बुलेट पोस्ट : उद्धवजी, बाळासाहेबांना हे पटलं असतं का ?

मा. उद्धवजी ठाकरे,
शिवसेना पक्षप्रमुख.
जय महाराष्ट्र
मी अनेकवेळा या बुलेटपोस्टच्या माध्यमातून  महत्वाच्या विषयावर आपले लक्ष वेधले आहे. त्यात अनेक विषयांना वाचा फोडण्याचेही  काम केले. परंतु न्याय मिळाला नाही, हे मला कळविण्यास वाईट वाटते, असो.  प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून माझ्या स्वतःच्या आणि लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळण्याचे भाग्य मला लाभले आहे. मातोश्रीवर  मी पाहिले पाऊल ठेवले तेव्हा माझे वय होते २१, गिरगावात राहणारा मी एक बाळासाहेबांचा आजही एकनिष्ठ शिवसैनिक आहे… उद्धवजी गिरगावातील ११ क्रमांकची शाखा उभी करण्यात माझाही सिहांचा वाटा होता. पोलिसांच्या ससेमि-याला कसे तोंड दिले त्याची आठवण झाली की, मला आज ६९ वयातही ते दृश्य  समोर दिसते. मी शिवसैनिक असल्याचे कधीच मिरविले नाही, पण माझ्या रक्तात शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची रग नसानसात भिनलेली आहे. मी अधिक बोलण्यापेक्षा आपले नेतेमंडळी अधिक बोलतील, माझ्याविषयी…
मा. उद्धवजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं उचित स्मारक महापौरांच्या प्रशस्थ जागेत होत आहे आणि राज्य सरकारने त्यासाठी शंभर कोटीही मंजूर केले, याचा सर्वांना पराकोटीचा अक्षय आनंद आहे. मराठी माणसाला ताठ मानेने, त्याचा स्वाभिमान आणि मराठी अस्मितेसाठी बाळासाहेबांच्या योगदानाबद्दल सर्वांना आदर आहेच. परप्रांतीयांच्या जाचाला आम्ही कसे कंटाळलो होतो ते आमचं आम्हालाच ठाऊक आहे. ‘वाचा आणि गप्प बसा’ या ‘मार्मिक’ सवालाने  मुंबईकर खाडकन त्यावेळी जागा झाला. त्यामुळे मराठीचा दरारा आजही मुंबईत आहे. मोठ्या साहेबांचे स्मारक होतंय याचा सार्थ अभिमान तमाम मराठी जनतेला असणारच. बाळासाहेबांचे महापौर बंगल्यावर स्मारक होतंय पण मराठी माणसाचं एक मोठं स्वप्न पूर्ण होत आहे. मराठी माणसाचं  हे भव्य स्वप्न पूर्ण होत असतानाच शिवसेनाप्रमुखांचं एक स्वप्न कायम अपुरे राहिले आहे.  ते म्हणजे मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच मुंबईत स्मारकाच्या रूपाने काही तरी असावं असं त्यांना मनोमन नेहमीच वाटत होतं. त्यासाठी मुंबईच्या राणी व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनला ‘जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ रेल्वे टर्मिनस ‘ नाव द्यावे म्हणून त्यांचे प्रयत्न होते. परंतु  राष्ट्रकुल घोटाळा फेम तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ नाव जाहीर करून मध्येच ते कोलमडले. बरं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचे दैवत, त्यामुळे त्या नावाला विरोध करणे शक्यच नव्हते.
त्यानंतर, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला ‘मुंबई सेंट्रल जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट टर्मिनस स्टेशन’ नाव देण्यासाठी शंकरशेट वंशाचे सुरेंद्र शंकरशेट यांनी आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी गेली २५ वर्षे अथक प्रयत्न केले.त्यासाठी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे लोकसभेत अधूनमधून संधी मिळेल तेव्हा हा नामांतरांचा प्रश्न उपस्थित करतात, त्यांच्याही पदरात अपयशच आले आहे. इच्छा असूनही नाना शंकरशेट यांच्या नामाकरणाचे काम होत नसल्याने अरविंद सावंतही निराश झालेत. नाना शंकरशेट यांचं नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला केव्हा मिळेल ही शक्यता आता कमीच आहे, त्याच कारण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात सुरेश कलमाडीच भूत संचारलं आहे. मतांच्या बेगमीसाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आग्रह धराला आहे. सगळ्या ठिकाणी वोटबँकचे राजकारण, त्यामुळे दैवज्ञ ब्राह्मण या तुटपुंज्या समाजाला काय किंमत ? परंतु दैवज्ञ ब्राह्मण अर्थात सुवर्णकार समाजाने गिरगावात शिवसेना वृक्ष लावला, त्या वृक्षांचे महावृक्षात रूपांतर झाले. पण हे सुवर्णकार सोने नियंत्रण कायद्याखाली कायमचे खचले आणि हाती सोन्याच्या दागिन्या ऐवजी त्यांच्या हाती कथळाच्या वाळा आल्यात, असा पिंजलेला समाज ओबीसी आहे.  नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी ते काहीच करू शकत नाहीत. गिरगाव हा सेनेचा बालेकिल्ला,  सेना नेते दिवंगत प्रमोद नवलकर हे तर नानांवर सातत्याने लिखाण करत होते, पण त्यांनीही हात टेकले.
मा. उद्धवजी ठाकरे, नानांनी १८४८ मध्ये गिरगावात पहिली मुलींची शाळा त्यांच्या वाड्यात  स्थापन केली. ती शाळा आजही अस्तित्वात आहे, परंतु उध्वस्त धर्मशाळेसारखी उभी आहे. ती मुलींची शाळा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आहे. साहेब, नानांनी शाळेशेजारी मुलींसाठी बांधलेल्या क्रीडांगणावर कोणा बिल्डरचे लक्ष गेले आहे. त्या बिल्डरच्या समाधानासाठी पालिकेचे अधिकारी बिल्डर्सला साथ देत आहेत. सध्या या सुशोभित केलेल्या क्रीडांगणात आजूबाजूच्या टॉवर्स मध्ये राहणारे उच्चभ्रू रहिवाशी वापर करत आहेत. विशेष म्हणजे या उच्चभ्रू राहिवाश्याना नाना शंकरशेट यांची धोकादायक शाळा क्रीडांगणावर पडू नये म्हणून १५ फुटाची भिंत उभी केली आहे. क्रीडांगणाच्या बाजूला लोखंडी कुंपण  लावले जातात आणि तसा नियम आहे. पण याठिकाणी ऑर्थर जेल सारखी मोठी भिंत बांधली आहे.  शिवसेना नेत्या व आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी या शाळेला भेट दिली आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या बरोबर त्यांनी बैठकही लावली होती. त्या बैठकीत महापौरांच्या दालनात संबंधित प्रभाग आधिका-यांनी  नानांच्या शाळेची वीज व पाणी कनेक्शन सात दिवसात जोडून देण्यात येईल आणि क्रीडांगणाच्या बाजूला उंच उभारलेली भिंत पाडण्यात येईल, असे सांगितले. उपस्थित महापौर व आमदार निलम गोरे, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर सर्वांनी माना डोलावून समाधान व्यक्त केले. त्यानंतर १५ दिवसाने महापौराने दिलेल्या आदेशाचे काय झाले, ८५ वर्षाचे सुरेंद्र शंकरशेट यांनी पालिका  अधिका-यांना विचारले तेव्हा पालिका आधिका-याने नाना शंकरशेट यांच्या शाळेची व खेळाच्या मैदानाची जागा पालिकेच्या ताब्यात आहे. त्याचे काय कारायचे तो सर्वस्वी पालिकेचा अधिकार आहे, हे ऐकून नानांचे वंशज सुरेंद्र शंकरशेट यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच वाहू लागल्या. वयाच्या ८५ वर्षी मला हे ऐकावे लागत आहे, माझा जन्म फुकट गेला, असे त्यांनी उदगार काढले.
मा.उद्धवजी शेवटचा मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो. मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट यांचं स्मारक व्हावे म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक ऍड मनमोहन चोणकर यांनी व त्यांच्या स्मारक समितीच्या सदस्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. नाना शंकरशेट स्मारक समितीला वडाळा येथे १५०० स्क्वे. मीटर जमीन महापालिकेने दिली. परंतु नानांचा सुवर्णकार समाज आर्थिकदृष्ट्या दुबळा असल्याने ते स्मारकासाठी १२ कोटी रुपये करू जमा शकत नाहीत. या स्मारकाच्या कामास तीन वर्षांत सुरवात केली नाही तर मुंबई पालिकेकडे तो पाच  भूखंड परत स्मारक समितीला करावा  लागणार आहे. मा. उद्धवजी आपण या स्मारकासाठी सरकारकडून निधी उपलब्ध केल्यास नाना शंकरशेट  यांचे वडाळ्यात  भव्य स्मारक उभे राहील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटूंबातील प्रत्येक सदस्यांना नाना शंकरशेट यांच्या बद्दल आदर आहे. मा. उद्धवजी आपण या स्मारकासाठी मा.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यास नानांचं मुंबईत स्मारक होईल. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत आहे. निदान मुंबईचा आद्यशिल्पकाराचे स्मारक तरी मुंबईत राहावे, असे वाटते म्हणून हा पत्र प्रपंच…?   मुंबईतील मराठी अस्मिता बाळासाहेबांनी कायम ठेवली म्हणून त्यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या प्रशस्त  जागेत होत आहे, परंतु मुंबईचे आद्यशिल्पकार नाना शंकरशेट   यांच्या
स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे. बँकवोटच्या तत्त्व प्रणालीत नानांचे अफाट कार्य लोकांसमोर येऊ शकत नाही. यासाठी आपण पुढाकार घ्यावा. कारण आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते “उद्धव, माझे स्मारक प्रथम बाजूला ठेव, नाना आपले मुंबईचे आद्यशिल्पकार आहेत, त्यांच्यामुळे मुंबईत मराठी माणसासाठी शिक्षण, सांस्कृतिक, महाविद्यालये सुरू झालीत आणि मराठी माणसाच्या हुशारीची इंग्रजांना दखल घ्यावी लागली, म्हणून नानांच्या स्मारकाला प्राधान्य दे, १२ कोटी रक्कम मामुली आहे, जरा तुझं मुख्यमंत्र्यांबरोबर चांगल जमतंय, तर करून टाक नानांचं काम, मी करू शकलो नाही, तू केलंस तर मला नक्कीच समाधान मिळेल’, असे ते बोलले असते. बाळासाहेबांसाठी तरी एवढे करा, ही विनंती.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: