बुलेट पोस्ट : श्रीमंत मराठे गप्प का ?

प्रति,
आदरणीय शरद पवारसाहेब,
जाणता राजा…
महोदय,
माझ्या व्हाट्सअपवर शीतल पाटील यांचा ??”उठ मराठ्या जागा हो! “आपल्यावर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहेत ते,  ओळख त्यांना … असे भावनिक आवाहन केले.  त्यांनी मराठयांचे साखर कारखाने, बँकेच्या पतसंस्था, शिक्षण संस्था किती आहेत याची आकडेवारी दिली आहे. पण ही यादी सत्य असेल तर शीतल पाटील यांच्या आवाहनाला साथ आणि दाद द्यायला पाहिजे. कारण  शीतल पाटील यांनी कोणाला बदनाम करण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही, उलट त्यांनी मराठा भावा बहिणींचा जटिल प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. याबाबतचा शीतल पाटील यांच्या संदेशात काँग्रेस सरकारच्या राजवटीत आणि त्याच बरोबर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकार असतांना किती मराठयानी शिक्षणसंस्था, साखर कारखाने, पतसंस्था उभारल्या आणि संपूर्ण मराठा समाजाला कसे वेठीला धरले याचे वास्तव चित्र उभे केले. विशेष म्हणजे हा संदेश चुकीचा असल्याचा खुलासाही कोणी मराठा नेत्याने केला नाही, म्हणूनच हे वास्तव विस्तवा सारखे आहे आणि या विस्तवाची धग श्रीमंत मराठयांनाकडे पोहचण्यापूर्वीच मोठ्या मनाने स्वतः ला उच्च प्रतिचे समजणा-या मराठयांनी दखल घेतलेली बरी, असे मला वाटते. आज जरी फडणवीस सरकारकडे आगीचा गोळा फेकला असला तरी ही आग आपल्यापर्यंत पोहचू शकते…
शीतल पाटील यांची पोस्ट वाचल्यानंतर आदरणीय पवारसाहेब आपली प्रकर्षाने आठवण झाली.  भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठा समाजाचा सत्तेत इतर समाजाच्या मानाने सर्वात मोठा सहभाग होता. सत्तेतील सवलतीचा फायदा घेऊन मराठयांच्या उद्धारासाठीच साखर कारखाने, दूध संस्था, सूत गिरण्या, हॉस्पिटल्स,  सहकारी बँका, वैद्यकीय, इंजिनिअरिंग महाविद्यालये समाजहिताच्या गोंडस नावाखाली सरकारकडून स्वस्त दरात जमिनी घेतल्या आणि साम्राज्य उभे केली. हेच कारखाने तोट्यात दाखवून तिचा लिलाव करून जवळच्या नातेवाईकांना देऊन पुन्हा स्वतःच्या पापाला समृद्ध करायचं अशी खेळी करून स्वतः च्या जीवनात नव्याने कात टाकायची. यात मोठी मेख म्हणजे आपण कारखाने वाचवितोय ते शेतक-याच्या हितासाठीच… साम्राज्याना राजकीय रंग चढविण्यात आले. घरणेशाहीच्या साम्राज्यात फक्त नावालाच गरीब मराठयांना कव्हेत ठेवण्यात आले, तेही स्वतःची आमदारकी आणि सत्तेची फळे चाखण्यासाठी…. आपल्या मराठा समाजाचे साम्राज्य उभं राहतेय केवढा तो अभिमान वाटत होतं माझ्या मराठयांना… पण आताचा तरुण मराठा शेतकरी चासनगला जागृत झाला आहे. पूर्वीचा साधासुधा शेतकरी फक्त मान हलवून नि नुसता हात वर करून मुकाट्याने मराठा नेत्यांना होकार देत होता, आता परिस्थिती तशी राहिली नाही. आताचा तरुण मराठा हात वर करणारा नाही तर प्रत्येक नेत्याकडे बोट दाखवून सवसल करणारा आहे. आम्हाला नक्षलवादी व्हायला लावू नका, असा सांगणारा हा तरूण मराठा एकाएकी बोलू लागला नाही, तर त्यामागे मराठा नेत्यांनी, मंत्र्यानी केलेली फसवणूक आहे. महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून मराठा नेत्यांच्या जमिनी कशा वाढल्या, प्रकल्पाच्या जमिनी अगोदरच मराठा शेतक-यांकडून कावडीमोलाने विकत घेऊन सात पिढयांची बेगमी कशी केली हे आताच्या तरुणांना कळू लागले आणि ‘आम्हाला नक्षलवादी होण्यास भाग पाडू नका” असा गर्भित इशारा देण्याची त्यांचावर वेळ आणली तुमच्या सारख्या नेत्यांनीच…  भविष्यात मराठा समाजाने हातात शस्त्रे घेतली तर ती राज्य सरकारवर आणि मराठा नेत्यांवरही चालवतील…  कालच टिव्हीवर  विनोद पाटील नाव असावे त्यांनी चर्चेत भाग घेतांना “आम्हाला ओबीसी कायम स्वरूपी नको, आमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर आम्ही स्वतः हुन ओबीसींचा त्याग करू”… असे सांगून मराठयांचा विचार काय आहे, हे ते सांगून मोकळे झाले. परंतु गरीब मराठा शेतक-यांच्या जमिनी हडप करून गब्बर श्रीमंत मराठे नेते या जमिनी गरीब मराठयांना देतील का? हा खरा प्रश्न आहे. सत्तेची फळे चाखून लंडनसारख्या शहरात बंगले आणि खासगी कंपन्या उभ्या केल्या आहेत याची माहिती पवारसाहेब आपण “जाणता राजा” म्हणून तुम्हाला माहीत असणारच… तेव्हा आपण पुढाकार घेऊन त्या नेत्यांना गरीब मराठा शेतक-यांना जमिनी द्यायला सांगा.  शीतल पाटील यांनी व्हाट्सअप वर पोस्ट टाकली आणि महाराष्ट्रभर ठराविक मराठयांचे ईस्ट इंडिया कंपनीसारखा कसा कारभार पसरला ते खालील साम्राज्याच्या उभारणीवरून दिसेल…
*साखर कारखाने -*
कोल्हापूर जिल्हा – एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14
सांगली – एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 ,
सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9
पुणे- एकूण 12 मराठा वर्चस्व 11,
सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12,
अहमदनगर – एकूण 17, मराठा वर्चस्व -15,
नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4 ,
नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1
जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 ,
औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6,
जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4,
बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5
हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2,
परभणी – एकूण 3, मराठा वर्चस्व 1 ,
नांदेड – 7, मराठा वर्चस्व 5,
उस्मानाबाद – एकूण 9, मराठा वर्चस्व 3,
लातूर – एकूण 10, मराठा वर्चस्व 6,
यवतमाळ – एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2 ,
अकोला – एकूण 2, मराठा-कुणबी 1 ,
अमरावती – एकूण 3, मराठा-कुणबी 1 ,
वर्धा- एकूण 2 मराठा-कुणबी 2 ,
नागपूर – एकूण 2, मराठा-कुणबी 2 ,
भंडारा-एकूण 1, कुणबी-मराठा 1
महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने – 170
 मराठा सम्राटांचे कारखाने – 124
मराठा सम्राटांच्या ब्यांका पतसंस्था 
1.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 31
2.जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक 29
3.प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 21451
4.कापूस जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था 164
5.सहकारी सूत गिरणी 167
6.सहकारी हातमाग संस्था 685
7.सहकारी यंत्र माग संस्था 1378
8.सहकारी दुध उत्पादक संस्था 27110
9.सहकारी दुध संघ 78
10.सहकारी मार्केटिंग संस्था 1779
मराठा नेत्यांचे  शिक्षण संस्था 
इंजिनअरिंग कॉलेज आणि इतर तंत्रशिक्षण संस्था – एकूण 2597, मराठा वर्चस्व – 2500
वैद्यकीय महाविद्यालये – एकूण 14, मराठा वर्चस्व 12
वैद्यकीय डेंटल महाविद्यालये – एकूण 25, मराठा वर्चस्व 20
आयुर्वेदिक कॉलेज – एकूण 40, मराठा 32
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून म्हणजे १९६० पासून राज्याचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते १९१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारात किती मराठा समाजाचे मंत्री होते त्याची माहिती पहा
यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1960
एकूण मंत्री -14 , मराठा मंत्री 6 
यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1962
एकूण मंत्री -17,  मराठा मंत्री 9 
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ – 1967
एकूण मंत्री -17, मराठा मंत्री 10 
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ – 1972
एकूण मंत्री -12 , मराठा मंत्री 4 
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ -1975
एकूण मंत्री -14, मराठा मंत्री 9 
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1977
एकूण मंत्री -23 , मराठा मंत्री 14
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1978( युती)
एकूण मंत्री -14, मराठा मंत्री 8
शरद पवार ( युती) मंत्रिमंडळ 1978
एकूण मंत्री -17, मराठा मंत्री 8
अ.र. अंतुले मंत्रिमंडळ 1980 एकूण मंत्री -15
मराठा मंत्री 9
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ 1983
एकूण मंत्री -14, मराठा मंत्री 6
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ 1986
एकूण मंत्री -8, मराठा मंत्री 5 
शरद पवार मंत्रिमंडळ (युती) 1990
एकूण मंत्री -15, मराठा मंत्री 9
मनोहर जोशी (युती) 1995
एकूण मंत्री -22,  मराठा मंत्री 4
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 1999( युती)
एकूण मंत्री -26, मराठा मंत्री 16
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2004( युती)
एकूण मंत्री-27, मराठा मंत्री 13
अशोक चव्हाण- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2010( युती)
एकूण मंत्री -29, मराठा मंत्री 14
पृथ्वीराज चव्हाण- नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2014
मंत्री -30, मराठा मंत्री 16
आदरणीय पवार साहेब ही पोस्ट चुकीची असेल तर विविध क्षेत्रातील श्रीमंत मराठे एक झाले असते, मात्र ”तेरी भी चूप, मेरी भी चूप” या अविर्भावात सर्वजण गप्प आहेत. तुमच्या पर्यंत ही पोस्ट आली नसेल आणि आपल्या आंधळ्या भक्तांनी मुद्दामहून नजरेत आणून दिली नसेल. आपले आवडते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपण अनेक लोकांवर कसे उपकार केले अडचणीला कशी मदत केली हे विधान सभेत  माहिती दिली होती. त्यामुळे मला वाटले महाराष्ट्राचे तुम्ही जाणते राजे आहात तुम्हीच सकल मराठा समाजासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजावरील बोझ हलका करावा.
पवारसाहेब, जसे आपण प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखता तसे या कथित मराठा साम्राटां च्या धंद्यातील चुरस कथा आपल्याला नक्कीच माहिती असणारच…  राज्याचे चारवेळा आपण मुख्यमंत्री होता त्याशिवाय केंद्रातही कृषिमंत्री होता. त्यामुळे कृषी विषयक संबंधित उद्योग व्यवसायातील प्रामाणिक चेह-यामागचे काळेबेरे आपाल्याला माहीत असणार म्हणून यानिमित्ताने मला आपल्या काँग्रेस सरकारचे संत पुरुष विनोबा भावे यांनी आठवण झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाची परिस्थिती फारच हालाखीची होती जशी आज मराठा समसजाची झाली आहे. त्यावेळी देशात प्रचंड प्रमाणात गरिबी, लोक अन्नाला मोताद, शेती करून धान्य पिकवावे तर जमीन नाही अशा प्रसंगी भूदान चळवळ सुरू केली ती १८ एप्रिल १९५१ मध्ये…  म्हणून मी म्हणतोय आपण जाणते राजे आहे सकल मराठा समाज आज अडचणीत असतांना मानपानाचा विचार न करता आपण समस्त श्रीमंत मराठयांना गरीब व नाडलेल्या मराठयांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करावे.  महाराष्ट्रावर भूकंप, बॉम्बस्फोट असे दुर्दैवी अपघात घडले तेव्हा सर्वांसमोर एकमेव नाव पुढे आले ते नाव “शरद पवार” हे होय. कठीण समयी कोण कामास येतो “जाणता राजा” … ही अपेक्षा आजही मराठा समाजाबरोबर राज्याची इतर समाजाची जनता आपल्याकडून अपेक्षा करीत आहे. हिमालय संकटात होता तेव्हा सह्याद्री धावून आला असे यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत बोलले जाते. तुम्ही तर यशवंतरावांचे वारसदार… तुमच्या पुढ्यात नियतीनं एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे… बघा पवारसाहेब संधी सोन करण्याची ही सुवर्णसंधी सोडायची की स्वीकारायची हे तुमच्या हातात आहे…
ठिक आहे, मी माझे विचार मांडले… ते ही माझ्या सकल मराठ्यासाठीच…
कळावे, लोभ असावा, लोभ वाढवावा…
आपला…

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: