बविआच्या नगरसेवकावर 420 चा गुन्हा दाखल

वसई (वार्ताहर) : बहुजन विकास आघाडीचे नालासोपारातील नगरसेवक अरुण हरिश्चंद्र जाधव यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात 420कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे ऐन निवडणूकीत खळबळ उडाली आहे.

अरुण हरिश्चंद्र जाधव यांनी मौजे मोरे येथील सर्वे क्र.99 हिस्सा क्र.3वर सिडकोची बनावट परवानगी दाखवून सिध्दीविनायक नावाची बहुमजली इमारत उभारली असल्याची तक्रार जुन 2016 ला ऍड.पी.एन ओझा आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार काकडे यांनी महापालिकेकडे केली होती. त्यावेळी तत्कालीन सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी या इमारतीची बांधकाम परवानगीची प्रत  उपसंचालक नगररचना विभागाकडे पडताळणीसाठी पाठवली होती.त्यावेळी ओझा आणि काकडे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न होतानाच अरुण जाधव यांनी अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून केलेले धक्कादायक प्रकार उघडकिस आला.

सिध्दाविनायक इमारत तयार करून त्यातील फ्लॅटची विक्री करण्यासाठी जाधव यांनी बनावट परवानगीचा वापर केल्याचा अभिप्राय उपसंचालकांनी पडताळणीनंतर दिला.तसेच सदर बांधकाम आणि बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.असे आदेश नगररचना विभागाने सहाय्यक आयुक्तांना दिले होते.त्यानंतर पालिकेने जाधव यांनी नोटीस बजावली,तरिही या बांधकामाचा वापर करण्यात येत होता.पालिककेकडे ठोस पुरावे असतानागी तरिही अरुण जाधव आणि त्यांच्या या इमारतीवर कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती.अरुण जाधव हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक असल्यामुळे राजकिय दबावाखाली कारवाई करण्यात येत नव्हती.त्यानंतर प्रेमसिंग यांची बदली झाली.त्यामुळे हे प्रकरण रेंगाळले होते.

त्यानंतर बदलून आलेले सहाय्यक आयुक्त विजय चव्हाण यांनी या प्रकरणाचा अभ्यास करून 12 एप्रिल ला तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार केली.अनधिकृत इमारत अधिकृत दाखवून अरुण जाधव यांनी आर्थीक फायद्यासाठी सिडकोचे खोटे लेटरपॅड वापरले,बनावट बांधकाम परवानगी तयार केली त्यातून लोकांची आणि शासनाची फसवणूक जाधव यांनी केली तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवला.असे चव्हाण यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी अरुण जाधव यांच्यावर 420,465,467,468,471,474,34 आणि महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52,53,54 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळींजचे पोलीस निरिक्षक डॅनियल बेन यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.तर या प्रकरणाचा तपास उपनिरिक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.दरम्यान,गुन्हा दाखल झाल्यानंतर अरुण जाधव हे शहरातून गायब झाल्यचे समजते.जाधव हे बहुजन विकास आघाडीचे प्रभाग क्र.52मधील नगरसेवक आहेत.त्यामुळे त्यांना अटक न करण्यासाठी पोलीसांवर राजकिय दबाव असल्याची  श्यता व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी डॅनियल बेन यांच्याशी संपर्क साधला असता,गुन्हा दाखल झाला आहे आणि अटकेचे प्रयत्न सुरु आहेत.अशी त्यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!