मतदान झेंडयाच्या रंगावर होऊ नये – आम.बच्चु कडु

वसई (वार्ताहर) : लोकशाही सशक्त होण्यासाठी मतदान विचाराने झाले पाहिजे झेंडयाचा रंग बघून होता कामा नये.असे मत प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आ.बच्चु कडु यांनी वसईत व्यक्त केले.

वसईतील जेष्ठ वकील ऍड.नोएल डाबरे यांच्या मायाजाल या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी सायंकाळी ऍड.उदय वारुंजीकर यांच्या हस्ते पापडी येथील टी.बी कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी बिशप थॉमस डाबरे, माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस, सिस्टक मारीया, विकास वर्तक, महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, ऍड.दिगंबर देसाई, डॉ.ओमप्रकाश दुबे यांच्यासह अनेक डॉक्टर्स आणि वकील उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना आ.कडु यांनी सद्यस्थितीतील राजकारणाबाबत चिंता व्यक्त केली.

राजकारण्यांप्रमाणेच मतदारांचीही पातळी घसरली आहे. यथा प्रजा तथा राजा अशी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे.मतदारांची भिती नेत्यांना राहिली नाही. आमदार पंचतारांकित हॉटेलात राहतो आणि त्याला निवडून देणारा मतदार आपल्याच झोपडीतील भिंतीखाली दबून मरतो. बाळाला पेटीत ठेवायला पैसे नसल्यामुळे माता त्याच हॉस्पीटलमध्ये आत्महत्या करते.जितके लोक काश्मिरमध्ये गोळयांनी मरत नाहीत तितके शेतकरी आत्महत्या करीत आहे, अशी खंत आ.कडु यांनी यावेळी व्यक्त केली.

न्यायालयीन प्रकरणातील वेदना वकीलांनाही जाणवत असतात, त्या वेदना ऍड.नोएल डाबरे यांनी आपल्या मायाजालमध्ये मांडल्या आहेत. गेल्या १५ वर्षातील वसईतील स्थित्यंतराचे प्रतिबिंब त्यात आहे. वसईतील मनकी बातही त्यात आहे.असे यावेळी ऍड.वारुंजीकर म्हणाले. मायाजाल शब्दात आश्चर्य, कुतुहल, गुढ दडलंय. जगातील मायाजालात न फसलेला संवेदनशील वकील लेखक नोएल आहे. त्यांनी अभागी अशील,कुष्ठरोग्यांचे दुःख मायाजालात मांडले आहेत, असे बिशप यावेळी म्हणाले. वसईतील चळवळीतून आलेले अनुभव मायाजाल मी मांडले आहेत. पर्यावरणाची जगातील पहिली चळवळ वसईतून सुरु झाली. वसईतील चळवळीमुळेच फा.दिब्रिटोंना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला असे स्पष्ट करून ऍड.डाबरे यांनी पुस्तकाच्या प्राथमिक विक्रीतून आलेले ५० हजार रुपये आ.बच्चु कडु यांना त्यांच्या कार्यासाठी प्रदान केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.अजय कोरीया आणि सुत्रसंचालन ऍड.धनंजय चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: