बर्फाच्या लाद्यांमधून गोमांसाची तस्करी, साडेतीन हजार किलो मांस जप्त

वसई (वार्ताहर) : बर्फाच्या लाद्यांमधून गोमांसाची केली जाणारी तस्करी गोवंश संरक्षण समितीने उघड  केली असून,पोलीसांच्या मदतीने केलेल्या या कारवाईत साडेतीन हजार किलो मांस जप्त करण्यात आले आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी केली जाणार असून, हे मांस मुंबईला विकण्यात येणार असल्याची माहिती गोवंश संरक्षण परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विरार पोलीसांच्या मदतीने खानिवडे टोलनाक्या जवळ ७ मार्चला रात्रीपासून पाळत ठेवली होती. मध्यरात्री दिड वाजता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच.०४-के.एफ.२५३७ क्रमांकाच्या संशयित आयशर टेम्पोला थांबवून त्याची झडती घेण्यात आली.त्यावेळी पोलीसही आश्चर्यचकीत झाले. सुरवातीला त्यांना टेम्पोत बर्फाच्या मोठया लाद्या दिसून आल्या. मात्र,बारकाईने तपासणी केल्यावर या लाद्यांमध्ये गोमांस लपवून ठेवलेले दिसून आले.

नगर जिल्ह्यातून विक्रमगडमार्गे हे गोमांस सुरक्षीतपणे मुंबईला पोहोचवण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली होती.बर्फ वितळून त्याचे पाणी रस्त्यावर झिरपू नये यासाठी टेम्पोच्या तळाला एका टाकी बसवण्यात आली होती.या टाकीत जमा झालेले पाणी रस्त्याच्याकडेला थांबवून सोडून दिले जात होते.त्यामुळे कोणालाही या तस्करीचा सुगावा लागला नसता,मात्र,जागरुक गोवंश संरक्षण परिषदेच्या कार्यकर्त्यांना ही तस्करी उघडकिस आणली.या टेम्पोत साडेतीन हजार किलो मांस सापडले. या कारवाईत टेम्पो जप्त करण्यात आला असून,दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

मागील आठवडयात याच महामार्गावर दापचरी आरटीओ चेकपोस्टजवळ सापळा रचून पोलीसांनी ८ बैल, ६ गायी आणि ३ वासरांसह १७ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!