बाळासाहेब अखेर उद्धवने ‘मुख्यमंत्रीपद घेऊन (करून) दाखवल’च ! – योगेश त्रिवेदी

बाळासाहेब ! २३ जानेवारी १९२६ रोजी या वसुंधरेवर आपण अवतार घेतलात. भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्यहम ॥ परित्राणाय साधूनाम । विनाशाय च दुष्कृताम ॥ धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

बाळासाहेब, आज आपली ९४ वी जयंती. खरं म्हणजे आपण आमच्यातच आहात. त्यामुळे जयंती म्हणणे माझ्या द्रुष्टीने अप्रस्तुत वाटते. भगवान श्रीकृष्णाने धर्माला जेंव्हा जेंव्हा ग्लानि येईल, तेंव्हा तेंव्हा मी अवतार घेईन. धर्माच्या रक्षणासाठी माझा अवतार असेल. आणि त्याच न्यायाने आपण या कलियुगात अवतार धारण केलात. आपण आंतरराष्ट्रीय कीर्ति चे व्यंगचित्रकार होतात. आपण फर्डे वक्ते होतात. आपल्याला राजकारणातले छक्केपंजे कधी कळलेच नाहीत. जे ओठात तेच पोटात आणि जे पोटात तेच ओठांवर असा आपला परखड स्वभाव. आपण ज्याच्यावर विश्वास टाकलात, ज्याच्यावर प्रेम केलेत ते अगदी मनापासून. त्यामुळे आपल्या चांगुलपणाचा अनेकांनी गैरफायदा घेतला. आपण अनेक दगडांना शेंदूर फासले, त्या प्रत्येक व्यक्तीला आपण देवच झालो आहोत, असा त्याचा गोड गैरसमज झाला. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह ८६५ मराठी भाषिक गावांनी संयुक्त महाराष्ट्राच्या कोंदणात सहभागी होण्यासाठी संघर्ष केला. पण १९५६ पासून आजतागायत ते महाराष्ट्रात येऊ  शकलेले नाहीत.

१ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली, परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. म्हणून बाळासाहेब आपण १३ ऑॅगस्ट १९६० रोजी जगाच्या पाठीवरच्या पहिल्या अशा ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा प्रारंभ केलात आणि मुंबईत असलेल्या आस्थापनांमधील बिगर मराठी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची ठळकपणे नांवे प्रसिध्द करुन ‘वाचा, आणि थंड बसा’ असा मथळा दिलात. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी आपण १९ जून १९६६ रोजी ति. स्व. दादांच्या (प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे) यांच्या साक्षीने ‘शिवसेना’ स्थापन केलीत. ति.स्व.दादांनीच शिवसेना हे नांव या जाज्वल्य स्वाभिमानी संघटनेला दिले. हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे, हे दादांचं वाक्य होतं. हां हां म्हणता शिवसेना मुंबई, ठाण्यापासून पुढे मराठवाडा, विदर्भापर्यंत फोफावली. आपले परममित्र शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडविल्या. त्यातलीच एक म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्ष युती. आपण स्वत: च ही गोष्ट मान्य केली आहे. कारण ओठात एक आणि पोटात एक असा आपला स्वभावच नव्हता मुळी. आपण डॉ. बालाजी तांबे यांच्या कार्ला (लोणावळा जवळ) येथे गेला होतात आणि त्या मतदारसंघात असलेले शरदरावांचे विश्वासू आमदार मदनशेठ बाफना (ते तेंव्हा मंत्रीही होते) आपल्या स्वागतासाठी आले. विनम्रपणे आपल्याशी बोलतांना आपण त्यांना म्हणालात, ‘ या, मदनशेठ या. अहो तुमच्या त्या XXXXX साहेबाने त्या कमळाबाईला माझ्या मांडीवर बसवले आहे’. हा किस्सा स्वत: मदनशेठ बाफना यांनी आमच्या सोबत दिलखुलास गप्पा मारतांना बऱ्याच वेळा सांगितलाय.

हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना भारतीय जनता पक्ष युती झाली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात. मुळात भारतीय जनता पक्षाच्या धाटणीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बसूच शकत नाही. ‘पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए वैसा’, हीच आपमतलबी प्रवृत्ती या पक्षाची सुरुवातीच्या काळापासून आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा हा पक्ष असल्याचे सांगितले जाते परंतु त्यांच्याशी यांना काही देणेघेणे नाही. जेव्हा सोयीचे असेल तेंव्हा संघाच्या शाखेत जायचे, एवढाच काय तो संबंध. अर्थात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी असे काही अपवाद निश्चितच आहेत. पण प्रत्येकाचा ‘वापर’ हा आपल्या फायद्यासाठी करुन घ्यायची यांची प्रवृत्तीच. बाळासाहेब, आपणच खरे समाजवादी आणि आपणच खरे हिंदुत्ववादी. आपण कधी जातपात मानलीच नाही. ब्राह्मण म्हणून आपण डॉ.मनोहर गजानन जोशी यांना मुख्यमंत्री केले नाहीत की नारायण राणे मराठा म्हणून त्यांच्यावर महत्वाच्या पदांचा वर्षाव केला नाहीत. मग ते शाखाप्रमुख पद असो, बेस्ट चे अध्यक्ष पद असो, आमदारकी, मंत्री पद अगदी मुख्यमंत्री पद सुध्दा आपण राणेंना बहाल केलंत छगन भुजबळ यांना माळी म्हणून महापौर केलं नाहीत की आमदारकी दिली नाहीत. लीलाधर डाके यांना आगरी म्हणून प्रबोधन प्रकाशन च्या विश्वस्त, आमदार, मंत्री या पदांवर बसविले नाहीत. अहो, अत्यंत कडवट मुसलमान असलेल्या साबीरभाई शेख यांना महाराष्ट्राच्या कामगार मंत्री पदावर विराजमान केलेत. कुणालाही तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा म्हणून पदे, लालदिव्यांच्या गाडया दिल्या नाहीत प्रत्येक व्यक्तीला त्याची क्षमता ओळखून एखाद्या कसलेल्या रत्नपारख्याच्या नजरेतून आपण पदे भरभरुन दिलीत.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उध्द्वस्त झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांनी पत्रकारांना उत्तर देताना, ‘नहीं,  वो आर.एस.एस के नही थे, बजरंग दल के नहीं थे, विश्व हिंदू परिषद के नही थे, भारतीय जनता पार्टी के नहीं थे. शायद वे शिवसेना के होंगे.’ असं सांगून काखा वर केल्या. त्याचवेळी वांद्रे येथील कलानगर, मातोश्रीवरुन आपण वाघाची डरकाळी फोडलीत आणि ‘जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे, अभिमान आहे,’ असं ठणकावून सांगितले. हेच आपले बावनकशी खणखणीत हिंदुत्व आहे. ‘महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरात मध्ये राहतो तो गुजराती, बंगाल मध्ये राहतो तो बंगाली, या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचे हिंदुत्व हे शेंडीजानव्याचे नव्हे तर आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे’ ही आपली सरळसोट हिंदुत्वाची व्याख्या ११ डिसेंबर १९९५ रोजी डॉ.मनोहर जोशी यांच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्या.मू.जे.एस.वर्मा यांनी सुध्दा मान्य केली आहे. त्यामुळे आपण जसे खरे समाजवादी तसेच परखड हिंदुत्ववादी आहात, हे भारतातील तमाम हिंदूच नव्हे तर आपल्याला पाण्यात पाहणारा पाकिस्तान सुध्दा मान्य करतो. एकदा पाकिस्तान ने तर आम्ही आमच्या तुरुंगातील सारे भारतीय कैदी सोडतो तुम्ही एक बाळ ठाकरे आमच्या ताब्यात द्या, असेही म्हटले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, खासदार वसंतराव चव्हाण यांनी ‘आमचे कितीही वैचारिक मतभेद असतील पण बाळासाहेब ठाकरे हा आमचा एक अलंकार आहे, दागिना आहे, आम्ही तो मुळीच देणार नाही, अशी ठणकावून सांगणारी प्रतिक्रिया दिली होती, जी दैनिक सामना मध्ये पहिल्या पानावर मुख्य मथळयात छापली होती. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेबरोबर युती केली. परंतु ती करतांना मखलाशी अशी केली की विदर्भात जास्त जागा स्वत: कडे घेतल्या तर शिवसेनेच्या पारडयात कमी जागा टाकल्या आणि ज्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या शिवाय कुणीही त्यावेळी निवडून येऊ  शकत नव्हते, त्यावेळी जास्त जागा पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या वाटयाला आल्या. गुलाबराव गावंडे या मराठा महासंघाच्या नेत्यांनी आपला महासंघ शिवसेनेत समाविष्ट केला आणि स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात शिवसेनेची भूमिका असतांना भारतीय जनता पक्षाने तिथे जास्त जागा लढविल्या. परिणामी शिवसेनेच्या जास्त जागा लढवून कमी आणि भारतीय जनता पक्षाच्या कमी जागा लढवून जास्त जागा निवडून आल्या. शिवसेनेला १७१ पैकी ५२ आणि भारतीय जनता पक्षाला ११७ पैकी ४२ अशा ९४ जागा १९९० साली युतीला मिळाल्या होत्या. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. म्हणून शिवसेनेच्या जागा पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केले. १९९१ साली छगन भुजबळ यांनी १५ आमदार सोबत घेऊन शिवसेना सोडली त्यावेळी डॉ. मनोहर जोशी हे विरोधी पक्षनेते असतांना भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ. मनोहर जोशी यांनी पत्रकार परिषदेत युतीचा नेता म्हणून विरोधी पक्षनेता राहू शकतो, असे स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे यांनी हो म्हणून सुध्दा प्रेमकुमार शर्मा यांनी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांच्याकडे भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा करीत असल्याचे पत्र दिले. तेंव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सामना मध्ये पहिल्या पानावर ‘लोणी, बोका आणि सिंक’ असा अग्रलेख लिहून आपली नाराजी जाहीर केली होती. १९९९ सालीच प्रमोद महाजन यांनी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचे संकेत दिले असल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि ‘शत प्रतिशत भाजप’ अशी  घोषणा सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनी केली होती. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फाजील आत्मविश्वास आणि असुरी महत्वाकांक्षा यामुळे शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची सत्ता येऊ शकली नाही. बाळासाहेब, आपण हळूहळू शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत फेरबदल करीत होतात. महाबळेश्वरला झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात नेते आणि पदाधिकारी यांच्या आग्रहाखातर उध्दव ठाकरे यांना आधी शिवसेनेचे कार्यप्रमुख बनविलेत. मी आपल्यावर नेतृत्व लादणार नाही, तुम्हाला उध्दव मध्ये नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेले गुण दिसत असतील तर बेलाशक स्वीकारा, असे ठणकावून सांगितलेत.

२००५ साली नारायण राणे यांनी आणि २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. पुत्रवत प्रेम करुनही हे दोघे वेगळे झाल्यावर आपण थोडेसे नाराज झालात. साहजिकच आहे. पण काही जण स्वत:ला स्वयंप्रकाशित समजत असतील तर त्याला आपण काय करणार ? असो, परंतु पुढे उध्दव ठाकरे यांनी विविध निवडणुकीत आपले नेतृत्व सिध्द केले. आपण १७ नोव्हेंबर २०१२  रोजी या विश्वाचा निरोप घेतला. केवळ मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थान नव्हे तर अवघे विश्व आणि अवघा हिंदु बांधव हळहळला. अनेकांचे अश्रू थांबत नव्हते. २०१४ ची निवडणूक आली. नेहमीप्रमाणे शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला. आपल्या नातवाने म्हणजेच उध्दवपुत्र आदित्य ठाकरे यांनी आपले नेतृत्व गुण दाखवायला सुरुवात केली. १५१+ चा नारा आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसेनेचे मुख्यमंत्री बनविण्यासाठी तेंव्हाच बीजारोपण केले होते. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नांवावर उडया मारायला सुरुवात केली होती. लोकसभेत घवघवीत यश मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे हात गगनाला भिडले होते. पण गोपीनाथ मुंडे यांचे दुर्दैर्वी निधन झाले आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या ‘शाखेला’ झटका बसला. गोपीनाथ मुंडे यांनी सोशल इंजिनिअरिंग करुन, मातोश्रीवर आपला रिश्ता कायम राखीत, सारे गैरसमज मिटवून वातावरण चांगले तयार केले होते. त्यामुळे मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र भाजप सरबरीत झाल्यासारखा झाला असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेने ज्या जागा कधीच जिंकल्या नाहीत त्या जागा आम्हाला द्या आणि ज्या जागा आम्ही हरत आलो आहेत त्या आम्ही तुम्हाला देतो, असा एक शेखचिल्लीसारखा प्रस्ताव शिवसेनेला दिला. उध्दव ठाकरे हे काय लल्लूपंजू वाटले काय ? यापेक्षा २८८ पैकी १४४/१४४ अशा निम्म्या निम्म्या जागा देऊन टाका नां ? पण ‘तुझे ते माझे आणि माझे ते माझ्या बापाचे’ असं कुणी म्हणत असेल तर मग नाईलाज म्हणावा लागेल. अखेर २५ सप्टेंबर २०१४ रोजी एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबरची युती तोडत असल्याची घोषणा केली. त्या नंतर बाळासाहेब, आपल्या अनुपस्थितीत पण आपल्याच आशीर्वादाने उध्दव ठाकरे यांनी अभिमन्यू सारखी एकहाती लढत देत शिवसेनेकडे २८८ पैकी ६३ जागा खेचून आणल्या. शिवसेना विरोधी पक्षात बसली. शरद पवार यांच्या नांवाने बोटं मोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्वत:च्या सरकारचे बहुमत सिध्द केले. परंतु बुध्दिचातुर्य दाखवून देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर चंद्रकांतदादा पाटील आणि धर्मेंर्द्र प्रधान या दोन दूतांना पाठवून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समवेत चर्चा करुन शिवसेनेबरोबर तडजोड घडवून आणली आणि या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार स्पष्ट बहुमत मिळवीत हलवून खुंटा बळकट केला. २०१९ पर्यंत हे सरकार जागेवरून हलू शकत नव्हते. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सोयीची व्हावी याद्रुष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भरीस घातले.

१८ फेब्रुवारी २०१९ रोजी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बरोबर रेनीसान्स, मातोश्री येथे प्रदीर्घ चर्चा केली. या फक्त दोन पक्षप्रमुखांमध्ये झालेली चर्चा देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हती. त्यामुळे २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पदांचे समसमान वाटप करण्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्या खिजगणतीतही नव्हता. त्यामुळेच २४ ऑॅक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्या मागणीला जुमानले नाही. उध्दव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या सर्वच प्रकारच्या वागणूक/वर्तणुकीचा सोक्षमोक्ष लावून विश्वासघात करणाऱ्यांची नांगी ठेचायची होती. बाळासाहेब, उध्दव ठाकरे यांनी ‘या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शिवसैनिकालाच बसविणार’ असे वचन आपल्याला दिले होते. पदांच्या समसमान वाटपात मुख्यमंत्री हे पद येत नसल्याची धारणा कदाचित देवेंद्र फडणवीस यांना असावी. म्हणून ते मान्य करायला तयार नव्हते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे समोर आले नाहीत. अमित शाह हे आले खरे पण फार उशीरा ‘बंद कमरेमें जो बातें हुई, वह जाहिर करना मुनासिब नहीं,’ असं म्हणत अमित शाह यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ अशी मनाशी खुणगांठ बांधून उध्दव ठाकरे कंबर कसून कामाला लागले. भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी प्रत्येक राज्यात मित्रपक्षांचा केसानेच गळा कापला आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या मित्रपक्षांना नमविण्याचाच डाव भाजप खेळत आलाय. मायावती, जयललिता, प्रकाशसिंह बादल, नितीशकुमार, नवीन पटनाईक, मेहबुबा मुफ्ती आदींचा केवळ सत्तेचा सोपान चढण्यासाठी उपयोग करून घेतला. बाळासाहेब, आपल्याला ते नमवू शकले नाहीत, परंतु इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी यांना अटलबिहारी वाजपेयी यांनी बदलण्यासाठी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. लालकृष्ण अडवाणी मातोश्रीवर आले, बाळासाहेब, आपल्याला ते भेटले. तेंव्हा आपण त्यांना ठणकावून सांगितले की, नरेंद्र मोदी को मत हटाओ, नरेंद्र मोदी गया तो समजो गुजरात से भाजपा गया. शंकरसिंग वाघेला भारतीय जनता पक्ष सोडून बाहेर पडले, ते मातोश्रीवर आले आणि आपल्याला म्हणाले, बालासाहब, आप मुझे शिवसेना मे प्रवेश दो, मैं शिवसेना का गुजरात का मुख्यमंत्री बनूंगा. पण आपण ठणकावून सांगितले की आम्ही वाघ आहोत, वाघेला नहीं. मित्रपक्षाला सांभाळून घेण्याची आपली दानत होती. अन्यथा अख्खा गुजरात आपण ठरवले असते तर शिवसेनेच्या भगव्या रंगाने न्हाऊन निघाला असता. आता भारतीय जनता पक्षाने पंजाबात सुध्दा दात बाहेर काढायला सुरुवात केली आहे. या सर्वच गोष्टींचा हिशोब चुकता करुन, आपल्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत कुणाच्याही ध्यानी मनी नसतांना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या समर्थनानंतर उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारण्यासाठी संमती दिली आणि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी बाळासाहेब बरोब्बर २४ वर्षानंतर आपल्या आवडत्या शिवतीर्थावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या करवी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपल्याला दिलेले वचन पूर्ण केले.

बाळासाहेब, महाराष्ट्र विधानसभेत उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आणि आपले प्रपौत्र आदित्य ठाकरे हे पर्यटन व पर्यावरण मंत्री म्हणून पहायला मिळाले. अगदी झपाटल्यासारखे उध्दव ठाकरे हे काम करीत आहेत, स्पष्ट, परखड, संयमी, निर्णयक्षम असा विवेकी मुख्यमंत्री महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला मिळाला. काही वेळा काहींना स्मृती भ्रंश होतो की काय ? अहो बाळासाहेब, देवेंद्र फडणवीस भर सभागृहात म्हणाले की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित येत असतील तर काहीही शक्य आहे. बाळासाहेब, का हो २२ नोव्हेंबर २०१९ च्या