बुलेट पोस्ट : जन पळभर म्हणतील, हाय… हाय…

प्रिय,
मेजर कौस्तुभ राणे,
जयहिंद,
स्वप्न उराशी ठेवून लष्करात सामील झालास आणि अवघ्या २९ व्या वर्षी तू शहीद झालास. तुझ्याबरोबर तुझे तीन सहकारीही शहीद झालेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकड्या आता काही खुले युद्ध करू शकत नाही म्हणून दहशतवाद्यांची मदत घेऊन आपल्या भारताशी तो छुपे युद्ध करतोय. मात्र आपले राजकीय नेते भारत-पाक मधला काश्मीर प्रश्न कायमचा निकालात काढण्यास पूर्णतः अपयशी ठरले आणि गेली सत्तर वर्षे तुझ्या सारखे तरुण जवान धारातीर्थी पडलेत आणि पडताहेत. “जरा याद करो कुर्बानी…” एवढं बोलून आम्ही आमच्या मार्गाला लागतो ..जवान शहीद झाल्यावर त्यांना मानवंदना, पाकड्याला निषेधाचा खलिता पाठविणे, राष्ट्रपती, पंतप्रधान,संरक्षण मंत्री यांच्या बोथट संवेदना सुरू होतात… तुम्ही शहीद झाल्यावर औपचारिकता म्हणून येवढ्यापुरती त्या जाग्या होतात. संरक्षण मंत्री पुष्पचक्र शहीदांच्या पेटीवर ठेवून निघून जातात… आणि आम्ही भेकड ते मुकाट्याने पहात असतो व प्रत्येकजण नेहमीच्या कामाला लागतो… कारण जन पळभर म्हणतील हाय, हाय…
आपल्या देशात जवानांच्या शवपेटी खरेदीतही भ्रष्टाचार आढळून आला होता. हे तुला माहीतच असणार, परंतु त्या नालायकांकडे दुर्लक्ष करून तू मातृभूमीसाठी लष्करात सामील झालास… काय तरी समाजासाठी, देशासाठी करावं या विचाराने प्रेरित होऊन…  आणि तू केवळ ट्रेकिंगसाठी लष्करात गेलास तेही आई वडिलांना न सांगता… अर्थात आईवडील  नाही बोलतील म्हणून… पण तुझ्या वडिलांनी मला आणखी मुले असती तर त्यांनाही सैन्यात पाठविले असते… हे शब्द तू ऐकायला पाहिजे होतास… तुझा ऊर भरून आला असता…  तुझ्या वडिलांचे मन देशभक्ताने पेटलेले आहे, पण जगाला त्याची काय पर्वा ? आपले स्वतःचे पोटभरू मंत्री, नेते कधी असे बोलतात का ? नाही ना ?  त्यांना माहीत आहे हा सर्व खेळ तेरा दिवसाचा आहे, कारण ते पक्के जाणून आहेत… जन पळभर म्हणतील, हाय… हाय…!
मेजर कौस्तुभ, एक मात्र खरं आहे, तू नशीबवान ठरलास बघ…  तू शहीद झालास संपूर्ण मीरा रोड शोकाकुल झाला… तुझ्या कुटुंबियांना दिलासा दिला. वैभववाडीही शोकाकुल झाली, घरात अन्नही शिजलं नाही म्हणे…  तुझं दर्शन घेण्यासाठी   तीन तास लोकांची रीग लागली होती.  तुझ्या परिसरातील लोकांनी ट्रक फुलांनी सजविला, ज्या स्मशानभूमीकडे तुझा पार्थिव  नेण्यात येत होता त्या जाण्याच्या मार्गावर फुलांचा सडा पडला होता…  जागोजागी तुझ्यावर पुष्पवृष्टी होत होती… हा सर्व  प्रकार हेलावणारा होता… तुझ्या लष्करातील साथीदार ट्रकवर  होते, त्यांनी हे शोकाकुल वातावरण पाहून त्यांनाही  शोक आवरेना… मी स्वतः हे पाहिले आणि मन अस्वस्थ झालं… तुझ्यासारख्या तरुणांचे किती शवपेट्या पाहावे लागणार हे सरकार नावाच्या बोथड मनालाच ठाऊक… बरं त्यांचं काय जातं ? त्यांची माजलेली मुलं थोडीच सैन्यात भरती होतील ? तसं घडणार नाही कारण त्यांना देश नाही तर त्यांना आहे त्यांच्या संपत्तीचा अभिमान…  तुझ्यासारख्या जीवाची त्यांना काय पर्वा ? तू गेलास, शहीद या निव्वळ गोंडस नावाखाली तुझा सन्मान केला… त्यानंतर कोण कौस्तुभ राणे ? काहीच आठवणार नाही… कारण जन पळभर म्हणतील हाय… हाय…
काश्मीर प्रश्न ही देशाची कायमस्वरूपी भळभळती जखम आहे… पाकड्यांना व आपल्या पोटभरू नेत्यांना याचे राजकारण करायचे आहे आणि या अग्निकुंडात तुझ्यासारख्या तरुणांना उडी घ्यावी लागते आहे… हे दुर्दैवाने मला बोलावे लागत आहे. पूर्वीचे सरकार पुचाट निघाले… आताच्या सरकारने सर्जिकल स्ट्राईक करून स्वतःची ५६ इंच छाती बदडून घेतली आणि वर आपल्या पंतप्रधानांनी पाकच्या नवाब शरीफला वाढदिवसाला आमंत्रण नसतानाही शुभेच्छा देऊन आले… सव्वाशे कोटींचा देश, महासत्तेकडे वाटचाल करणारा आपला देश, फडतूस पाकिस्तानला भाव देऊन गोंजारत बसला आहे…  राजकीय नेते असे धरसोडीचं भूमिका स्वीकारू लागले तर पाकिस्तान आणखी वरचढ होणारच ?  आपल्या सरकारचं असेच धोरण राहणार असेल तर काश्मीर प्रश्न काही सुटणार नाही आणि तुझ्यासारखे आणखी कौस्तुभ देश रक्षणासाठी तयार आहेतच… त्यामुळे राज्यकर्त्यांना काही काळजी नाही… शस्त्र सामुग्री नसेल पण तुझ्यासारखे एकनिष्ठ देशभक्त लाखोंच्या संख्येत उभे आहेतच… मग काय? कशाचीच चिंता नाही या राजकारण्यांना…?  चितेवर जाण्यासाठी देशात तरुणांचाण साठा भरपूर आहे… आणि त्यात २०२० मध्ये जगात भारत हा सर्वात अधिक तरुणांचा लोकसंख्या असलेला देश… म्हणजे आपले आपमतलबी नेते ही तरुण ‘संपत्ती’ कशीही वापरतील…? अशा प्रवृत्ती विरुद्ध देशातील लोकांनी एकवटले पाहिजे, जसे व्हिएटनाममध्ये अमेरिकन सरकारच्या चुकीच्या धोरणाने अमेरिकन तरुण जवान मारले जात होते तेव्हा तेथील जनतेने सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता, तसे भारतीय जनतेने केले पाहिजे…  तसे घडेल का ? कारण कोणालाच तशी  फिकीर राहिली नाही…  ‘चलता है’, ही  मानसिकता हेच त्यांचे मुख्य कारण… मी बोलतो ते काय चुकीचं नाही… जन पळभर म्हणतील हाय, हाय…
प्रिय, कौस्तुभ…  तुला दत्तात्रय महादेव सत्रे या शहीदाच्या वीरपत्नी अश्विनीताईची कहाणी सांगतो…  पाच वर्षापूर्वी तिचे पती दत्तात्रय सत्रे हे शहीद झालेत… त्यांना मुलगी स्नेहा व मुलगा प्रेमदत्त ही दोन मुलं…   या वीरपत्नीला सरकारी मदत मिळण्यासाठी तीन वर्षे लागली…  त्यासाठी सरकारी कारभाराने शहीद दत्तात्रय यांची फाईल फिरविण्यातच धन्यता मानली. एवढं होतं न होतं ते बँकेच्या कर्मचा-यांकडून नियमांचा पाढा वाचून दाखविण्यात येऊन त्यांना बँकेचे उंबरठे झिजवायला लावले. आता त्यांची मुले खाजगी शाळेत आहेत स्नेहा चौथीत आणि प्रेमदत्त दुसरीत आहेत. ठाण्यातील स्थानिक आमदार, नगरसेवक आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्याने आश्विनीताईंनी आपली मुलं खाजगी शाळेत पाठवली… आणि या सर्वांनी त्यांच्याकडे पाठ फिरविल्याने त्यांना मुलांना खाजगी शाळेत टाकल्याचा आता पश्चाताप होतोय…  सरकारी मदतीवर त्यांचं भागत नाही… त्यांना फोन केल्यावर बोलतात ‘भाऊ, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी तरी डोनर बघा…’ कौस्तुभ, हे ऐकल्यावर तुझ्या वीरपत्नी कनिका आणि मुलगा                  याचं काय होणार? कसं होणार ? असा प्रश्न समोर उभा राहतो?  म्हणून येथे कोणाला  काळजी नाही. जो तो आपल्या कामात व्यस्त… म्हणून मला हे पटतं आणि समाजाची ती रीत आहे…  जन पळभर म्हणतील, हाय…हाय…
मेजर कौस्तुभ,  त्यादिवशी तुझा पार्थिव नेतांना होता तो सामान्य नागरिक…ते स्वतःहून त्यात सामील झाले. तो खरा तुझा चाहता होता. मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांनी त्यादिवशी प्रथम नागरिक म्हणून तुझ्या शवपेटीवर पुष्पचक्र ठेवून श्रद्धांजली वाहिली. परंतु याच डिंपल मेहता, आदल्या दिवशी तुझ्या घरासमोर नगरसेवक आनंद मांजरेकर याच्या डीजेच्या धामधुमीत चाललेल्या वाढदिवसात सामील झाल्या होत्या, त्यावेळी तुझे पूर्ण कुटुंब शोकाकुल वातावरणात होते. त्यांना ना त्याचं दुःख… केवळ कर्तव्य म्हणून आणि लोक लाजेस्तव त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि निघून गेल्या… खरं म्हणजे आनंद मांजरेकर यांनी जो निर्लज्जपणाचा कळस केला, त्याचवेळी त्याला पक्षातून काढायला पाहिजे होते. तुझ्या अपमानापेक्षा नगरसेवक पद मोठं होतं. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन छिंदमसारखे नगरसेवकाला पाठीशी घालणारे आणि सीमेवर लढणा-या जवानांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणारा आमदार प्रशांत परीचारक आजही मोठ्या दिमाखात शिवबाच्या महाराष्ट्रात वावरतोय… याला कारण वोटबँक… निव्वळ वोटबँक… तुला ज्या नेत्यांनी त्यादिवशी श्रद्धांजली वाहिली तो एक बोटबँक कारणीभूत होती… जवानांबद्दल अभिमान असता तर  असे अपमानास्पद विधान  किंवा वाढदिवस साजरे केले असते का ? बरं हे झालं राजकारण्यांचं… काही असंवेदनशील लोकांनी तुझ्या कुटुंबातील सदस्यांना मदत मिळावी म्हणून पैसे जमवायला सुरू केली, याशिवाय तुझ्या पत्नीच्या आवाजात एक क्लिप व्हायरल करून तुझं कुटुंब किती शोकाकुल आहे याचा बाजार करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच तुझ्या घरातल्यानी त्यावर नाराजी व्यक्त केली म्हणून बरं झालं, अन्यथा हा समाज शहीदांच्या नावाने काय भांडवल करू शकतो हे सांगता येत नाही… म्हणून येथे एखाद्याच्या मरणावरही “उद्योग” चालतो… कारण एकच… जन पळभर म्हणतील हाय…हाय…

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: