मंत्रालयात मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्याची कुसुमाग्रज यांची इच्छा शिवसेनेने पूर्ण केली !

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी केला डॉ. मनोहर जोशी आणि दिवाकर रावते यांचा मुक्तकंठाने गौरव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मराठी भाषा ही सोनेरी मुकुट लेवून फाटक्या वस्त्रानिशी मंत्रालयाच्या पायथ्याशी उभी आहे, या आपल्या मायमराठीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कोण पुढे येणार ? अशी कळकळीची वेदना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विष्णु वामन तथा तात्यासाहेब शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी व्यक्त केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी एकोणिस जून एकोणिसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली आणि याच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताच  मुख्य सचिवांनी प्रशासनात मराठी च्या कामकाजाला मुदतवाढीसाठी समोर ठेवलेली नस्ती(फाईल) फेकून देत १ मे १९९५ पासून मराठी भाषेची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा कडक आदेश दिला. कुसुमाग्रज यांची इच्छा पूर्ण करीत या शिवशाही सरकार च्या शिवरायांच्या मावळ्यांनी मराठी भाषेला भरजरी वस्त्रे नेसवून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सन्मानाने प्रतिष्ठा मिळवून दिली. १ मे १९६० रोजी मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात राज्य भाषा मराठीला मानाचे सोन्याचे पान मिळवून देण्यासाठी पस्तीस वर्षे लागली आणि ते सुद्धा घडवून आणण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री यावा लागला.

शिवसेना नेते दिवाकर रावते यांचे मराठी भाषेसाठीचे कार्य तर नेत्रदीपक आणि मराठी माणसाची छाती अभिमानाने भरुन येईल असेच आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, मागाठाणे मित्र मंडळ आणि शिवसेना शाखा क्रमांक १४ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. मनोहर जोशी आणि दिवाकर रावते यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, माजी उपविभागप्रमुख मनोहर देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मागाठाणे मित्र मंडळाचे पदाधिकारी सुभाष उर्फ नाना देसाई यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनचरित्राची माहिती दिल्यानंतर म्रुणाल सार्दळ या विद्यार्थिनीने स्वतः रचलेली मराठी भाषेचा गौरव करणारी कविता खड्या आवाजात सादर केली. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या हस्ते योगेश वसंत त्रिवेदी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्रिवेदी यांनी आपल्या भाषणात नंदमुरी तारक रामाराव म्हणजेच एन. टी रामाराव यांनी तेलुगु भाषेच्या अस्मितेसाठी आंध्रप्रदेश मध्ये तेलुगु देसम स्थापन केला आणि अवघ्या नऊ महिन्यात तो सत्तेवरही आला, पण मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणऱ्या शिवसेनेला सत्तेवर यायला तब्बल पस्तीस वर्षे लागली. ते सुद्धा पंचेचाळीस अपक्ष आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या समवेत युती करुन सत्ता मिळाली. आपणच आपला स्वाभिमान जपण्यासाठी कमी पडतो कां ? असा सवाल करुन योगेश वसंत त्रिवेदी यांनी पुढे सांगितले की, दिवाकर रावते आज परिवहन मंत्री म्हणून काम करीत आहेत. त्यांनी मराठी भाषा आणि तिचा स्वाभिमान, तिची अस्मिता कशी जपली किंबहुना सरकार दरबारी तिची प्रतिष्ठा कशी वाढविली हे पहाणे महत्त्वाचे आहे. आज ‘सामना’मध्ये जाहिरात पाहिलीत काय ? सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या दालनाच्या दरवाजावर पाटी कशी लावावी हे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. ते विरोधीपक्षात असतांना मंत्रालयाचे सात मजले मुख्य आणि विस्तारित इमारत अशोक गव्हाणे यांच्या समवेत पायी फिरुन सर्व दालनांच्या पाट्या तपासल्या.

१ मे १९६० पासून मराठी भाषा अंमलबजावणी बाबतचे शासन निर्णय अनेकदा निघूनही ते अंमलात येत नव्हते म्हणून त्यांनी मुख्य सचिव शंकरन् यांच्या दरवाजावर त्यांचे नांव देसलिंगम् कृष्णन् शंकरन्  असे असल्यामुळे दे. कृ. शंकरन् अशी पाटी चिकटवली. याबद्दल रावते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कर्नाटक सरकार च्या दडपशाही मुळे बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह ८६५ गावातले मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी अजूनही धडपडताहेत. कानडी दडपशाही ला सडेतोड उत्तर देताना दिवाकर रावते यांनी आपल्या बसवर महाराष्ट्राच्या नकाशाला ‘जय महाराष्ट्र’ ही अक्षरे जोडली, हे त्यांचे कार्य तर स्वाभिमानाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल. मराठी साठी गुन्हे अंगावर घेणारे असे मर्द मावळे शिवसेनेत आहेत, म्हणूनच मराठी भाषा आज ताठ मानेने भरजरी वस्त्रे परिधान केलेली पहायला मिळते. मंत्रालयाचा पूर्ण पत्ता मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक यांचा समावेश करुन आज आपल्याला पहायला मिळतो तोही दिवाकर रावते यांच्या मुळेच. कँबिनेट नव्हे तर मंत्रिमंडळाची बैठक बोला नाही तर रावतेसाहेब रागावतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात कारण रावते यांचा आदरयुक्त दरारा आहे, असेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी आवर्जून सांगितले. यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करुन उपस्थितांनी दाद दिली. मी भगवान श्रीकृष्ण नाही पण माझे नांव योगेश आहे आणि मराठी आणि गुजराती या माझ्या द्रुष्टीने देवकी आणि यशोदा आहेत. एकीने जन्म दिला आणि दुसरीने पालनपोषण केलं. बाळासाहेब ठाकरे आणि विजय वैद्य यांच्या मुळेच मी पंचवीस वर्षे सामनाच्या माध्यमातून मराठी ची सेवा करु शकलो आणि अजूनही करीत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, असे सांगतांना योगेश त्रिवेदी यांच्या सह उपस्थित सारेच भारावले. मराठीसाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचेही योगेश वसंत त्रिवेदी यांनी आवर्जून नमूद केले.  ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ ही रचना कवीवर्य सुरेश भट यांची आहे. याचा आपल्या सर्वांना निश्चित अभिमान आहे पण कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा दिवस साजरा करतांना, ‘परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनि आपुल्या प्रगतीचे शिर कापु नका’ या त्यांच्या रचना म्हणायला काय हरकत आहे ? असा सवाल करुन सुरेश भटांचीसुद्धा आपण आठवण ठेवण्यासाठी कार्यक्रम करु या, असेही  योगेश वसंत त्रिवेदी यांनी परखडपणे सांगितले. मागाठाणे मित्रमंडळाचे हेमंत पाटकर, शाखासंघटक कांचन सार्दळ, माजी शाखासंघटक शुभदा शिंदे, उपशाखा प्रमुख दिलीप रामचंद्र देसाई, दिनेश विचारे, दिलीप चव्हाण, विजय मडव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!