बघता-बघता ६० वर्ष झाली की हो..! – मधुकर भावे

बघता-बघता ६० वर्षे झाली. ३ कोटी मराठी जनतेने लोकशाहीच्या मार्गाने कामगार, शेतकरी, यांच्या एकजुटीतून पाच वर्ष लढविलेली लढाई ६० वर्षापुर्वी आजच यशस्वी झाली. जागतिक कामगार दिनी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याची ग्वाही पंडीत नेहरुंनी पुकारली. कारण या लढाईत कामगार आघाडीवर होता. ६० वर्षापूर्वीचा महाराष्ट्रच्या एकजुटीचा तो सोहळा पाहता आला होता. ६० वर्ष पूर्ण होत असताना, कोरोनाच्या हल्ल्यामुळे महाराष्ट्राचे राज्याचा उत्सव मना मनातच साजरा करावा लागतो आहे. या ६० वर्षांच्या राजकारणाचा, सत्ताकारणाचा, विरोधकांच्या संसदीय लढाईचा, विरोधकांनी रस्त्यावर येऊन लढविलेल्या आंदोलनांचा, महाराष्ट्रचे पुरोगामीपण देशात सिध्द करणाऱ्या सर्व निर्णयांचा आणि महाराष्ट्रावर या ६० वर्षात आलेल्या सर्व संकटांचा मी साक्षीदार आहे. पत्रकारीतेच्या वातानुकुलित कार्यालयात बसलेला साक्षीदार नव्हे. प्रत्येक घटनेच्या ठिकाणी जाणारा, त्याचे संकलन करणारा, महाराष्ट्रा आणि देश पालथा घालणारा असा साक्षीदार ! हे नियतीनं माझ्या पदरात घातलेलं भाग्यं. आई वडीलांची पुण्याई कामी आली असेल म्हणून महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व क्षेत्रातली मोठी माणसं मला पाहता आली. त्यांच्यासोबत वावरता आलं. त्यांच्याशी विविध विषयांच्या चर्चा करता आल्या. ६० वर्ष चौफेर लिहीता आलं. मुंबईत राहून महाराष्ट्राच्या शेतकºयाचे, कामगाराचे, गरीबांचे प्रश्न तीव्रपणे मांडता आले. महाराष्ट्राच्या चारही कोपऱ्यातून या अशा सर्व संपादकीयाच, साप्ताहिक सदराचं आणि आता मुक्त पत्रकारीतेत सर्व लेखांच गेली ६० वर्ष स्वागत होत आहे. आयुष्यात आणखी काय मिळायला हवं? माझ्या पत्रकारीतेची ६१ वर्ष परिपूर्ण आणि समृध्द आहेत असं मी मानतो. आचार्य अत्रे यांनी बोट धरुन मुंबईत आणलं. १२ वर्ष त्यांच्यासोबत राहता आलं. मिडास राजाच्या स्पर्शाने त्या-त्या वस्तूचं सोनं होई असं सांगितलं जातं. ते पाहायला कोणी गेलं नाही. आचार्यअत्रे यांनी विश्वास टाकून  १९ व्या वर्षी मराठात मोठी संधी दिली. त्यामुळे आयुष्याचं सोनं झालं, असं मला सांगता येतयं. त्यानंतर ‘लोकमत’च्या आमच्या बाबूजींनी सलग् ३४ वर्षे संधी देऊन ‘लोकमत’समूहाचं संपादक केलं. त्यादिवशी  शेरपा तेनसिंग नोर्के याचा आनंद मला झाला होता.
