फुलपाडा सहकार नगर येथे नशेबाजांचा धुमाकूळ

महिला व शाळकरी मुले असुरक्षित

पोलिस प्रशासन मात्र सुस्त

विरार (वार्ताहर) : चरस गांजा व अफीम या नशील्या पदार्थांचे सेवन करुन रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना बेजार करणाऱ्या नशेबाजांवर पोलिस उचित कारवाई करीत नसल्याने त्यांनी सहकार नगर व फुलपाडा परिसरात थैमान घातला आहे. यामुळे सामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. हे नशेबाज गुंड तेथील मुख्य रस्त्यावर नागरिकांना अडवून दामदाटी करुन लूटपाट करतात. कुणी विरोध केल्यास मारहाणही करतात.
सहकार नागरमधील रिक्षा स्टॅंड ते पाठक हिंदी हायस्कूल या भागात नेहमीच नशेबाजांचा जास्त धुमाकूळ असतो. चंदर गोवारी परिसर आणि मथुरा डेअरी मागील भग्न झालेल्या जुन्या इमारतीमध्ये चरस गांजा विक्रीचा मोठा अड्डा असून तेथे नशेबाजांची दिवस रात्र ये जा सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुणी त्यांच्या विरोधात बोलल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली जाते.
येथील महिला, शाळकरी मूली व महाविद्यालयीन युवती आणि नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. रस्त्याने चालणेही त्यांना कठीण झाले आहे. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारींमध्ये गुड्डू सिंग आणि कल्लू सिंग, गोविंदा ( पूर्ण नाव माहित नाही ) यांच्या नावावर अनेक तक्रारी दाखल असून त्यांच्यासह आणखी ८-१०लोकांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे.
आपल्या जीवाची बाजी लावून काही लोकांनी पुढे येऊन या नशेबाज गुंडांविरोधात  विरार पोलिस ठाण्यात अनेक वेळा तक्रारीही दिल्या आहेत मात्र पोलिस प्रत्येक वेळी अदखलपात्र गुह्याची नोंद करुन तक्रारदारास न्यायालयाचा रस्ता दाखवून या अतिशय सवेदनशील आणि महत्वाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. एवढेच नव्हे तर एका तक्रारदार नागरिकाला विरार पोलिस ठाण्यातुन फोन आला आणि तुम्ही पोलिस स्टेशनला या एक पोलिस सोबत देतो त्याला घटनास्थळी नेऊन ती गुंड नशेबाज माणसे दाखवा असे सांगण्यात आले. हे पोलिसांचे बोलणे ऐकून त्या तक्रारदारास आश्चर्याचा धक्काच बसला आहे. एका बाजूला नशेबाजांचा धुमाकूळ व दादागिरी तर दुसऱ्या बाजूला पोलिसांचा बेजबाबदारपणा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!