मंगळूरचा युवक मुंबईत आला, फुटपाथवर झोपला आणि अनभिषिक्त सम्राटाला झोपवून लोकसभेत पोहोचला ! – योगेश वसंत त्रिवेदी

३ जून १९३० रोजी मंगळूरमध्ये जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक प्रवृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कँथोलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी एक बाळ जन्माला आले. या बाळाने शालेय शिक्षण पूर्ण केले. आपलं बाळ हे धर्मगुरु व्हावं ही जॉन आणि एलिस यांची इच्छा होती. पण हे बाळ काही ऐकेना. त्यानं तर रोमन कँथोलिक धर्मगुरु चे शिक्षण घेण्याऐवजी हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधली. १९४९ साली नोकरीचा शोध घेत घेत हा युवक मुंबईत आला. हाल अपेष्टा सहन केल्या. फुटपाथवर झोपला. असंख्य संकटांना सामोरा जात जात डॉ. राममनोहर लोहिया आणि पी. डिमेलो या समाजवादी विचारवंतांच्या संपर्कात आला. याच सुमारास मुंबईत सदोबा पाटलांचे बडे प्रस्थ होते. स. का. पाटील हे त्यांचं नांव. पण मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला या सदोबा पाटलांचा कडवा विरोध होता. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे सदोबा पाटलांना नासका पाटील म्हणत असत. नामदार स. का. पाटील यांची संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलकांमधे नासका पाटील म्हणून हेटाळणी होत होती.१९६७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि या निवडणुकीत ३७ वर्षांचा मंगळूरहून आलेला युवक जॉर्ज मुंबईच्या अनभिषिक्त सम्राट म्हणवल्या जाणाऱ्या सदोबा पाटलांच्या विरोधात उभा राहिला आणि हां हां म्हणता बाजी मारली की राव या पठ्ठयाने ! मंगळूरहून आलेला, मुंबईतील पदपथांवर रात्र रात्र काढणारा जॉर्ज मुंबईकरांच्या गळयातील ताईत बनला.प्रबोधनकार ठाकरे, भाई श्रीपाद अम्रुत डांगे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, बाळासाहेब ठाकरे, यांच्या रांगेत जॉर्ज फर्नांडिस अलगद जाऊन बसले. समाजवादी चळवळीत अग्रभागी असलेले झुंझार कामगार नेते, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘बाळ’ म्हणून मैत्रीत हाक मारणारे जॉर्ज फर्नांडिस हे राष्ट्रीय पातळीवर महान नेते बनले. उद्योग मंत्री, रेल्वे मंत्री, संरक्षण मंत्री झालेले एकमेवाद्वितीय नेते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रतिनिधी होते, हे मुंबईकरांचे अहोभाग्यच म्हणावे लागेल. मुंबई शहरात पावलोपावली जॉर्ज फर्नांडिस यांची पदचिन्हे आढळतील. मुंबई नगरीने अनेकांना मोठे केले आणि अनेकांना त्यांची जागाही दाखविली. या मोठया नररत्नांमधलेच दक्षिण मुंबई चे होते जॉर्ज फर्नांडिस !

 …….आणि मुरली देवरा यांनी डॉ. मनोहर जोशी यांची विकेट घेतली !

तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचे ३ मार्च २००२ रोजी आकस्मिक निधन झाल्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षपदाची जागा रिकामी झाली. प्रमोद महाजन यांनी पुढाकार घेऊन डॉ. मनोहर जोशी यांचे नांव या पदासाठी नक्की केले. बाळासाहेब ठाकरे यांनी परवानगी दिल्यानंतर डॉ. मनोहर गजानन जोशी हे भारताच्या लोकशाहीतील सर्वोच्च अशा तिसऱ्या घटनात्मक पदावर विराजमान झाले. (राजशिष्टाचाराप्रमाणे पहिले राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे सभापती असतात आणि मग तिसरे लोकसभेचे अध्यक्ष. त्यानंतर पंतप्रधान) २००२ ते २००४ या कालावधीत डॉ. जोशी यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे खासदार डॉ. रघुवंश प्रसाद सिंह यांनी डॉ. मनोहर जोशी यांना लोकसभेवर बिनविरोध निवडून पाठविण्यात यावे, अशी सूचना केली. अर्थात ते शक्यच नव्हते. २००४ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात डॉ. मनोहर जोशी हे अर्थातच शिवसेनेचे उमेदवार होते. मुंबई काँग्रेस मध्ये देवरा आणि कामत अशी गटबाजी उफाळली होती. गुरुदास कामत निवडून येऊ नयेत असे मुरली देवरा यांना वाटत होते. त्यावेळी जी चर्चा ऐकायला मिळत होती, त्याप्रमाणे मुरली देवरा यांनी डॉ. मनोहर जोशी यांना सांगितले की सर, तुम्ही तर बिनधास्त निवडून येणार आहात, अगदी डोळेझाकून. आणि चक्रं फिरली. ज्येष्ठ दलित नेते राजा ढाले हे इशान्य मुंबई मतदारसंघात गुरुदास कामत यांच्या विरोधात उभे राहिले आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री एकनाथराव गायकवाड यांनी डॉ. मनोहर जोशी यांना आव्हान दिले होते. ज्यावेळी राजा ढाले यांनी शेवटच्या क्षणी मतदारसंघ बदलला आणि उत्तर मध्य मुंबई ऐवजी उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात अर्ज दाखल केला, त्याचवेळी मनात पाल चुकचुकली. मी सूर्यकांत लाडे यांना त्याच दिवशी म्हणालो. लाडे, सरांची सीट गेली. एकनाथराव गायकवाड यांना कच्चा लिंबू समजण्याचा तो विचार चुकीचाच होता. डॉ. मनोहर जोशी आणि एकनाथ गायकवाड यांच्यात सरळ लढत होती. जातीच्या राजकारणात मतांचे विभाजन हे राजकारण्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते आणि नेमके हेच विभाजन उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात २००४ साली होऊ शकले नाही. एकनाथ गायकवाड यांनी सरांचा पराभव केला होता. निकालाच्या दिवशी सकाळी महाराष्ट्र टाइम्स मधे जनमताचा कौल मनोहर जोशी यांना ८४% आणि एकनाथगायकवाड यांना १६%दाखविला होता. तेंव्हा आमचे मित्र ‘साथी’ प्रभाकर नारकर यांचं वाक्य आठवतंय आणि ते खरंही आहे. नारकर म्हणाले, ‘गुरुजी, ऑॅनलाईन मतदान करणारे मतदार मतदानाला जातात कां ? ते मतदार वेगळे आहेत’.  हेच वास्तव आणि विदारक सत्य आहे. बरोबर नां ? मुरली देवरा पण निवडून आले, गुरुदास कामतही देवरांच्या शहाला काटशह देत विजयी झाले आणि एकनाथराव गायकवाड यांना तर लॉटरीच लागली.?

 रवींद्र वर्मा यांना उत्तर मुंबई ने दत्तक घेतले आणि म्रुणालताईंचा पराभव झाला !           

म्रुणालताई

राजकारणात स्वत:च्याच मतदारसंघात निवडणूक लढविण्याऐवजी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची किंबहुना दुसऱ्या व्यक्तीला दत्तक घेण्याची परंपरा फार जुनी आहे. महाराष्ट्राची व्यक्ती जरी भारताच्या पंतप्रधान पदी बसली नसली तरी महाराष्ट्रातील रामटेक मतदार संघातून पामलू वेंकट उर्फ पी. व्ही. नरसिंहराव निवडून आले आणि ते भारताचे पंतप्रधान झाले. केंद्रात मंत्री झालेल्या गुलाम नबी आझाद यांनाही रामटेकच्या मतदारांनी लोकसभेवर निवडून पाठविले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती झाली आणि १९७७ साली भारतात इंदिराजींची राजवट उलथवून पहिले बिगरकाँग्रेसी सरकार मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच्या रुपाने अस्तित्वात आले. या मंत्रीमंडळात बिहार मधील रांची (आता झारखंड ची राजधानी) मधून गांधीवादी विचारसरणी चे आणि १९६९ साली बंगळुरू च्या काचघरात विभाजन झालेल्या काँग्रेस मधील संघटना काँग्रेस (मोरारजी गटा)चे रवींद्र वर्मा हे निवडून येऊन कामगार मंत्री झाले. १९७७ च्या याच ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या मानसकन्या म्हणून ओळख असलेल्या म्रुणालताई गोरे यांनी निवडणूक लढविली. त्यावेळी ‘पानीवाली बाई दिल्ली में और दिल्लीवाली बाई पानीमें !’ अशा बुलंद घोषणा मुंबईत दुमदुमत होत्या आणि घडलंही तसंच. म्रुणालताई गोरे निवडून आल्या आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. म्रुणालताईंना मोरारजींनी मंत्रीमंडळात घेण्यासाठी आग्रह केला पण त्यांनी त्यास विनम्रपणे नकार दिला. काहींनी दळभद्री पणा केला आणि दुहेरी निष्ठेच्या खडकावर जनता पार्टी ची बोट फुटली.१९८० साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या. केंद्रीय कामगार मंत्री रवींद्र वर्मा यांना उत्तर मुंबईत जनता पक्षाने उमेदवारी दिली. म्रुणालताई गोरे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. दत्तक घेतलेले वर्मा निवडून आले आणि स्थानिक असलेल्या म्रुणालताईंचा पराभव झाला. म्रुणालताईंनी नंतर आपली राजकीय कारकीर्द चांगलीच गाजविली. पण आपल्या स्वभावामुळे अनेक ‘साथी’ त्यांना सोडून गेले. इंदिरा गांधी यांच्या विरोधात तुरुंगात गेलेले अनेक समाजवादी नंतर सोनिया-राहुलच्या काँग्रेस मध्ये सुखेनैव संचार करु लागले. जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या जनता पक्षाचीसुध्दा अनेक शकले झाली.

 मुख्यमंत्रीपद डावलून शांताराम भाऊंना लोकसभेवर पाठविले !?         

ठाणे जिल्हा हा मुंबईच्या छायेतला समर्पित जिल्हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा. महाराष्ट्रातल्या सर्व लोकसभा मतदारसंघात ठाणे हा मोठा मतदारसंघ. परंतु एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर काँग्रेसने सतत अन्यायच केला. अण्णासाहेब वर्तक,भाऊसाहेब परांजपे, हरीभाऊ गोविंद तथा भाऊसाहेब वर्तक, शांतारामभाऊ (तात्या) घोलप, ताराबाई वर्तक, भाऊसाहेब धामणकर, रिद्वान हँरिस, पांडुरंग शिवराम देशमुख, नकुल पुंडलिक पाटील, प्रभाकर विठ्ठल तथा दादासाहेब नलावडे, विलासराव देसाई,शंकर नम, सुदाम भोईर, मारोतराव शिंदे, कपिल पाटील, आर. सी. पाटील, किसन कथोरे, सुभाष पिसाळ अशी एक ना अनेक दिग्गज नेतेमंडळी काँग्रेस पक्षात असतांना आणि ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व गाजविले असतांना काँग्रेस सरकार मध्ये कँबिनेट, राज्यमंत्री, उपमंत्री अशी उतरती भाजणी या जिल्ह्याला पहावी लागली. भाऊसाहेब वर्तक,शांतारामभाऊ घोलप कँबिनेट मंत्री ताराबाई वर्तक, नकुल पाटील राज्यमंत्री तर शंकर नम उपमंत्री झाले. प्रभाकर नलावडे, विलासराव देसाई, सुभाष पिसाळ यांना आमदारकी सुध्दा दिली नाही. जे आमदार झाले त्यांना मंत्रीपद दिले नाही. नाही म्हणायला शिवसेना-भाजपा युती सरकारने डॉ. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात साबिरभाई शेख, गणेश नाईक, जगन्नाथ पाटील असे ‘छप्पर फाडके’ तीन तीन कँबिनेट मंत्री ठाणे जिल्ह्याला दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेल्यानंतर म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री पदावरुन थेट केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यानंतर वसंतराव नाईक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहिले. मराठवाडयाचे शंकरराव भाऊराव चव्हाण यांनी उचल खाल्ली नसती तर वसंतराव नाईक पुढेही मुख्यमंत्री पदावर राहिले असते. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होताच वसंतराव नाईक खासदार झाले. पण इतक्या वर्षात ठाणे जिल्ह्यातील नेत्याची वर्णी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर लागली नाही. मार्गातला अडथळा दूर करणे ही तर काँग्रेसच्या नेतृत्वाची खासियत होती आणि आहे. महसूलमंत्री हा साधारणपणे पुढे मुख्यमंत्री होतो, असे ढोबळमानाने म्हटले जाते परंतु ‘ज्याच्या नसे ललाटी, त्याला देईल तलाठी’ ही परिस्थिती बदलायची आय’, असं म्हणत महसूलमंत्री पदावर आरुढ झालेल्या मुरबाड चे झुंझार आमदार आणि ज्येष्ठ नेते शांतारामभाऊ (तात्या) घोलप यांना मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल, म्हणून त्यांचा पध्दतशीरपणे काटा काढून काँग्रेस पक्षाने तात्यांना १९८४ साली ठाणे लोकसभा मतदारसंघातून थेट दिल्लीला पाठविले. ठाणे जिल्हा हा सक्षम असूनही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यापासून वंचित राहिला. मध्यंतरी तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुध्दा बाहेरच्या नेत्यांनी भूषविले होते. बरोबर नां प्रारंभी म्हटल्याप्रमाणे हा समर्पित जिल्हा आहे. काय म्हणणार !   ?

 ……आणि स. गो. बर्वे यांनी व्ही. के. कृष्णमेनन यांची ‘सायकल पंक्चर’ केली !

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे नेहमी सांगायचे की, नेत्यांनी/पुढाऱ्यांनी नाही म्हणायला आणि सरकारी अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. आणि यशवंतराव चव्हाण यांनी एक अस्सल सनदी अधिकारी राजकारणात आणला. त्यांचं नांव आहे सदानंद गोविंद बर्वे म्हणजेच स. गो. बर्वे. केंब्रिज विद्यापीठातून शिकून आलेले उच्च विद्या विभूषित असे स. गो. बर्वे स्पष्टवक्ते होते. त्यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला सनदी अधिकारी असतांना सणसणीत चपराक लगावली होती. पण यशवंतराव चव्हाण यांनी त्यांची टीका सकारात्मक घेतली. हळूहळू त्यांना राजकारणात आणूश राज्यात आमदार, मंत्री बनविले आणि १९६७ साली थेट लोकसभेच्या रिंगणात उतरविले. इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे स. गो. बर्वे आणि काँग्रेस ने उमेदवारी नाकारलेले व्ही. के. कृष्णमेनन अपक्ष अशी लढत झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी च्या मुद्दयावर स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. कृष्णमेनन यांची निवडणूक निशाणी ‘सायकल’ होती. ‘सायकल पंक्चर झालीच पायजे !’ अशा घोषणा इशान्य मुंबईत घुमू लागल्या आणि खऱ्या अर्थाने सायकल पंक्चर झाली. स. गो. बर्वे खासदार झाले. बर्वे यांना १,७१,९०२ तर कृष्णमेनन यांना १,५८,७३७ मते मिळाली. राज्याचा चेहरामोहरा बदलण्याची इच्छा बाळगणारे सदाशिव गोविंद बर्वे देशात आपला ठसा उमटविण्यासाठी निघाले खरे परंतु सदस्यत्वाची शपथ घेण्यापूर्वीच बर्वे यांचे ६ मार्च १९६७ रोजी देहावसान झाले. नंतर त्यांच्या करिष्म्याच्या जोरावर त्यांच्या भगिनी ताराबाई सप्रे या पोटनिवडणुकीत निवडून आल्या. महाराष्ट्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करणाऱ्या स. गो. बर्वे या महान नेत्यांच्या हातून देशाची औद्योगिक क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले. या द्रष्टया सनदी अधिकारी आणि नेत्याची जन्मशताब्दी २७ एप्रिल २०१४ रोजी विस्मृतीत गेली. आपले दुर्दैर्व दुसरे काय ? मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली आणि लगेचच लोकसभा निवडणुकीत इशान्य मुंबईत मराठी च्या मुद्दयावर बाळासाहेबांनी काँग्रेसच्या स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. मराठी माणसासाठी संघटना हवी अशी यशवंतराव चव्हाण,वसंतराव नाईक आदी नेत्यांची इच्छा होती आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी ती पूर्ण केली. सुरुवातीला शिवसेनेला ‘वसंत सेना’ सुध्दा म्हटले जात होते.

चेन्नई चा अर्थशास्त्रीहॉवर्डचा बुध्दिमान प्राध्यापक इशान्य मुंबईतून लोकसभेवर !      

इंदिरा गांधी यांच्या आणीबाणी मुळे १९७५ साली देशात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सारा विरोधी पक्ष एकवटत होता. तरुण तुर्क चंद्रशेखर,कृष्णकांत, मोहन धारिया हे ही आपल्या समर्थकांसह.या.चळवळीत सहभागी झाले होते. याचवेळी एक पस्तीशीतला तरुण हॉवर्ड विद्यापीठ आपल्या वाक्चातुर्याने गाजवीत होता. चेन्नईतला अर्थशास्त्री आणि हॉवर्डचा व्याख्याता भारतातील तमाम युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सिध्द झाला होता. या तरुण नेत्याचं नांव आहे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी आणीबाणी उठवण्यात आल्यानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका १९७७ साली घोषित झाल्या आणि हा चेन्नईतला तरुण अर्थशास्त्री डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी थेट उत्तर पूर्व मुंबई अर्थात इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी सिध्द झाला. मुलुंड ते चेंबूर, माटुंगा या भागातून डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे नांगरधारी शेतकरी या निशाणी वर वयाच्या केवळ अडतीसाव्या वर्षी दणदणीत मतांनी निवडून आले. लागोपाठ दोनवेळा डॉ. स्वामी हे इशान्य मुंबईमधून खासदार झाले. तरुणांच्या ह्रदयाचा ठाव घेऊन त्यांना आकर्षित करणारे डॉ. स्वामी यांनी अल्पावधीतच राष्ट्रीय राजकारणात स्वत: चा ठसा उमटविला. अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर निर्माण व्हावे, यासाठी धडपडणारे, बोलघेवडे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठीमागे हात धुवून लागले आहेत. नँशनल हेरॉल्ड प्रकरणी न्यायालयात धाव घेणारा आणि बोलघेवडा नेता हा इशान्य मुंबई मधूनच पुढे येतो,हाही एक अपूर्व योगायोग म्हणावा लागेल. जनता पक्षाची वेगवेगळया रुपात शकले झाली परंतु २०१४ च्या मोदी लाटेपर्यंत जनता पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात त्याचे विलीनीकरण करण्यासाठी धडपडणारा हा नेता इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे सुरुवातीला प्रतिनिधित्व करणारा हे सुध्दा मुंबईकरांचे नशीबच म्हणावे लागेल. भारतीय जनता पक्षाचे नेते असल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे सूत्र तंतोतंत पाळणारे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे मधल्या काळात मातोश्री ने भाजपवर डोळे वटारले होते तेंव्हा मातोश्री च्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

  ……आणि विरार चा छोरा लोकसभेत पोहोचला !    

१९७७ पासून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १९८४ ते १९८८ पर्यंत च्या कालावधी मध्ये काँग्रेसचे अनुपचंद शाह यांचा अपवाद वगळता २००४ पर्यंत जनता पक्ष आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष यांनी आपले वर्चस्व ठेवले होते. १९७७ साली पाणीवाली बाई म्रुणालताई गोरे या जनता पक्षातर्फे उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून गेल्या. १९८० साली केंद्रीय मंत्री रवींद्र वर्मा हे जनता पक्षाचे इथूनच खासदार झाले. त्यानंतर मात्र १९८९-१९९१, १९९१-१९९६, १९९६-१९९८, १९९८-१९९९ आणि १९९९-२००४  असे तब्बल पाचवेळा राम नाईक हे उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात राम नाईक हे आधी राज्य मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, मंत्री अशा चढत्या कमानीने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप बसविते झाले. उत्तर मुंबई हा मतदारसंघ जणू भाजपचा बालेकिल्ला होऊन बसला. त्यामुळे हा मतदार संघ भाजपच्या ‘हाता’तून हिसकावून घेण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जंगजंग पछाडले. मग अशावेळी बॉलिवूड मदतीला धावून यायलाच हवा. सर्वच राजकीय पक्षांमधे सेलिब्रिटींना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची जणू अहमहमिकाच लागली होती. आताही परिस्थिती वेगळी नाही. 2004 साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ वसई-पालघर पर्यंत होता. त्यावेळी काँग्रेस ने ‘विरारका छोरा’अभिनेता गोविंदा(आहुजा) याला राम नाईक यांच्या विरोधात मैदानात उतरविले. रामभाऊ काय, सहज निवडून येणार असा आत्मविश्वास (फाजील ?)  भाजपवाल्यांना होता. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची गोविंदासाठी जबरदस्त प्रचारसभा झाली आणि भाजपच्या पायाखालची वाळू घसरु लागली. मतदान झाले. गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळच्या एन एस ई संकुलात मतमोजणी केंद्र होते आणि दुपारी बारा च्या सुमारास काँग्रेसचे गोविंदा आहुजा हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. ‘विरारका छोरा’चक्क रामभाऊंचा पराभव करुन लोकसभेत पोहोचला. हा विजय गोविंदा चा होता, काँग्रेसचा होता की रामभाऊंच्या विरोधातला असंतोष गोविंदा च्या मतपेटीतून भरभरुन उफाळून आला होता, याची चर्चा त्यावेळी मोठया प्रमाणावर झाली आणि हा.पराभव रामभाऊंच्या पक्का जिव्हारी लागला. साहजिकच आहे ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!