मंत्र्यांचे घोटाळे, कॅबिनला टाळे ! – जयंत करंजवकर

महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य असले तरी इतर राज्यांपेक्षा पुरोगामी राज्य असल्याची त्याची ओळख आहे, हे महत्वाचे. राज्यात देवपूजा केली जात असली तरी अंधश्रध्देला थारा दिला जात नाही. त्याला कारणही तसेच आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे पण त्याच बरोबर धार्मिक विधीतील अंधश्रध्देला विरोधात समाज सुधारकांचे योगदानही तितकेच मोठे आहे,  हे कोणालाही नाकारता येणार नाही. धर्माच्या आधारीत स्त्रियांना शिक्षणापासून वंचित, विरोध, बाल विवाह, सती चाल, स्पृश्य-अस्पृश्य अशा प्रथा राज्यातील समाजसुधारकांनी समाजात जागृती निर्माण करून मोडीत काढल्या. संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांनी धार्मिक प्रथे विरोधात समाज प्रबोधन करून भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याना पाणी, बेघराना घर हा जीवनमूल्य सांगत ‘माणुसकीचा धर्म’ शिकविला. नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी तर देवाला रिटायर्ड करा असे आवाहन केले होते. अंधश्रध्दा निर्मूलनाचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी विज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सगज केले. हिंदू धर्मात स्त्री शिक्षणाला विरोध होता त्या विरोधाला पर्याय म्हणून मुंबईचे आद्यशिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेट यांनी वयाच्या २९व्या वर्षी मुंबईत १९३२ साली मुलींसाठी पहिली तर १८४८ मध्ये जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. प्रबोधनकार ठाकरे यांनी भटजींच्या धार्मिक चाली व रूढी विरोधात आंदोलने करून समाजात अंधश्रध्देचा पायाच उखडून काढला. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी विधवा स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणाचे कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीमध्ये काळा रामाच्या देवळात अस्पृश्यना प्रवेश मिळवून दिला. खरे पाहता ते कट्टर हिंदू निष्ठ होते. परंतु ते विज्ञानवादी असल्याने हिंदुतील मानव विरोधातील प्रथाविरोधात होते. कट्टर हिंदुनिष्ठ सावरकरांनी मृत्यूनंतर श्राध्द न करण्यास कुटुंबाला सांगितले होते. यामुळे महाराष्ट्राच्या जडणघडणीत पुरोगामी चळवळ आजही अनेक ठिकाणी आढळून येते. महाराष्ट्राचे नेते शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यांचा अंधश्रध्देवर विश्वास नाही. जुन्या रूढी विरोधात ते सदैव आपले रोखठोक विचार मांडत असतात. अमेरिकेत महिलांना लोकशाहीत मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी प्रखर आंदोलने करावे लागले होते. मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या घटनेतच महिलांना मतदानाचा अधिकार दिल्याने भारतीय महिलांना लढा उभारावा लागला नाही.

