बुलेट पोस्ट : नेत्यांची संपत्ती लुटायला काय हरकत ?

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,
जय महाराष्ट्र,
मी आतापर्यंत विविध विषयांवर आपणास बुलेटपोस्ट च्या माध्यमातून चार पत्रं लिहिलीत… चांगला प्रतिसाद मिळाला राज्याच्या जनतेकडून… मी बुलेटपोस्ट मधून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्यापर्यंत पोहचतात की नाही हे मला माहित नाही. परंतु आपल्या भाजपाचे आमदार बुलेटपोस्ट वाचल्यानंतर “देवेंद्रजींच्या कानावर ही माहिती घालतो” असे न विसरता आश्वासन देतात बिचारे… देतात की नाही, ते देव जाणो… असो.
आदरणीय देवेंद्रभाऊ, तुमच्या एका मोठ्या नेत्यांकडे, म्हणजे तुमच्यापेक्षा मोठ्या पदावरचे ते नेते आहेत, त्यांच्या सोबत गेल्या आठवड्यात गप्पा मारत असताना त्यांनी आपल्या देशात शेती व्यवसाय आणि ग्रामीण भागात असंतोष का वाढतोय ही माहिती नेहमी प्रमाणे त्यांनी आकडेवारीत सांगितली. आकडेवारीपेक्षा ग्रामीण भाग उध्वस्त होतोय ही भविष्यातील त्यांनी भीती व्यक्त केली ती किती सार्थ आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्या देशातील शेतक-यांना कर्जमाफी देऊन काहीही फायदा नाही. जरी सरकारने हमी भावाची जबाबदारी स्वीकारली असली तरी जागतिकीकरणामुळे आपल्या शेती क्षेत्राला आव्हान निर्माण झाले आहे, अस त्यांचं म्हणणं आहे. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही… हे विरोधी पक्षांना माहीत नाही असे नाही तर त्यांना त्यांचे ‘दुकान’ चालवावयाचे असल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा लपंडाव ते खेळत आहेत. तर सांगायचा हेतू असा की, ब्राझीलमध्ये साखरेचा प्रति किलो दर २० रुपये तर आपल्याकडे प्रति  किलो साखरेचा भाव ३४ रुपये, असं असेल तर आपल्या साखरेला कोण विचारणार सांगा? ही कथा झाली साखरेची पण इतर शेती उत्पन्नाबद्दलही अशी कडू गोष्टी त्यांनी ऐकविल्या… तर सांगण्याचा त्यांचा उद्देश एवढाच आहे की, जागतिकरणामुळे शेतीकडे एका वेगळ्या परंतु रिझल्ट ओरिएंटेड म्हणून पाहिले पाहिजे म्हणजे शेतक-यांच्या आत्महत्याही थांबतील आणि ग्रामीण भागातील तरुणांना ग्रामीण भागातच नोक-या मिळतील… राज्यात   बहुतअंशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने आणि कुटुंबात भावांमध्ये जमिनीचे वाटप झाल्याने दोन एकर जमीन एवढीच जमीन उरल्याने        शेतक-यांचे कुटुंब शहरांकडे स्थलांतर होत आहेत. ही वस्तुस्थिती त्या नेत्याने सांगितल्यानंतर त्यांनीच  महात्मा गांधींच्या विचार ‘खेड्याकडे चला’ गप्पांच्या ओघात किती महत्वाचे आहे हे त्यांनी सांगून टाकले. महात्मा गांधींचा खून झाला पण त्यांचा विचारांचा कोणीही खून करू शकला नाही. आता अमेरिका सरकारही गांधींच्या नावाने पुरस्कार देण्याचा विचार करत आहे. जिथे पिकते, तिथे शेतीला किंमत नसते… अशी सध्या अवस्था देशाची झाली आहे…असो.
तर सांगायचा उद्देश हा की, मी नुकताच विदर्भातील एका गावात गेलो असता तेथील काही तरुणांशी सहज संवाद साधला आणि तिथे सधन शेतक-यांची मुलेही सरकारच्या नावाने खडे फोडत होती. आता आत्महत्या करायच्या नाहीत, तर आमच्याकडून मते घेऊन कोट्याधीश झालेल्या नेत्यांची संपत्ती लुटली पाहिजे. शेतक-यांना फसवून कवडी मोलाने खरेदी केलेल्या त्या जमिनी शेतक-यांनी लुटल्या पाहिजेत… देवेंद्रजी या तरुण शेतक-यांच्या मुलांना प्रश्न पडलाय की निवडून येण्यापूर्वी आमचे नेते लाखोपती असतात परंतु आमदार,खासदार आणि मंत्री झाल्यावर करोडपती कसे होतात ? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. आता समाजमाध्यमावरची नेत्यांच्या संपत्तीची माहिती सहज मिळते… त्यामुळे ‘दूध का दूध, पानी का पानी’ स्पष्ट होते. नेते मंडळी शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, हॉस्पिटल्स सरकारी सवलीतीमधून उभे करतात, परदेशात कंपन्या काढतात, काही माजी मंत्र्यानी हवापालट करण्यासाठी परदेशात विशेषतः लंडनमध्ये बंगले बांधलेत ते माजी मंत्री आता ढगात गेलेत (ढगात गेले म्हणजे स्वर्गवासी झालेत) त्यांची मुले त्यावर आता मौजमजा करताहेत… साहेब त्यांचा हा राग म्हणजे भविष्यातील आक्रोशाची ठिणगी आहे. ग्रामीण तरुण ठार मेलेला आहे, त्याच्यात थोडा फार जीव आहे तो राजकीय  नेत्यांच्या संपत्ती उध्वस्त करण्यासाठी हाताची मूठ आवळत आहे. आपण आणि आपले सरकार डिजिटलच्या कितीही गप्पा मारल्या तरी त्यांच्या पोटाचा, नोकरीच्या समस्या कायमस्वरूपी तशाच्या  तशाच आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करण्यासाठी आपल्या तत्कालीन जनसंघाने डाव्यांच्या बरोबर आंदोलनात उडी घेतली, त्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचाराविरोधात वातावरण निर्माण करून आपण सत्तेत आलात. मग लोकांची विशेषतः तरुणांची भावना अशी आहे की,सरकार कोणाचेही असो, भ्रष्टाचार थांबणार नाही. त्यापेक्षा ज्या मंत्र्यांनी सात पिढ्यासाठी अफाट संपत्ती गोळा केली आहे त्यांची संपत्ती सरकारने जप्त केली पाहिजे आणि तसे घडणार नसेल तर लोकांनी तिस-या क्रांतीसाठी तयार झाले पाहिजे  असे त्यांना वाटू लागले आहे त्यांना… देवेंद्रभाऊ, समाजमाध्यमे सशक्त आहे, तुमचं ‘मुख्यमंत्री बोलतोय…’ हा कार्यक्रम लोकांना साद घालत नाही आणि पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ पेक्षा ‘धन की बात’ करो असे लोक बोलायला लागले आहेत.  सध्याचे वातावरण लोकांच्या मनाविरुद्ध घडत आहे, तुमचा पालघरमधील ‘साम,दाम,दंड,भेद’ प्रयोग भविष्यात यशस्वी होईल असं  वाटत असेल तर त्या भ्रमातून बाहेर पडा… महाराष्ट्राला ब-याच वर्षानंतर एक चांगला मुख्यमंत्री तुमच्या रूपाने मिळाला आहे, तुमच्याच हातून ग्रामीण समस्या सुटू शकतात म्हणून हा पत्रप्रपंच… असो, हा एक सांगायला विसरलो आपल्या पक्षात ‘हयात आणि आयात’ नेत्यांबद्दल चर्चा एकसारखी कानावर येतेय, जरा त्याकडे जातीने लक्ष द्या… हयात आपणास सदैव साथ देतील तर आयात आयती संधी कायमची शोधण्यासाठी तुमच्या अवतीभवती गिरक्या घालतील. त्याकडे दुर्लक्ष नको, अस मनापासून वाटते.
कळावे, लोभ असावा, लोभ वाढवावा !!

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: