बुलेट पोस्ट : देवेंद्रजी, तुम्ही अस्थीकलश आणलं असतं तर…?

मा. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आणि आज संपुर्ण देश शोकाकुल आहे. हा शोक भाजपापुरती मर्यादित नाही तर प्रत्येकजण अटलबिहाराजींच्या जाण्याने दुःख व्यक्त करीत आहे.  वाजपेयी एका आजाराने त्रस्त असल्याचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना कळले तेव्हा त्यांनी  त्यांना वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला पाठविले होते आणि कवी मनाचे संवेदनशील अटलजी “आज मी जीवंत आहे, केवळ कॉंग्रेसमुळे” असे चारचौघात सांगत होते, तेव्हा ऐकणा-यांचे डोळे पाणावले आणि आजही हे शब्द कानावर पडले तरी  मन हेलावून जातं बघा… वयाच्या 33वर्षी लोकसभेत भाषण करतांना, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सभागृहात उपस्थित राहून अटलजीसारख्या तरुण पिढीच्या प्रतिनिधींचे भाषण ऐकत होते. अटलजींच्या परराष्ट्र धोरणावरील भाषण ऐकून ‘भारताचा उद्याचा पंतप्रधान’ म्हणून त्यांनी उल्लेख केला होता आणि तंतोतंत ते विधान खरे ठरले.
माजी दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी भारताचे परराष्ट्रीय धोरण व भूमिका मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात   अटलबिहारी वाजपेयी यांना देशाचे प्रतिनिधी म्हणून पाठविले. काँग्रेस पक्षाचा कट्टर विरोधक आणि संघ विचाराचे निस्सीम भक्त वाजपेयी यांना पाठविण्याची कल्पना तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांचीच… पण काँग्रेसमधील नेत्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी अटलजींना संयुक्त राष्ट्रसंघात पाठविले आणि त्यांनी काँग्रेस सरकारवर टिका न करता देशाचे परराष्ट्रीय धोरण जगासमोर मांडले. त्यामुळे एक मजबूत देश, लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता देश आणि विरोधी पक्षाला आपल्या देशात मानसन्मान दिला जातो हे जगाच्या व्यासपीठावर अधोरेखित झाले, असे हे कर्तृत्ववान अटलजी…
मा. मुख्यमंत्रीजी, आदरणीय अटलजी कसे होते हे मी काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. वयाच्या सातव्या वर्षीच अटलजींनी तुमच्या पाठीवर  प्रेमाचा हात ठेवून आशीर्वाद दिला आहे. त्यावेळी तुम्ही देशाचे नेते म्हणून पाहिले असेल. त्या आशीर्वादाच्या शिदोरीनेच्या आज तुम्ही राज्याचे प्रमुख आहात आणि भविष्यात देशाचे नेतृत्व करण्यास  भाग्यही आपल्याला मिळेल.  मा. देवेंद्रजी आता मूळ मुद्द्यावर येतो…  अटलजी हे सर्वव्यापी नेतृत्व होते… पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देश काँग्रेस मुक्त करण्याचे तुणतुणे वाजवत आहेत. आणीबाणीत अटलजींना तुरुंगात टाकले, पण त्यांनी कधीच इंदिरा गांधींचा तिरस्कार, दुस्वास केला नाही… अनेक पक्षांना एकत्रित ठेवून देशाचा यशस्वी कारभार केला, पण आज काय परिस्थिती आहे ? आज एनडीए मधून एकएक पक्ष बाहेर पडत आहे. प्रत्येकजण स्वबळावर लढण्याचा विचार करत आहे…  हे काय एकाएकी घडलं नाही… त्याला कारण भाजपाच्या डोक्यात गेलेली सत्तेची हवा… थोडक्यात अटलजी,  विस्मरणात गेले नसते तर त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची चांगली कान उघडणी केली असती. विस्मरणाने त्यांची केली सुटका, असेच काही आजची राजकीय परिस्थिती पाहून म्हणावेसे वाटते.
अटलजी अनंतात विलीन झाले… आता उरली ती त्यांची पवित्र अस्थि… पण दिल्लीहून या अस्थि कोण आणतय यावर आपल्या पक्षात चर्चा जोरात सूरु आहे. ज्यांच्या तोंडी अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव शोभत नाही, असे तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि मुंबईचे भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते दिल्लीहून महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल हेही सोबत आहेत. श्री. गोयल यांच्या घरी वाजपेयी यांचे जाणे-येणे होत हे सर्वश्रुत आहे. अटलजींना भाजपापुरती मर्यादित ठेवू नका, ते राष्ट्रपुरुष होते. या निमित्त पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रकर्षाने आठवण येते. जगात आणि देशात लोकांच्या हृदयात स्थान मिळविलेले ते जागतिक स्तरावरील महान नेते होते. अटलबिहारी वाजपेयी हे ही त्याच तोडीचे नेते होते. पोखरण येथील अणुबॉम्ब स्फोट हा अमेरिकेला भीक न घालता दिलेला इशारा आणि जगाने त्यानंतर भारताकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला तो केवळ अटलजीमुळेच… अशा या थोर विभूतीचे दिल्लीहून अस्थि आणण्यासाठी गल्लीतले नेत्यांना तुम्ही पाठविले… काय म्हणावं याला ? जवाहरलाल नेहरूंची अस्थि यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात आणली आणि नेहरूंचा उचित आदरांजली दिली. महाराष्ट्रात ज्यांना कोणीही विचारात नाहीत आणि तुमच्या पक्षातील नेत्यांच्या ते खिजगणित नाहीत असे रावसाहेब दानवे आणि चमकेश आशिष शेलार यांना तुम्ही पाठविले? अहो, देवेंद्रजी तुम्ही अटलजींचा अस्थीकलश आणला असता तर  महाराष्ट्राने त्यांचा योग्य असा सन्मान केल्याचे संदेश पोहचला असता. तुम्हाला वेळ नव्हता  तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते… नागपूरमध्ये जागोजागी भिंती रंगवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार त्यांनी केला, तो ही सायकलवरून… आज केंद्रात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे आणि महाराष्ट्रात त्यांचे स्थानही तितकेच सन्माननीय आहे… नितीनभाऊंच्या हस्ते अटलजींच्या अस्थि आणल्या असत्या तर महाराष्ट्राने अटलबिहारी वाजपेयी यांचा सन्मान केल्याचे समाधान मिळाले असते… हल्ली भाजपात पक्षासाठी अहोरात्र झटणा-या नेत्यांना वाईट दिवस आलेत… चटई घालणा-या नेत्यांपेक्षा ‘चटईक्षेत्रा’चा विचार करणारा आयात नेता कमळापेक्षा लोभस वाटतो… देवेंद्रजी तुमचं काही चुकलं नाही, कालाय   तस्मय नम: अशीच काहीशी तुमची अवस्था झाली आहे… !
कळावे…
आपला 

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: