भिवंडीत रेशन धान्य घोटाळ्याचा तिसरा गुन्हा दाखल

भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी तालुक्यातील रेशन घोटाळ्याबाबत श्रमजीवी संघटना चांगलीच आक्रमक झालेली आहे, मागील आठवड्यात पालखणे आणि चाणे गावात दोन रास्त भाव दुकानदारावर गुन्हे दाखल।होऊनही अपहार सुरूच असल्याने आज तालुक्यातील वेढे पाडा या गावात सुरू असलेला अपहार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघड केला आहे. या दुकानात अंत्योदय लाभार्थी तसेच मोफत धान्य लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात डल्ला मारून दुकानदार अपहार करत होता, संघटनेच्या धाडीनंतर तक्रारदार समोर आले, संघटनेने पंचनामा करून तहसीलदार भिवंडी आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत खबर देऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत पूर्ण पुराव्यानिशी मागणी केल्यानंतर पुरवठा निरीक्षक विजय कोये यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक सेवा अधिनियमांतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या आठवड्यात श्रमजीवी संघटनेच्या दणक्याने भिवंडीत हा रेशन घोटाळेबाज दुकांदारांवर दाखल झालेला तिसरा गुन्हा आहे.

यापुढेही रेशन दुकांदारांनी धडा नाही घेतला तर त्यांच्यासह पुरवठा अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यासही संघटना मागे हटणार नाही असा इशारा श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी ठाणे यांनाही पंडित यांनी अवगत केले आहे.

लॉकडाऊन काळात गरिबांवर उपसमार अली असताना समाजातील विविध ठिकाणचे दानशूर दाते मदतीसाठी पुढे येत आहेत, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते गरीबांना मदत देण्यासाठी रस्त्यावर आहे, अशा संकट काळात देखील रेशन दुकानदार गरिबांच्या तोंडचा घास पळवत असतील तर ते कदापि सहन केले जाणार नाही असे स्पष्ट मत विवेक पंडित यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे, माध्यमांशी बोलताना देखील पंडित यांनी याबाबत भूमिका मांडलेली, तरीही काही दुकानदार अजूनही रेशन च्या नियमाप्रमाणे असलेल्या प्रमाणात धान्य न देता कमी धान्य देऊन लोकांना फसवत आहेत. आज श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार, कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित, नारायण जोशी, जयेश पाटील, नावनाथ भोये, अमोल सवर, भूषण जाधव, जयदास भोईर ,मुकेश जोशी इत्यादी कार्यकर्त्यांनी वेढेपाडा गावातील रेशन आपहाराचा पर्दा फाश केला.

वेढे पाडा या ठिकाणी सारिका लाटे यांचे दुकान आहे, त्यांच्याकडे १६५ अंत्योदय लाभार्थी आहेत, त्यांना प्रत्येकाला १ ते २ किलो तांदूळ, गहू कमी दिले आहे, मोफत लाभार्थ्यांपैकी अनेकांना ५ ते १० किलो धान्य कमी दिले आहे.
हे सर्व लाभार्थी गरीब, मजूर, आदिवासी स्थलांतरीत मजूर आहेत, त्यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असताना त्यांच्या तोंडातून घास ओरबडणार्या कोणत्याही दुकानदार किंवा अधिकाऱ्याला माफी नाही असे पंडित यांनी सांगत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आज पुरवठा अधिकारी पी आर पाटील यांनी गावात येऊन पंचनामा जबाब नोंदवले असून याबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक सेवा अधिनियमंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!