बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ देतांना जाचक अटी नकोत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य शासनाने ज्येष्ठ पत्रकारांसाठी कै बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना फडणवीस शासनाने सुरू केली .पण घोषणा होऊन दीड वर्ष झाले तरी फक्त ३५० पैकी १०० ज्येष्ठ  पत्रकारांचे प्रस्ताव मंजूर झालेत .जळगाव, धुळे, नंदुरबार या आदिवासी व ग्रामीण भागातील एकही पत्रकार या योजनेसाठी पात्र ठरलेला नाही, हे अन्यायकारक आहे अशी तक्रार जळगाव जिल्हा पत्रकार संघाने ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. विजयबापू पाटील, अशोक भाटिया, अनिलदादा पाटील, दिलीप शिरुडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावर पवारांनी सहानुभूती पूर्वक ऐकून मुंबईस भेटायला बोलावले आहे .

  फडणवीस शासनाला पैसा असून सर्व प्रकारच्या मंजुऱ्या असूनही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आणि काही आडमुठया पत्रकारांमुळे ही यशस्वी न करता आलेली ही योजना आहे. ३०/४० वर्षापूर्वीचे अंक, नेमणूक पत्रे, कात्रणे, इ. चा कमालीचा आग्रह, वेतन चिट्ठी, डिक्लरेशन, पोस्टाचा परवाना, शासन मान्यता, इ जाचक निकष यामुळे पात्र व खऱ्या पत्रकारांवर अन्याय झाला आहे. विशेषत: ग्रामीण व खेडयातील लहान वृत्तपत्रांचे पत्रकार भरडले गेले आहेत. वयाची ७०/७५ वर्षे गाठलेले पत्रकार व्याधीग्रस्त, अपंग व गलित गात्र किंवा अंथरुणाला खिळलेले आहेत.ते आता धावपळ करून पुरावे जमा करू शकत नाहीत. शिवाय ३०/४० वर्षांपूर्वीची कागद पत्रे त्या वेळी महत्वाची वाटली नाहीत. घर बदलले, भाडयाचे घर खाली करतांना, नवे बांधताना जुनी कागदपत्रे कात्रणे रद्दी म्हणून बाहेर फेकली जातात. पावसाळयात धाब्याचे घर गळते तेव्हा ते जुने पेपर नष्ट  होतात. हेही ध्यानात घेऊन नियम शिथिल केले पाहिजेत.

 पत्रकारांनी ३०/४० वर्षांपूर्वी जी कागदपत्रे शासनाला दिलीत, तीच शासन आज त्यांना मागत आहे, ती शासनाकडेही उपलब्ध नाहीत. शासन जी कागदपत्रे सांभाळू शकले नाही ती पत्रकारांनी संभाळणे अवघड आहे.

 हे या योजनेचे आणि शासनाचेही पहिलेच वर्ष आहे. म्हणून फार जाचक व लष्करी खाक्याचे नियम शिथिल करावेत व सरसकट सर्व अधिस्वीकृती धारकांचे प्रस्ताव मंजूर करावेत. ज्येष्ठ पत्रकार १०० रु. च्या स्टॅम्पवर एफेडेवीट करुन देतात. थोडाफार पुरावा असेल तर तो ग्राह्य धरावा, मानवी चेहरा ठेऊन प्रकरणे मंजूर करावीत. फार कडक नियम नकोत अशी विंनंती पत्रकार संघाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!