“बुलेट ट्रेन” साठी वसईतील शेतकऱ्याने दिली चार गुंठे जमीन

वसई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसह अनेक राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध सुरु असताना आता वसई तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपली चार गुंठे जमीन देऊन बुलेट ट्रेन प्रकल्पांचा वसईतून श्री गणेशा केला आहे.
वसईचे उपविभागीय अधिकारी डॉ.दीपक क्षीरसागर यांच्या नेतृत्वायाखाली गुरुवारी नालासोपाराच्या बिलालपाड्यातील एका शेतकऱ्याने या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आपली चार गुंठे जमीन दिल्यावर प्रातांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर त्याची दुय्यम निबंधकाकडे नोंदणी केली आणि त्यामुळेच बुलेट ट्रेन बाबतच्या पहिल्या नोंदीचा वसई तालुक्यातून श्रीगणेशा झाल्याची माहिती स्वतः वसई प्रांताधिकारी डॉ.दीपक क्षीरसागर यांनी दिली.
बुलेट ट्रेन बाबत पालघर जिल्ह्यातील एकूण ७३ गावांतील जमिनी बांधीत होत असून हजारो एकर जमीन संपादित करण्याचे काम जिल्हास्तरावर महसूल प्रशासनाच्या वतीने विरोध डावलून सुरु आहे,आणि त्यासाठी सभा व शेतकऱ्यांशी चर्चा हि सुरु आहेत.याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प  लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः केंद्रासहित राज्यशासन गंभीर व आक्रमक आहे.
दरम्यान या एकूणच प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना त्यांच्या जमिनीचे सरकारी पातळीवर ठरवलेले दर हि निश्चित झाल्याने त्याची हि माहिती महसूल अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.त्यातच आता वसई तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींना देण्यात येणारे शासनाचे दर ही निश्चित करण्यात आल्याने सरकार अजून आक्रमक झाले आहे .
पालघर जिल्ह्यात एकूण ७३ गावे या प्रकल्पात बाधित होणार असून यामध्ये वसई-२२ पालघर -२८ ,डहाणू -१६ ,आणि तलासरी -८ अशी एकूण ७३ प्रकल्प बाधित गावे आहेत.
या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी ४ ही तहसील अंतर्गत शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना या प्रकल्पाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
पहिल्याच सभेत दिली जमीन 
महसूल प्रशासनाच्या बैठकीत जमिनीचा सरकारने ठरवलेला दर ही त्यांना सांगण्यात आला आणि पहिल्याच बैठकीत वसई तालुक्यातील नालासोपाऱ्याच्या बिलालपाडा भागातील शेतकरी श्रीकांत रामविलास पांडे यांनी सर्वे नं.११२ / ४ हि आपल्या मालकीची ३.९ गुंठे जमीन या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी देऊन वसई तालुक्यातून पहिली नोंदणी करून
एकप्रकारे नवीन वर्षात या बुलेट ट्रेन साठी पहिला मुहूर्त साधला आहे.या मोबदल्यात सरकारने या लाभार्त्यांला एकूण ३४ लाख ६९ हजार ९१५ रुपये इतका जमिनीचा मोबदला त्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे.
वसई- विरार मधील जमिनीचे दर निश्चित
विरार परिसरात गासकोपरी,कोपरी, शिरगाव, चंदनसार आणि विरार शहर एवढ्या गावातील काही परिसर प्रकल्प बाधित होत आहे या ठिकाणी शेती आणि बिनशेती साठी २ लाख ३६ हजारा पासून ते १२ लाख ८५ हजारापर्यंतचा प्रतिगुंठा दर निश्चित झाला आहे
तर नालासोपारा शहरातील बिलालपाडा, मोरे या गावात 21 लाख ९२ हजारा पासून ८ लाख ६२ हजार पर्यंत शेती आणि बिनशेती साठी प्रतिगुंठा दर निश्चित आहे.आणि वसई परिसरातील बापाणे ,पोमण ,ससुनवघर ,मोरी ,शिलोत्तर ,नागले ,सारजामोरी या गावांसाठी २ लाख ५७ हजार पासून २९ लाख ४० हजारापर्यंत प्रतिगुंठा जमिनीचा दर निश्चित केला गेला आहे.
ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये
● मुंबई- बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा ,सुरत, भरूच, वडोदरा ,आनंद,साबरमती आणि  अहमदाबाद ही बुलेट ट्रेनची स्थानके असतील
● पालघर जिल्ह्यातील विरार आणि बोईसर या दोन महत्वाच्या स्थानकावर  बुलेट ट्रेन थांबणार
● बुलेट ट्रेनची लांबी ५०८.१७ किलो मीटर
    आणि ताशी ३२० किलो मीटर एवढा तिचा वेग असेल
 ● मुंबईहून अवघ्या २ तासात ही ट्रेन शेवटच्या स्थानकात पोहोचणार
● या प्रकल्पासाठी १ लाख ८ हजार कोटी एवढा खर्च येणार
● जपान इंटरनॅशनल को-ऑप एजन्सी तर्फे (जेआयसीए)
   कडून वित्तपुरवठा
या प्रकल्पासाठी लागणारी जमीन
● सरकारी जमीन २.२३३१
● खाजगी जमीन ६०.४०२३
● आणि वन विभागाची जमीन ७.४५८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!