बोली भाषेमुळेच प्रमाण भाषा संपन्न झाल्या आहेत – फादर ऍण्ड्रयू रॉड्रिग्ज

वसई (प्रतिनिधी) : यंदाचं वर्ष बोली भाषेला समर्पित केले आहे. बोली भाषेतूनच प्रमाण भाषा संपन्न झाल्या आहेत म्हणून बोली भाषा जिवंत ठेवल्या तरच प्रमाण भाषा समृध्द होतील. बायबल या अजरामर ग्रंथातले योहानकृत शुभवर्तमान हे पुस्तक आदिवासी समाज आणि भाषेचे अभ्यासक वयोवृध्द धर्मगुरु फादर अवोलिनो रमेडियम यांनी वयाच्या एशीव्या वर्षी निहारी वारली भाषेत अनुवादित केले आहे. त्याचे स्वागत अदिवासी समाज करतील आणि आपली मायबोली जिवंत ठेवतील असे उद्गार जेष्ठ लेखक फादर ऍण्ड्रयू रॉड्रिग्ज यांनी शनिवार दि.२० एप्रिल रोजी तलासरी येथे फादर अवोलिनो रमेडियस अनुवादित योहानकृत शुभवर्तमान याग्रंथाच्या प्रकाशन सोहळयात बोलताना काढले.

ईस्टर निमित्ताने तलासरी येथील ज्ञानमात सदन येथे संपन्न झालेल्या भव्य प्रार्थनासभेसाठी फादर योहान फोन्सेका व फादर आशीष रॉड्रिग्ज व्यासपीठावर उपस्थित होते. फादर ऍण्ड्रयू आपल्या भाषणात पुढे म्हणाले, देवाचा शब्द तळागाळात जावा त्यामुळे भाविकांचं आध्यात्मिक उन्नयन व्हावं आणि समाजात शांती आणि प्रेमाचं वातातवरण निर्माण व्हावं म्हणून या ग्रंथाचं प्रयोजन आहे. तुम्ही जे काही वाचता त्यावर तुमचे विचार अवलंबून असतात. दुर्देवाने समाजातून वाचनच नाहीसं होत आहे. आपला समाज न वाचणारा समाज झालेला आहे. म्हणूनच आपण फार मोठया प्रमाणात धार्मिक झालेलो आहोत. मात्र आपण आध्यात्मिक झालेलो नाही. देव धर्म मानणारा माणूस हिंसक असू शकत नाही. आदिवासी समाज आपल्या संस्कृतीशी जोडलेला असतो. निसर्ग हा त्यांचा स्थायीभाव असल्यामुळे ते देवाशी जोडलेले असतात आणि म्हणूनच माणंसावर प्रेम करतात. जो समाज पुस्तकाशी जोडलेला असेल त्यांनाच भवितव्य आहे कारण पुस्तक आपल्याला सर्व काळाशी जोडून ठेवतात.

फादर योहान फोन्सेका यांनी ग्रंथाबद्दल फादर अवेलिनो रॉड्रिग्ज आणि सहयोग प्रकाशनाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!