निसर्ग लेखन हे त्यांचे शक्तीस्थान असून, त्यांची व्यक्त होण्याची आणि निवेदनाची शैली वाचकाला बांधून ठेवते.फा. दिब्रिटोंचे लेखन वाचतांना वाचक प्रवाहाच्या कडेला उभा राहू शकत नाही, तर तो प्रवाहात ओढला जातो.

‘नाही मी एकला’ ही साहित्यकृती वाचकाच्या पाचही ज्ञानेंद्रियांना साद घालणारी असून, आई-वडिलांच्या पोटी जन्माला आले असले तरी त्यांच्या लेखनांतून ते निसर्गपुत्र असल्याचा भास होत राहतो, असे राजहंसचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी यावेळी सांगितले.

मी स्वत: एक टिंब असून, सामाजिक वाटचालीत वर्तुळे वाढत गेली. आठवणींचा महापूर येत गेला. समाजानेच दिलेलं परत करण्याचा प्रयत्न करीत आलो. त्यातून हे पुस्तक साकारलं,अशी भूमिका मांडून फा. दिब्रिटो यावेळी बोलतांना पुढे म्हणाले, माणुसकीच्या विविध आंदोलनातून आध्यात्मिक आनंद मिळत गेला. निसर्ग हा माझ्या कुटुंबाचा भाग असून, निसर्गधर्म हा वसुंधरेचा ऐवज आहे. वसईचे’वसईपण’ इथला निसर्ग आणि पाणी साठवून ठेवले पाहिजे. मराठी मायबोली आणि इथली संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे.

फा. दिब्रिटो हे मला मोठे बंधू आणि मार्गदर्शकाच्या रूपाने मदत करीत आल्याचे डॉ. मच्याडो यांनी यावेळी सांगितले.

प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष फ्रान्सिस डिमेलो यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमस्थळी पुस्तकांच्या दोन हजार प्रती विकल्या गेल्या आणि सहाशेहुन अधिक पुस्तकांचे नवे बुकिंग नागरिकांनी यावेळी नोंदवले. सुमारे अडीच हजाराचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. फादर दिब्रिटो यांच्या सामाजिक व साहित्यिक वाटचालीवर आधारित चित्रफीत यावेळी प्रदर्शित करण्यात आली. विविध संघटनांच्यावतीने फा. दिब्रिटो यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांचा संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला.

(छाया – सुमित पेरेरा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!