पुरोगामी महाराष्ट्राचा हा जाज्वल्य इतिहास लक्षात घेता आज महाराष्ट्राच्या मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील कॅबिन क्रमांक ६०२ बाबत ‘रात्रीस खेळ चाले’ सारखा खेळ चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा खेळखंडोबा झाला आहे. सध्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या   शुरांचे कथन भाषणात नेते करत असले तरी छातीचा कोट करून त्या कॅबिनमध्ये बसण्यास हिंमत करत नाहीत. यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे,  छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, आर.आर. पाटील हे सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या बाजूच्या दालनातच बसत होते. मंत्रालयाच्या आगीत 6वा मजला पूर्णत: जळून गेला. त्यानंतर नूतनीकरण केल्यावर अजित पवार, पांडुरंग फुंडकर व एकनाथ खडसे यांनी त्या कॅबिनमध्ये कारभार केला. परंतु त्यांना त्या कॅबिनचा अनुभव म्हणजे त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला. वास्तविक पाहता गोपीनाथ मुंडे यांना सहा महिने आधी सरकार बरखास्त झाल्याने ६०२ कॅबिन सोडावी लागली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार स्थापन झाले. छगन भुजबळ हे त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तेलगी प्रकरण बाहेर आल्याने त्यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले. दस्तुखुद्द तेलगीने भुजबळांचे नाव घेतले त्यात कॅबिनचा काय दोष? तेलगी प्रकरणात त्यांचे नाव नसते तर ते मुख्यमंत्रीही झाले असते. त्यानंतर त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री झाले. त्यावेळी ते ६०२ केबिनमध्ये बसत नव्हते तर मंत्रालयातील दुस-या मजल्यावर बसत होते. परंतु दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि एमआयटी या त्यासनच्या शिक्षण संस्थेतील घोटाळा, बोगस कंपन्या आणि कोटयावधी रुपयांची अवाजवी संपत्ती त्यांच्याकडे आढळली. मंत्र्यांनी भ्रष्टाचार करायचा आणि दोष कॅबिनला द्यायचा? हा कसला पुरोगामीपणा ? भुजबळांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील उपमुख्यमंत्री त्याच कॅबिनमध्ये स्थानापन्न झाले. त्यांना कोणतंही मंत्रीपद देण्यात आले नव्हते म्हणजे मिनिस्टर विदाऊट पोर्टफोलिओ, असा एकूण प्रकार तो होता. परंतु त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुक जाहीर झाल्याने त्यांना ती कॅबिन सोडावी लागली. यात कॅबिनचा काय दोष? नंतर उपमुख्यमंत्री म्हणून आर.आर. पाटीलही गृहमंत्री म्हणून सहाव्या मजल्याच्या कॅबिनमध्ये विराजमान झाले. याच कॅबिनमध्ये त्यांनी डान्सबार बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तरुण पिढीला वाचविले, पोलिसांना पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध केली, पोलिसांना स्वत:चे हक्काचे घर आणि पोलिसांच्या मुलांना उच्च प्रतीचे शिक्षणासाठी ठाणे येथे विद्यालय स्थापन केले, बालकामगार मुक्त धोरण अमलात आणण्यासाठी कारखान्यावर धाडी घातल्या, गावात वारंवार होणारे भांडणे कायम बंद व्हावे म्हणून ‘तंटामुक्त गाव’ योजना सुरू केली. सांगायचा उद्देश हाच की सहाव्या मजल्याच्या कॅबिनमध्ये आर.आर. पाटील यांनी लोकाभिमुख कामे केली. मनात इच्छा असेल तर मार्ग मिळतो. अजित पवार यांनी या ६०२ कॅबिनमध्ये कामाला सुरुवात केली. प्रशासनावर मांड असलेले अजित पवार यांच्यावर सिंचन प्रकरण शेकले आणि ते बदनाम झाले. पांडुरंग फुंडकर हे ६०२ कॅबिनमध्ये कृषिमंत्री म्हणून कारभार स्वीकारला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघाला. पण फुंडकर कृषिमंत्री असूनही शेतक-यांच्या मोर्चाला सामोरे गेले नाहीत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व सदाशिव खोत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. पांडुरंग फुंडकर यांची प्रकृती बेताचीच होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. मंत्री असतांना फुंडकर यांचे निधन झाले. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी ६०२ कॅबिनचा ताबा घेतला. मुख्यमंत्री होता आले नाही म्हणून दोन क्रमांकाचे महसूल मंत्री म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनला खेटून असलेली ६०२ क्रमांकाची कॅबिनचा ताबा घेतला. परंतु ते पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन प्रकरणात अडकले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील जमीन जावयासाठी घेतली नसती तर त्यांच्यावर मंत्रीपद सोडण्याची वेळच आली नसती. आता यात त्या कॅबिनचा काय अपराध? पण एखाद्याला कानफाटया नाव पडलं तर काय होतं हे सर्वांना माहीत आहे. तसं काहीसे ६०२ कॅबिनच झालं आहे. मंत्र्यांनी या कॅबिनला आरोपीच्या पिंज-यात ठेवले आणि ती कॅबिन शापित, अनलकी असल्याचे बदनाम केले.

वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांची कॅबिनही अशुभ म्हणता येईल. या कॅबिनमध्ये दिवंगत मुख्यमंत्री ए.आर. अंतुले हे इंदिरा गांधी प्रतिष्ठान प्रकरणाने बदनाम झाले. न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आणि त्यांनी राजीनामा दिला. निलेंगेकर पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या मदतीने मुलीचे मार्क्स वाढविले आणि मुख्यमंत्री पदावरून उतार झाले. विलासराव देशमुख यांनी पाक पुरस्कृत दहशतवादी कसाब याने ताज हॉटेलवर हल्ला करून अनेकांची हत्या केली. परंतु सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर विलासराव देशमुख यांनी सिनेनिर्माते राम गोपाल यांच्या समवेत ताज हॉटेलला भेट दिली. त्यावेळी त्यांचा हिंदी चित्रपटात नुकताच शिरकाव केलाला

मुलगा रितेश देशमुख हा राम गोपाल यांच्या समवेत होता. ताज हॉटेलमधील घटनेवर राम गोपाल यांना चित्रपट तयार करावयाचा होता म्हणून ते विलासराव देशमुख यांच्या समवेत आले होते. ही बातमीचा गौप्यस्फोट झाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यानी ३०० लोकांचा बळी घेतल्यानंतरही चित्रपट निर्मात्याला घेऊन जाण्याची हिंमत झालीच कशी? जनतेचा प्रक्षोभ वाढत गेला. वर्तमानपत्रात व चॅनेलवर विलासराव देशमुख यांच्यावर टीकेची झोड निर्माण झाल्यावर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तरीही मुख्यमंत्र्यांचे दालनाकडे अशुभ म्हणून पाहिले जात नाही. अशोक चव्हाण यांना आदर्श गृहनिर्माण सोसायटीच्या गैरव्यवहारात सापडले आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. परंतु कॅबिन क्रमांक ६०२ मंत्र्यांनी केलेले नियमबाह्य कामांमुळे बदनाम झाली आणि कायम आरोपीच्या पिंजऱ्यात तिला अलगद बसवली गेली. मंत्र्यांचे घोटाळे नि कॅबिनला टाळे. भित्याच्या मागे ब्राह्मराक्षस आणि काय म्हणावे?

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!