बबनराव लोणीकर व विजया रहाटकरांवर गुन्हा दाखल करा – जयंत करंजवकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नैतिकतेच्या मुशीतून तयार झालेले भाजपचे नेते गेले पाच वर्षे महिलांचा उध्दार करत असल्याचे पहात आहोत. सत्तेवरून उतरल्यावरही भाजपा नेते महिलांचा अवमान करत आहेत. भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी भारतीय जवान सीमेवर असतात आणि त्यांच्या पत्नीला मुलगा झाल्यावर तेच जवान पेढे वाटतात. भारतीय लष्करातील जवान, त्यांच्या कुटुंबांचा एवढा मोठा अपमान आणि प्रत्येक भारत्यांची मान खाली घालणारे विधान आजतागायत कोणी केले नाही. वास्तविक पाहता देश भक्तीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाने परिचारक  यांना ताबोडतोब आमदारकीचा राजीनामा घेऊन पक्षातून हाकलून द्यायला पाहिजे होते. पण तसे घडले नाही. भारतीय जनता पक्षाचे विचार प्रथम राष्ट्राला प्राधान्य, दुसरे पक्षाला आणि नंतर कार्यकर्ता असे आहे आणि या विचाराचे फलक भाजपाच्या कार्यालयात दर्शनी भागात लावले जाते. प्रशांत परिचारक यांचे विधान भारतीय जवानांची आरती ओवाळली असं आहे का ? देशाच्या जवानांचा आणि त्यांच्या पत्नींचा खालच्या पातळीला जाऊन अपमान केला हा राष्ट्राचा गौरव केला म्हणून भाजपाने परिचारक यांच्यावर कारवाई केली नाही का ? विधानपरिषदेत सहा महिन्याकरिता प्रवेश बंदी ही काय शिक्षा झाली ? जवानांचा अपमान हा देशाचा अपमान, देशाचा अपमान हा राष्ट्रद्रोह समजून परीचारकांवर कारवाई होणे आवश्यक होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानपरिषदेत परिचारक यांच्या एका मताची किंमत राष्ट्रभक्तीपेक्षा मोठी होती आणि हे त्यांनी त्यांच्या कृतीतून सिध्द करून दाखविले.

भाजपा आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्यांच्या सभेत अकलेचे तारे तोडले. त्यांचं विधान ‘शेतकऱ्यांना एक हेक्टरी २५ हजार रुपये राज्य सरकारकडून मदत पाहिजे असल्यास सर्वात मोठा म्हणजे ५० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधानसभेवर नेला पाहिजे. शेतकरी मोठया संख्येने यावेत म्हणून एखाद्या हिरॉईनला आणू आणि ती नाही मिळाली तर व्यासपिठावर असलेल्या सरपंच बाईंना हिरॉईन म्हणून नेऊ  या…’ हे वक्तव्य ऐकून भाजपा नेते कोणत्या बिळात बसले माहीत नाहीत. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील ना पुढे आलेत ना देवेंद्र फडणवीस…?  १०५ आमदार असूनही भाजपाला विधानसभेत विरोधी बाकावर बसायला लागले आहे, नियतीने घेतलेला हा सूड म्हणावा लागेल. बबन्या लोणीकर हे आमदार महाशय पाचवी शिकलेले गृहस्थ, त्यांच्या शिक्षणाविषयी आजही साशंकता व्यक्त केली जात आहे. हिरॉईन म्हणजे चित्रपटातील अभिनेत्री. अभिनेत्री विविध कला आविष्कार दाखवून समाजातील भयाण परिस्थितीची कला, भूमिका सादर करतात. ती झोपडपट्टीतील गृहिणी, डान्स बारमधील वेटर्स, बारबाला, तमाशा फडातील नर्तिका सादर करते म्हणून त्या अभिनेत्रीकडे त्या दृष्टकोणातून कोणीही बघत नाही. परंतु बबन्या लोणीकर त्या नजरेतून पहातात असे वाटते. मराठी भाषा ही अशी आहे की, तुम्ही ज्या सुरात बोलता तसा त्याचा अर्थ बदलतो. ‘बोला तुम्हाला हिरॉईन पाहिजे, मी हिरॉईन आणून देतो’, लोणीकर यांच्या बोलण्याचा अर्थ असा की   शेतकऱ्यांनी आंदोलनात  मोठया संख्येने यावे म्हणून हिरॉईन आणण्याचे आश्वासन दिले. म्हणजे शेतकऱ्यांच्या टाईमपाससाठी हिरॉईन बरी असे वाटत असावे. हिरॉईन नाही मिळाली तर व्यासपीठावर बसलेल्या तहसीलदार बाईंना न्यायचं… म्हणजे लोणीकर अजून मस्तीत वावरत आहेत. एखादया महिलेकडे पाहून तिची निर्भत्सना करायची म्हणजे राजकीय नेत्यांना महिलांना सन्मान कसा द्यावा हेच कळत नाही.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी लोणीकर यांच्या विधानावर अजून काहीच भाष्य केले नाही. त्या भाष्य तरी कशा करणार ? त्या आहेत भाजपाच्या, त्यांची मोठी अडचण झाली आहे. परंतु घटनात्मक पदावर असतांना विजया रहाटकर यांनी स्वत:हून पुढे येऊन नि:पक्षपातीने लोणीकरांवर कारवाई करायला पाहिजे होती. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. सध्या त्या त्यांचे पद सांभाळण्यामध्ये व्यस्त आहेत. आमदार व भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी दहीहंडी महोत्सवात एखाद्या मुलीने लग्नास नकार दिल्यास तिला तिच्या घरातून उचलून आणून तीच लग्न लावू शकतो. थोडक्यात,  भाजपाच्या नेत्यांना सत्तेचा माज व मस्ती एवढी चढली आहे की ते विरोधी पक्षात आहेत त्यातून ये अजून तरी बाहेर आले नाहीत. ते आजही कोणत्याही मुलीला घरातून पळवून आणू शकतात, असे संकेत त्यांना द्यावयाचे आहे. म्हणून तर लोणीकारांनी व्यासपीठावर बसलेल्या महिला तहसीलदारांना हिरॉईन बोलण्याचे धाडस केले. अर्थात त्या तहसीलदार महिला लोणीकर यांच्या वक्तव्याने नाराज होऊन व्यासपीठावरून निघून गेल्या. ते ही बरे झाले. तहसीलदार बाईंनी लोणीकारांना त्यांची जागा दाखवून दिली.

भाजपाचे नेते काही सभ्यता न पाळता जीभ घसरल्यागत बरगळत आहेत. २५  वर्षे सत्तेत राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपा नेत्यांना पाच वर्षात सत्ता जाशील असर वस्ताळे नव्हते आणि त्यामुळे त्यांच्यात नैराश्य आले असल्याने निराशेपोटी ते वसलेलं ते बरगळत आहेत. असे असूनही ये लोकांमधून निवडणून येत आहेत. मतदारच असे जीवघेणी बोलणं गांभीर्याने घेत नसतील तर भाजपा नेते कशाला लोकांच्या नाराजीच दखल घेतील ?

याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांवर शिक्षेची तरतूद करावी. विधानसभेत गदारोळ घालणाऱ्या आमदारांचे काही महिने, वर्षे आमदारकी रद्द केली जाते, तशा प्रकारची शिक्षेची तरतूद करावी, तरच त्यांचावर वचक बसेल. याशिवाय महिलांवर अत्याचार, अन्याय होत असेल त्यासाठी राज्य सरकारने ‘राज्य महिला आयोग’ स्थापन केले आहे, या आयोगाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. सध्या विजया रहाटकर ह्या आयोगाच्या अध्यक्षा आहेत. बबन लोणीकर यांनी महिलांचा अपमान करूनही त्यांनी त्याविषयी आयोगाची भूमिका स्पष्ट केली नाही. ही एक अतिशय क्लेशकारक आणि लांच्छनास्पद बाब आहे. गुन्हा करणाऱ्या माणसापेक्षा गुन्ह्याला प्रोत्साहन देणारी व्यक्ती सर्वात मोठी दोषी असते. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर दोषी आहेत. बबनराव लोणीकर हे भाजपाचे नेते असल्याने त्यांना वाचविण्याचा विजया रहाटकर प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरच प्रथम कारवाई केली पाहिजे.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९/jayant.s.karanjavkar@gmail.com).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!