Maharashtra 60 yearsगेल्या ६० वर्षांत महाराष्ट्र नेमका कसा घडला? त्या महाराष्ट्राची बांधणी कशी झाली? महाराष्ट्राने देशाला कशी दिशा दिली?  दिशा देणारे ते सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण पाहता आले. त्यांच्यासोबत तरुण वयात वावरता आले. वसंतदादांना पाहता आले. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, राजारामबापू, क्रांतीसिंह नाना पाटील, उध्दवराव पाटील आणि आजचे सर्वश्रेष्ठ नेते शरद पवार या सर्वांकडून आपोआप बरच काही शिकता आलं. त्याचवेळी विधानमंडळात संख्येने कमी असलेला पण गुणवत्तेवर सरकारची दमछाक करणारा विरोधी पक्ष पाहता आला. सत्तेसाठी न आसुसलेल्या उध्दवराव पाटील यांच्यासारखा फार मोठा नेता अनुभवता आला. कामगार नेते एस.ए.डांगे, त्यागी नेते एस.एम.जोशी, पत्रकारीतेतले सरसेनापती आचार्य अत्रे, या सर्व नेत्यांनी सरकारला जरुर तिथे सहकार्य केले. आवश्यक तेथे प्रखर विरोध करुन शांततामय मार्गाने रस्ते दणाणून टाकले. आज सामान्य माणसांचे प्रश्न तसेच असताना असे नेते नाहीत, असे मोर्चे नाहीत, असे घेराव नाहीत आणि कोणाला खरं वाटणार नाही, असा १३ मार्च १९६६ चा मंत्रालयाला चारही दिशांनी घेराव घालणारा एक लाख बैलगाडीचा महामोर्चाही आता होणं शक्य नाही!  शेतकºयांच्या शेतीच्या खर्चावर आधारीत त्याच्या ज्वारीला, तांदुळाला, गव्हाला भाव मिळावा या मागणीसाठी निघालेला १ लाख बैलगाडीचा मोर्चा, त्यावेळी जगाच्या वृत्तपत्राची बातमी ठरला होता. सरकारशी असा प्रखर लढा देणारे, रोजगार हमीसारख्या गरीबाला काम देणाºया योजनेत सरकारने कर लावून पैसे उभे करावेत त्यासाठी विरोधी बाकावरुन कराचा प्रस्ताव आणणारेही महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होते.
गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राचे मोठेपण आणि पुरोगामीपण यातच दडलेलं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि महाराष्ट्रातले विरोधक महाराष्ट्राची आर्थिक बांधणी करण्याच्या विषयात हातात हात घालून एकत्र आले. आजच्यासारख घाणेरड राजकारण त्यांनी कधी केलं नाही. मग तो द्विभार्या प्रतिबंधक कायदा असेल, कसेल त्याची जमीन कायदा असेल, मजुरांचे किमान वेतन कराराचा कायदा असेल, रोजगार हमी योजना असेल, कापूस एकाधिकार  खरेदी योजना असेल, डान्सबार, गुटखाबंदी विधेयक असेल… सुसंस्कृत आणि समंजस राजकारणाच्या सर्व मर्यादा महाराष्ट्राने गेल्या ६० वर्षांत जपल्या आहेत म्हणूनच गेल्या ६० वर्षांत अनेक पुरोगामी कायदे महाराष्ट्राने एका आवाजात मंजुर केले. नुसतेच मंजुर केले नाहीत तर, देशपातळीवर महाराष्ट्राचे हे अनेक कायदे केंद्र सरकारने स्वीकारलेले आहेत. मुलींना सक्तीचे मोफत शिक्षण देण्याचा पहिला प्रयोगही महाराष्ट्रातच १९५८ साली केला गेला. रोजगार हमीचा कायदा तर देशपातळीवर ‘नरेगा’ म्हणून प्रसिध्द झाला. सार्वजनिक वाहतूकीची एस.टी.ची गाडी, खासगी वाहतूकीचे राष्टरण करुन प्रथम महाराष्ट्रात पुणे-नगर या महामार्गावर धावली. त्याचे पहिले प्रवासी बाळासाहेब भारदे होते. देशातला पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात प्रवरानगरला उभा राहीला. देशातली पहिली जिल्हा परिषद, पंचायत समिती महाराष्ट्रात सुरु झाली. सर्व देशाने पंचायतराज नंतर स्वीकारले आहे. स्त्री-पुरुषांना समान मजुरी महाराष्ट्रात सुरु झाली. नंतर देशपातळीवर त्याची अंमलबजावणी झाली. गर्भजलचिकीत्सा बंदी विधेयक आमदार मृणाल गोऱ्हे यांनी ५० वर्षापूर्वी आणले. सरकारच्या विनंतीवरुन ते विधेयक मागे घेतल्यावर सरकारी बाकावरुन तेच विधेयक कायदा म्हणून मंजुर झाले. त्या कायद्यामुळे गर्भधारणा झालेल्या स्त्रीच्या गर्भात मुलगी असली तर… राजरोजपणे होणाºया हजारो स्त्रीभ्रृणहत्या कायद्याने रोखणारे महाराष्ट्रा हे पहिले राज्य आहे. देशाने तो कायदा नंतर स्वीकारला. मुंबई, पुणे शहरातील उच्चवर्गीय घरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची मक्तेदारी महाराष्ट्रानेच प्रथम मोडून काढली. मणिपालला जाणारे शेकडो विद्यार्थी तिकडे का जातात, याची चौकशी करुन वसंतदादा पाटील या फार न शिकलेल्या शहाण्या माणसाने निर्णय घेतला की, खासगी वैद्यकीय आणि आभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी द्यायची. शासकीय रुग्णालयातील मर्यादित जागांमुळे कोंडी झालेल्या ग्रामीण विभागातील सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय क्रांतीकारी ठरला. गरीब, शेतकरी, मजूर, दलित, आदिवासी या पालकांची मुले त्यामुळे डॉक्टर आणि इंजिनिअर होऊ लागली. बुध्दिमत्तेची मक्तेदारी केवळ उच्चवर्णियांमध्ये नाही, हे निर्णयाने महाराष्ट्रात सिध्द केलेले आहे. आर.आर.आबा यांच्या आग्रहाने आणले गेलेले डान्सबार बंदी विधेयक आणि गुटखाबंदी विधेयक महाराष्ट्रातच प्रथम मंजुर झाले. या दोन घातक व्यसनांवर प्रचंड पैसा उधळणाऱ्या तरुणाला आर.आर.आबा आणि त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कठोर कायदा करुन वाचवले आहे. या दोन्ही लोकप्रिय नेत्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रा धायधाय रडला, ते उगीच नव्हे.
गेल्या ६० वर्षांतील महाराष्ट्राची ही पुरोगामी पायवाट आहे. या सर्व काळात विरोधकांनी प्रखर टीकाही केली होती. सरकारचे वाभाडेही काढले होते, पण अशी टीका किंवा वाभाडे हे त्या-त्या दिवशी महत्वाचे असले तरी कायमचे लक्षात ठेवायचे नसतात. लक्षात ठेवायची ती चांगली कामं. चांगले पुरोगामी कायदे. ३१ महाकाय धरणं. यात कोयना, उजनी, जायकवाडी यासारखी धरणं आहेत. कोराडी, चंद्रपूरसारखी औष्णिक केंद्र आहेत. लोटेपरशुराम, धाटावसारख्या ग्रामीण भागात विकसित झालेल्या औद्योगिक वसाहती आहेत. राज्याची बांधणी होताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. वृत्तपत्राची त्या-त्या दिवसाची टीका चवीने वाचली गेली तरी, आजचं वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी रद्दी असते, हे पत्रकार म्हणून सांगताना मला कसलाही संकोच वाटत नाही.
महाराष्ट्राची ही सर्व पुरोगामी पावले होती आणि आहेत. त्याचवेळी सत्तेचे विकेंद्रीकरण करताना लोकशाही जीवनपध्दतीत विरोधी पक्षाचे महत्व जाणणारेही सत्ताधारी त्या काळात होते म्हणूनच विधानमंडळातील विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देणारे, मंत्र्यासारखे शासकीय वाहन आणि निवासस्थान देणारे महाराष्ट्रा हे देशातले पहिले राज्य आहे. केवळ सोयीसुविधा देण्यात दानशूरपणाचा आव नव्हता. तर, लोकशाहीच्या मजबुतीसाठीच ही पावले उचलली गेली म्हणून राज्यशिष्टाचार कायद्यात (प्रोटोकॉल) राष्ट्रीय ध्वजवंदनाच्यावेळी मुख्यमंत्र्याच्या डाव्या हाताला विरोधी पक्षनेत्याची जागा कायद्यानं ठरवली गेली. विधानमंडळातील सर्वात महत्वाची समिती म्हणजे पब्लिक अकाऊंटस, (लोकलेखा समिती) या महत्वाच्या समितीचे अध्यक्षपद विरोध पक्षाच्या आमदाराला देण्याचा पहिला निर्णय महाराष्ट्रानेच घेतलेला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद यांच्या उपाध्यक्ष आणि उपसभापतीच्या जागी विरोधी पक्षाच्या आमदाराची नियुक्ती करावी. हा महाराष्ट्राचाच पहिला निर्णय.
आमदारांनाविशेष कामांसाठी शासकीय लाल फितीची अडचण न होता पैसा उपलब्ध व्हावा म्हणून, ताबडतोबीच्या कामाकरीता प्रत्येक आमदारास २ कोटी देणे आणि ती कामे शासकीय व्यवस्थेत करुन घेणे हा निर्णयही महाराष्ट्राचाच. ही सगळी पुरोगामी पाऊलं हीच गेल्या ६० वर्षांत देशाला झालेली महाराष्ट्राची खरी ओळख आहे. यशवंतराव चव्हाण यांनी याची सुरुवात करुन दिली. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा, शरद पवार, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख यांनी प्रभावीपणे ती परंपरा पुढे नेली. शरद पवार सत्तेत असताना महिला आयोगाची निर्मिती, महिलांना ५० टक्के प्रतिनिधीत्व, शासकीय जमिन, भाडेपट्टा, घर, त्याच्या मालकीत पतीबरोबर पत्नीचे नाव. हे सगळे पुरोगामी निर्णय यशवंतरावांना डोळ्यासमोर ठेवूनच पवारसाहेबांनी राबविले.
राज्याचा विकास करताना धरणे बांधणे, वीज निर्मिती, सुंदर महामार्ग, उड्डाणपुल, मोनो, मेट्रो या सर्व प्रगतीच्या खुणा आहेत.  या ६० वर्षांत ३१ महाकाय धरणं, ३४० मध्यम धरणं, ४ हजार लघुपाटबंधारे, ६ हजार कोल्हापूर बंधारे, १८ हजार वनराई बंधारे, २० हजार मेगावॅट वीजनिर्मितीची रोजची क्षमता, पूर्व-पश्चिम राष्ट्रीय महामार्ग या आधुनिक जगाच्या प्रगतीच्या खुणांमध्येही महाराष्ट्रा पुढेच आहे. या ६० वर्षांतील तमाम महाराष्ट्राने ज्याच्या पायावर डोके ठेवले पाहिजे, असा कोणता घटक असेल तर तो महादुष्काळाशी, महापुराशी झुंजुन अन्न धान्याच्या आघाडीवर महाराष्ट्राला समृध्द करणारा शेतकरी. ५० वर्षापूर्वीचे दिवस आठवा. अमेरिकेचा लाल निरो घेण्यासाठी रेशन दुकानावरच्या त्या रांगा. तासनतास रांगेत उभा राहणारा महाराष्ट्रा आज आठवतोय का?  ती भयानक स्थिती एका दिवसात बदलली आहे का?  ६० वर्षांत किमान १४ वर्ष दुष्काळ, ९ वर्षे महापूर अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देवून महाराष्ट्रातील आजची अन्नधान्याची आजची समृध्दी या शेतकºयाच्या अफाट कष्टातून निर्माण झाली आहे. बाजारात मुबलक धान्य आहे. ते कोणामुळे? कोरोनामुळे दीड महिना घरात बसलेला महाराष्ट्रा दोनवेळा भरपूर जेवून ढेकर देतो आहे, तोही कोणामुळे पण दुर्दैवाने महाराष्ट्रा राज्याची निर्मिती होण्यासाठी आघाडीवर राहून लढणारा आज शेतकरी आणि तोच कामगार गेल्या ६० वर्षांत आर्थिकचक्रात सापडला, कंगाल झाला, त्याला आत्महत्या करायची वेळ आली, याची तीव्र खंत आहे. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रा राज्यासाठी लढले कोण? शेतकरी आणि कामगार आणि तेच देशोधडीला लागले आणि गब्बर झाले कोण? त्याचा मात्र पंचनामा झालाच नाही.
तरीही, महाराष्ट्रा राज्याची ही पुरोगामी वाटचाल चालुच राहीलेली आहे. ६० वर्षापूर्वीच ३ कोटीचा ममहाराष्ट्रा १२कोटीवर आला. त्यावेळच्या चार महानगरपालिकांच्या आता ३० महानगरपालिका झाल्या. म्हणजे महाराष्ट्राची शहर फुगत चालली. खेडी उद्ध्वस्त होत आली. खेड्यात रोजगार नाही, शेती परवडत नाही, म्हणून रोजगारासाठी शहराकडे धावणाºयांची संख्या उद्या स्फोट घडविलं, याचवेळी गेल्या काही वर्षांत झटकन सुखवस्तू झालेल्या २६टक्के मध्यमवर्गीयांना गरीब आणि ग्रामीण माणसांबद्दल वाटणारी तुच्छता, हा न दिसणारा फार मोठा धोका महाराष्ट्रात वाढतो आहे. उद्याच्या महाराष्ट्राची बांधणी करताना नवी विषमता निर्माण होण्याची भीती आहे आणि त्याचवेळी ६० वर्षापूर्वीचे सर्वच पक्षातील सहा फुट उंचीचे, दूरदृष्टीचे कृतीशील नेते पुढच्या पिढ्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता कमी झाली आहे. म्हणून सेवेपेक्षा सत्तेचे महत्व महाराष्ट्रात वाढले. सेवा, त्याग आणि समर्पण, हे शब्द आज भाषणपुरते राहीले आहेत. ६० वर्षात बरेच काही चांगले घडत असताना काही चुकले आहे.
या ६० वर्षांत महाराष्ट्राने अनेक संकटांचा सामना केला. पानशेतचे धरण ११ जुलै १९६१ साली फुटले, अर्धे पुणे वाहून गेले, कोयनेचा भूकंप ११ डिसेंबर १९६६ रोजी झाला, ७० हजार घरं आस्मानात उडाली, ७ मे १९७० भिवंडीची जातीय दंगल महाराष्ट्राला खूप वेदना देवून गेली, १९७२ चा दुष्काळ पचवला, ३० सप्टेंबर १९९३ चा लातूर तालुक्यातील किल्लारीचा भूकंप त्यातून पुन्हा किल्लारी उभे केले. १२ मार्च १९९३ मुंबईतील बॉम्बस्फोट मालिका, २६ नोव्हेंबर २००८ चा कसाबचा मुंबईचा हल्ला, अशा अनेक भीषण संकटांचा सामना महाराष्ट्राने केला आणि आता कोरोनाचा सामना महाराष्ट्रा करीत आहे. संकटात समाधान एवढेच की, या कठीण काळात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या बोलबच्चन कंपनीच्या हातात महाराष्ट्राची सत्ता नाही, ती सत्ता समंजस, संयमी उध्दव ठाकरे यांच्या हातात आहे, त्यांच्यामागे पावसात भिजलेला सह्याद्री उभा आहे. या संकटातून महाराष्ट्रा सुखरुपपणे बाहेर पडेल याची खात्री आहे.

मधुकर भावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!