बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेचा ‘कोनशिला प्रस्थापना व शताब्दी वर्ष स्मरणिका विमोचन सोहळा’ संपन्न

वसई : बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँकेस दि.६ फेब्रुवारी २०१९ रोजी १०१ वर्षे पूर्ण झाले. सदर शुभप्रसंगी बँकेने नियोजित मुख्य कार्यालयाच्या इमारतीचा ‘कोनशिला  प्रस्थापना व स्मरणिका विमोचन सोहळा’ आयोजित केला होता. ‘कोनशिला’ आशीर्वादीकरण रेव्ह.फा.डॉ.एलायस रॉड्रिग्ज हयांच्या शुभहस्ते तर ‘कोनशिला प्रस्थापना’वसईचे माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस हयांच्या शुभहस्ते, वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव हयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यांत आले. ‘स्मरणिकेचे विमोचन’ बँकेचे माजी महाव्यवस्थापक सिल्वेस्टर लोपीस हयांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रम प्रसंगी बँकेच्या लोगोसह व मुख्य कार्यालयाच्या सद्याच्या इमारतीच्या प्रतिमेसह विशेष टपाल लखोटयाचे विमोचन सी.व्ही.रामीरेड्डी (अधीक्षक,टपाल कार्यालय, पालघर विभाग) हयांच्या हस्ते करण्यांत आले.

बँकेचे भव्य व सर्व सोईंनी युक्त असे मुख्यकार्यालय असावे अशी बँकेच्या सभासदांची व ग्राहकांची फार पूर्वीपासूनची मागणी आता पूर्णत्वास आली आहे व ती बँकेचे सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक हयांच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे. बँकेने नियोजित मुख्यकार्यालयासाठी भाबोळा-बंगली मुख्य रस्तयावर सुमारे ५० गुंठे जमीन खरेदी केली असून सदर जमीन खरेदी संबंधीची व अकृषिक वापरासंबंधीचे सर्व सोपस्कार बँकेने पूर्ण केलेले आहेत.  बँक जमिनीची निर्विवाद मालक आहे.  नियोजित मुख्यकार्यालच्या इमारतीची कोनशिला प्रस्थापित झाल्यानंतर इमारतीच्या बांधकामासंबंधीच्या सर्व रितसर परवानग्या घेवून इमारतीच्या बांधकामास प्रारंभ केला जाईल. बँकेने सहकार क्षेत्रात १०० वर्षामध्ये केलेल्या पथदर्शी कार्याचा आठवणीचा ठेवा संग्रही असावा म्हणून स्मरणिकेचे विमोचन करण्यांत आले आहे.

केवळ धार्मिक अथवा व्यावसाईक निकषांवर नव्हे तर बॅसीन कॅथॉलिक बँकेने मानवता धर्माची कास धरुन माणूस आणि समाज जोडण्याचे काम करीत यशाचा पल्ला गाठला आहे. समाजाच्या कल्याण्याच्या विचारातूनच माणूस अथवा समाज मोठा होत जातो. बँकेच्या भरभराटीचे श्रेय हे आजपर्यंत बँकेस लाभत आलेले सेवाभावी संचालक मंडळ तसेच अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे असल्याचे गौरवोद्गार रेव्ह.फा.एलायस रॉड्रिग्ज हयांनी सदर कार्यक्रम प्रसंगी त्यांचे मनोगत व्यक्त करताना काढले.

माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस हयांनी विविध वैशिष्टांच्या आणि भिन्न धर्मियांच्या आपल्या वसई परिसरातमध्ये मराठी भाषेमुळे समाज एकसंत असून तयामुळे मराठी भाषा आणि आपली संस्कृती जतन व्हावी, विविध सामाजिक उपक्रम साजरे करता यावेत हयासाठी बँकेने एक सांस्कृतिक केंद्र विकसित करावे असे आवाहन तयांचे मनोमत व्यक्त करताना केले.

येत्या काळात वैद्यकिय महाविद्यालय उभारण्याबाबत कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल करीत असलेल्या प्रयत्नांना साहाय्य करण्याचा विचार बँक करीत आहे तसेच सामाजिक, सांस्कृतिक सहकारी चळवळीला पूरक असे उपक्रम नियमित राबविता यावेत म्हणून सर्व सुविधांनी युक्त अशा सभागृह प्रकल्पासाठी लवकरच ५ एकर जागा खरेदी करण्याचा विचार देखील बँक करीत असल्याची घोषणा करुन दि.१७ रोजी होणाऱ्या रेव्ह.फा.फ्रान्सिस दिब्रिटो हयांच्या आत्मचरित्र पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा होणार असून सदर प्रकाशन सोहळयास युवकांना उपस्थित राहाण्याचे आवाहन केले.  रेव्ह.फा.फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती समाजात एक आदर्श व्यक्तीमत्व असून तयांना बँकेबद्दल आत्मीयता आहे आणि त्यांचा संपर्क इतर धर्मियांसोबत असतो. धर्माची कुंपणे ओलांडणारे धर्मगुरु आहेत.  आपल्या कॅथॉलिक बँकेसाठी ते असेट आहेत. त्यांचे लेखन व समाजकार्य हे युवकांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी आहे असे बँकेचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा हयांनी सदर कार्यक्रम प्रसंगी सांगितले.

सदर कार्यक्रम प्रसंगी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर, सभापती-प्रभाग(आय) सौ.प्राची कोलासो, वसई विकास बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, उपाध्यक्ष जगदीश राऊत. बँकेचे माजी अध्यक्ष जॉन कुटिनो, सिल्वेस्टर परेरा, माजी महाव्यवस्थापक क्रिजोस बॅरेटो इत्यादी मान्यवर व बहुसंख्येने बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते.

देशातील पहिल्या १० नागरी सहकारी बँकांत गणल्या जाणाऱ्या बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँकेस रिझर्व्ह बँक व वैधानिक लेखा परीक्षक हयांनी बँकेला सतत ‘अ’ वर्ग दिला असून बँकेची व्यावसायिक धोरणे व व्यवस्थापनाची नेहमीच प्रशंसा केली आहे.

बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीनुसार आपल्या धोरणात बदल करुन ग्राहक व सभासदांचा विश्वास सतत कायम ठेवण्यात बँक यशस्वी झाली आहे.  सद्यस्थितीत बँकेचे संचालक मंडळ, अध्यक्ष ओनिल आल्मेडा, उपाध्यक्ष युरी तोन्सालविस, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.ब्रिजदिना कुटिन्हो व मुख्य महाव्यवस्थापक आग्नेलो पेन हयांच्या नेतृत्वाखाली बँक मार्गक्रमण करत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचासन बँकेच्या संचालिका सौ.ट्रिजा परेरा व संचालक पायस मच्याडो तर आभारप्रदर्शन मुख्य महाव्यवस्थापक आग्नेलो पेन हयांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!