भाजपा मदतीला धावणार ; एक कार्यकर्ता नऊ कुटुंबांना दत्तक घेणार

मुंबई (वार्ताहर) : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा आढावा आणि आणखी काय सुधारणा करता येईल, यासाठी राज्यातील प्रमुख भाजपा नेत्यांची आज ऑडिओ ब्रिजद्वारे एक बैठक झाली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक या ऑडिओ ब्रिजला उपस्थित होते. येणार्‍या काळात कोअर कमिटी, राज्यातील सर्व खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्षांच्या व्हीडिओ-ऑडिओ बैठकांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
फडणवीस म्हणाले की, या काळात प्रत्येक गरीब आणि गरजूंना मदत मिळाली पाहिजे. एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा या सेवा कार्यास पोलिसांकडून सुद्धा परवानगी आहे. ही सारी कामे करताना गर्दी होणार नाही, आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊनच हे काम आपल्याला करावे लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात लोकांना भाजपाची एक हेल्पलाईन सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ परिवार दत्तक घेऊन त्यांना मदत करायची आहे. या माध्यमातून देशभरातील १०५ कोटी लोकांपर्यत आपण पोहोचणार आहोत. ज्या व्यवस्था होत नाहीत, त्या आपण भाजपा म्हणून करायच्या, हाच आपल्या कामाचा मूड आणि मोड असला पाहिजे.
भाजपचे कार्यकर्ते काय करणार?
* लॉकडाऊनपूर्वी रूग्णालयात दाखल परंतू आता बर्‍या झालेल्या व्यक्तींना घरी पाठविण्याची व्यवस्था. यात बाळंतपण झालेल्या महिलांना प्राधान्य देऊन घरी पोहोचते करणे.
* रूग्णालयात असलेल्यांच्या भोजनाची व्यवस्था.
* अनेक ठिकाणी डॉक्टरांनी आपल्या ओपीडी बंद केल्या आहेत. वैद्यकीय मदत प्रत्येकाला मिळेल, हे सुनिश्चित करणे.
* पोलिसांकडून पत्रकार, शासकीय अधिकारी, आमदार, आपातकालिन स्थितीत सेवा देणारे यांना अटकाव केला जात आहे. स्थानिक वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून त्यावर मार्ग काढणे.
* ज्येष्ठ नागरिकांना घरपोच त्यांची औषधं पोहोचविणे.
* गरजूंना रूग्णवाहिकांची सुविधा देणे.
* नियमित डायलिसीस किंवा केमोथेरपीची गरज आहे, अशांना संपूर्ण मदत करणे.
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे मोफत धान्य त्या कुटुंबांपर्यंत पोहोचेल, हे सुनिश्चित करणे.
* प्रत्येक झोपडपट्टींमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटाईझरचे वाटप.
* २० दिवस पुरतील, अशा धान्य आणि आवश्यक सामुग्रींचे पॅकेज गरजूंपर्यंत पोहोचविणे. चंद्रपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत आता ही संख्या १५००पाकिटं प्रतिदिवस अशी झाली आहे.
* रस्त्यावर ड्युटीवर तैनात पोलिसांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेणे. त्यांची वैद्यकीय तपासणी होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत, त्यादृष्टीने स्थानिक यंत्रणांशी समन्वय.
* सफाई कर्मचारी यांच्याही आरोग्याकडे विशेषत्त्वाने लक्ष पुरविणे. मंगल कार्यालये, हॉटेल्समध्ये तात्पुरते किचन स्थापन करून आरोग्य, स्वच्छतेची काळजी घेत गरजूंच्या भोजनाची व्यवस्था करणे.
* धुणी-भांडी, घरकाम करणार्‍या महिलांना तातडीने मदत पुरविणे.
* किराणा दुकानदार, आटाचक्की येथील गर्दी टाळून तेथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यास मदत करणे, तसेच काही किराणा दुकानदारांकडून काळाबाजारी करण्यात येत आहे, तेथे तातडीने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हस्तक्षेप करणे.
* अन्य राज्यांतून आलेले मजूर जेथे आहे, तेथेच त्यांना थांबण्यास सांगणे आणि त्यांच्या जेवण, रोजगाराची काळजी घेणे. ज्या ठिकाणी ठेकेदार त्यांना वेतन देण्यास तयार नसतील, तेथे समाजातील काही दानशूरांच्या मदतीने स्वत: व्यवस्था करणे*
* काही स्थानिक लोक अन्य राज्यात, शहरांमध्ये प्रवासासाठी गेले होते. त्यांना तेथेच थांबण्यास सांगून आपल्या तेथील कार्यकर्त्यांमार्फत त्यांच्या खुशालीवर लक्ष ठेवणे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: