बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँक आणि बँकेच्या सी.ई.ओ.सौ. ब्रिजदिना कुटिन्हो विशेष पुरस्काराने सन्मानित !

वसई : देशातील पहिल्या दहा नागरी सहकारी बँकात गणल्या जाणार्‍या बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँकेची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी ‘कै.पद्मभुषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट शेड्युल्ड सहकारी बँक’ म्हणून निवड करण्यात आली असून, या बँकेने सहकार क्षेत्रात गेल्या 100 वर्षात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल  ‘विशेष गौरव प्रशस्तीपत्र’ प्रदान करून बँकेस गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिजदिना कुटिन्हो ह्यांची सन 2018 वर्षासाठी नागरी सहकारी बँकामधून दिल्या जाणाऱ्या ‘कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सौ. कुटिन्हो या गेली तीस वर्षे बँकेत सेवारत असून विविध अधिकारी पदावरील जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यापुर्वीदेखील त्यांना बँकींग फ्रंटियरकडून ‘उत्कृष्ट सी.ई ओ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सोमवार, दि. 04 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता पु.ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्य मंदिर), प्रभादेवी,मुंबई येथे होणार्‍या असोसिएशनच्या 23 व्या पारितोषिक वितरण सोहळ्यात खासदार शरदचंद्रजी पवार, तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.सुभाषराव देशमुख ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे असोसिएशनच्या पत्रात म्हटले आहे.
बँकेचे सन 2017-18 हे शतक महोत्सवी वर्ष होते. दि.31 मार्च 2018 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेेने ठेवी रू. 6098.47 कोटी व कर्ज रू.4034.49 कोटी अशी आर्थिक प्रगतीची घोडदौड कायम राखत रू.10000 कोटी मिश्र व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. सन 2017-18 अखेर बँकेचे स्वनिधी रू.978.30 कोटी, ढोबळ नफा रू.141.21 कोटी असून बँकेने ढोबळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 3.94% राखले आहे तर निव्वळ अनुत्पादित कर्जे 0% आहे. बँकेचे पुंजी पर्याप्तता प्रमाण 16.87% तर एकुण भरणा झालेले भागभांडवल रू. 90.73 कोटी आहे. बँकेची सभासद संख्या 91912 असून एकुण 63 शाखा व 1 विस्तार-कक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!