भव्य अटल महाआरोग्य शिबिरातील रुग्णांची फसगत ? (विडिओ)

वसई (वार्ताहर) : दि 3 मार्च रोजी पालघर येथे स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने भव्य अटल महाआरोग्य शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. भाजपाने लोकसहभागातून या शिबीराचे आयोजन केले होते व उद्धाटन सोहळयात मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही रुग्ण उपचारांसाठी वंचित राहू देणार नाही असे सांगितले होते, साधारणत: 95 लाखांचा सरकारी निधी या कार्यक्रमाला न वापरता भाजपाने स्वत: यांसंबधीत आयोजकत्व स्वीकारले होते. पालघर जिल्ह्यात प्रथमच पुणे व मुंबई येथून सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डॉक्टर रुग्णसेवेसाठी उपलब्ध होते व या शिबिराचा लाभ गरीब-गरजू रुग्णांनी सहभागी होउन घेतला होता. शस्त्रक्रिया, चष्मे, श्रवणयंत्र आदी मोफत उपलब्ध करून मिळतील असे घोषित केले होते.

 

शिबिरातील रुग्णांना चष्मे व श्रवणयंत्र घेण्याकरता 3 एप्रिल रोजी पालघर ग्रामीण रुग्णालयात बोलविले होते, सदर पालघर ग्रामीण रुग्णालयात साधारणत: 300+ रुग्ण आले असता तेथील कर्मचारी वर्गाने हात वर केले व आयोजकांकडे बोट दाखविले. तत्कालीन भाजप खासदार व शिवसेनेचे लोकसभा उमेदवार श्री राजेंद्र गावित निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही. सदर बाब संदीप मोरे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली असता प्रशासकीय सेवेतील एका व्यक्तीने जमलेल्या रुग्णांना 14 एप्रिल रोजी येण्यास सांगितले आहे. रविवार, रामनवमी, आंबेडकर जयंती ह्या निमित्त प्रशासकीय कर्मचारी हजर राहून रुग्णांना चष्मे, श्रवणयंत्र वाटप करतील का ? असा प्रश्न रुग्णांना पडला आहे. हातावर पोट असलेल्या या गरीब-गरजू रुग्णांचे कष्ट या जनतेच्या कैवा-यांना समजेल का? पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कसबसे पालघर ग्रामीण रुग्णालयात येउन ह्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड व घोर निराशा झाली आहे यावर लवकरच तोडगा काढला जाईल अशी आशा रुग्णांनी व्यक्त केली.

सरकारी आरोग्य यंत्रणा व संबंधित शिबीर संयोजक यांच्यामध्ये समन्वय नसल्याने त्याचा आर्थिक फटका गरीब-गरजू रुग्णांना बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गरीब-गरजू रुग्णांना उपचाराकरीता वंचित राहावे लागणार नाही’ या वक्तव्याचा विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. – राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!