मंत्रालयात कॅन्टीनमध्ये पदवीधर मुली दिवसाला ८०० चपात्या लाटणार !

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रालयातील चौरस आहार कॅन्टीनमध्ये पाच पदवीधर मुलींची चपाती लाटण्यासाठी नियुक्ती करण्यात आली असून पुढच्या आठवड्यात त्या कामावर रुजू होणार आहेत. अनुराधा सोळंकी, ललिता गीते, सविता धिंडले, सुनीता केंग अशा या उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे या मुलींनी पदवी परीक्षेत ८० टक्केच्या वर गुण मिळविले आहेत.   सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली आणि या सावित्रीच्या लेकींना आज पदवी संपादन करूनही चपाती लाटण्याची वेळ आली याला प्रगती म्हणावी का अगतिगता हा  सामाजिक प्रश्न  भविष्यात तरुण पिढी पुढे काय वाढून ठेवले आहे याचा विचार सरकारला करावा लागणार आहे. राज्याच्या मंत्रालयातच पदवीधर उमेदवार कॅन्टीनमध्ये चपाती भाजणार किंवा वेटरची कामे करणार असतील तर अच्छे दिनाची व्याख्याच बदलावी लागेल.
मंत्रालय चौरस आहारमध्ये चपाती तयार करण्यासाठी किमान पाचवी पर्यंत शिक्षणाची आवश्यकता आहे. परंतु या पाच  मुली पदवीधर आहेत व मागासवर्गीय आहेत. त्यांची परीक्षा यूएसटी ग्लोबल या कंपनीने घेतली आहे. त्यामुळे या उमेदवारी निवड करण्यात कॅन्टीन प्रशासनाचा काहीही संबंध नसल्याचे कॅन्टीन प्रशासनाने सांगितले. मंत्रालयात असलेल्या चार कॅन्टीनमध्ये ८ हजार चपात्या लाटाव्या लागतात त्यातील ५ हजार चपात्या केवळ चौरस आहार कॅन्टीनसाठी नेहमी लागतात. निवड झालेल्या मुलींना नेहमी ७०० ते ८०० चपात्या लाटाव्या लागतील.  त्यासाठी त्यांना मधल्या वेळेत एक तासाची सुट्टी देण्यात येईल. पदवीधर मुलींना कॅन्टीनमध्ये वेटर किंवा भांडी धुण्याचे, वाढपी म्हणून काम कसे सांगायचे हा खरा प्रश्न प्रशासनासमोर आहे. मंत्रालयातील भोजनालय विभाग सामान्य प्रशासन विभागाकडे आहे आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विभागाचे प्रमुख आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!