संध्याकाळी वरळीच्या नेहरू सेंटर मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिनही पक्षांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नावावर महाराष्ट्र विकास आघाडी चे नेते म्हणून शिक्कामोर्तब केले. पण २३ नोव्हेंबर २०१९ च्या भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतांनाच त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे कोण होते ? बरोबर नां साहेब ? अहो, उध्दव ठाकरे यांनी शपथ घेण्यापूर्वी वसंतराव नाईक यांच्या नंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाचा विक्रम ज्यांच्या नांवे होता तेच देवेंद्र फडणवीस हे केवळ ऐंशी तासाचे मुख्यमंत्री हाही विक्रम स्वत:च्या नांवावर नोंदविते झाले. २३ नोव्हेंबर २०१९ ची सारी वृत्तपत्रे रद्दी त पाठविणाऱ्या विक्रमादित्य व्यक्ती ला उध्दव ठाकरे यांनी विरोधी बाकांवर बसविले. उध्दव ठाकरे माझे मोठे भाऊ आणि नरेंद्र मोदी उध्दव ठाकरे यांचे मोठे बंधू अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी साऱ्या नात्यांचाच बोऱ्या वाजविला. बाळासाहेब, शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं कधीच जमलं नाही. उलट आपल्याला कितीही शिव्याशाप देणारे समाजवादी खरे तर आपले खरे मित्र म्हणावे लागतील. १९५५ साली प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या समवेत श्याम नांवाच्या नियतकालिकात आपण व्यंगचित्र काढीत होतात. १९५६ सालच्या मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री यांच्या बरोबर संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेत ति. स्व. दादा हे शीर्षक द्यायचे आणि आपण ‘मावळा’ नांवाने व्यंगचित्र काढीत होतात. १९६६ साली आपण शिवसेना स्थापन केलीत आणि १९६८ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाचे प्रा.मधू दंडवते यांच्या बरोबर युती केलीत. राजापूर आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आपण प्रा. मधू दंडवते आणि प्रमिलाताई दंडवते यांना पाठिंबा दिला होतात. या समाजवादी साथींची संघ/जनसंघवाल्यांनी जनता पक्षात काय दुर्दशा केली ते जर पहायचे असेल तर नरीमन पॉईंटवरची भारतीय जनता पक्ष आणि जनता दल ही दोन कार्यालये पाहिली तरी कल्पना येऊ शकेल. जनता पक्षाच्या स्थापनेत समाजवादी पक्ष, भारतीय जनसंघ, भारतीय लोकदल आणि संघटना काँग्रेस या चार पक्षांचा समावेश होता. इंदिरा गांधी यांनी १९७५  साली आणिबाणी लादल्या नंतर जनता पक्ष १९७७ साली स्थापन झाला. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा खऱ्याअर्थाने १९७७ नंतरच फोफावल्या. समाजवाद्यांनी राष्ट्र सेवा दला कडे लक्ष दिले नाही. जनता पक्षात मोक्याची पदे संघवाल्यानी पटकावली आणि दुय्यम पदे नेहमीच समाजवाद्यांच्या वाटयाला आली. त्यामुळेच बाळासाहेब, आता उध्दव ठाकरे यांनी आपल्याला दिलेल्या वचनपूर्तीसाठी आणि भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्यासाठी शरद पवार यांच्यापासून काँग्रेस पक्षात असलेल्या समाजवाद्यांपर्यंत झाडून सारे एकत्र झालेले दिसताहेत. बाळासाहेब, खरंच आपण समाधानी, आनंदी झाला असाल नाही हे चित्र पाहून ? आपले आशीर्वाद उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पाठीशी सदैव राहोत आणि उध्दव ठाकरे-आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी जे जे स्वप्न उराशी बाळगले असेल ते पूर्ण करण्यासाठी त्यांना शक्ति मिळो. शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात,  अशोक चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या धुरिणांसोबतच आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, रोहित पवार, अमित देशमुख, त्रतुराज पाटील, धीरज देशमुख आदींची दुसरी मजबूत फळीसुध्दा कामाला लागली आहे. काही विपरीत ना घडो आणि हे महाविकास आघाडी च्या सरकारकडून बरीच वर्षे राज्यातील जनतेची सेवा घडत राहो, या मन:पूर्वक शुभेच्छा ! यासाठी या ‘टीम उध्दव’ला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, अशी एकवीरेचरणी विनम्र प्रार्थना ! बाळासाहेब, आपल्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: