मधु चव्हाणजी, म्हाडाचे रहिवाशी आपले सदैव ऋणी राहतील ! – जयंत करंजवकर

मा. मधुजी चव्हाण,

सभापती, मुंबई म्हाडा मंडळ.

जय महाराष्ट्र,

फडणवीस सरकारने सत्ता स्थापन झाल्यावर चार वर्षांनंतर तुमची मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळावर (मुंबई म्हाडा मंडळ) सभापती म्हणून निवड केली. तुमच्या सारख्या निष्ठावंत आणि अपार कष्ट  करणाऱ्या नेत्याला उशिरा सभापतीचे पद मिळाले, असे मला वाटते. तरीही पक्षाच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ असल्याने आपण आपल्या पदरात टाकलेले सभापतीचे पद स्वीकारले. गोड मानून घेतले. जनसंघापासून आपण पक्षाची कामे कर्तव्य निष्ठेने पार पाडलीत. आज अडगळीत असलेले आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या अयोध्या यात्रामुळे तुमच्या पक्षाची पाळेमुळे देशात रुजली ते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन,  गोपीनाथ मुंडे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे इतर महान नेत्यांनी तुमच्या छोटयाशा घरी येऊन कार्याचे कौतुक केले आहे. मधुजी, आपण एक मराठी चित्रपट निर्माण केला होता बहुतेक त्याचे नाव ‘हमाल दे धमाल’ असावा तो चित्रपट पाहण्यासाठी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी येणार होते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते येऊ  शकले नाहीत. मात्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना जपणं हे त्यावेळचे नेते विशेष दखल घेत होते. कार्यकर्त्यांना निराश करणे म्हणजे पक्षाचा ऱ्हास हा विचार अटल बिहारी वाजपेयीसारख्या महान नेत्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी आपल्याला फोन करून विचारले ‘मधुजी, मुझे आपका चित्रपट देखना, तो मै कल आ रहा हू !’…असा आश्चर्याचा धक्का देऊन ते शब्द दिल्याप्रमाणे चित्रपट पाहण्यास आले आणि आपली पाठ थोपटली. या घटनाक्रमाची आठवण मी का करून देत आहे? कदाचित आपल्या पक्षातील उपऱ्या नेत्यांना हे वाचून कपोल कल्पित वाटेल. कारण गेल्या पाच वर्षात दुसऱ्या पक्षातून आलेले नेत्यांचेच कौतुक आपल्या पक्षात चालले आहे. शिवसेना, मनसे असा प्रवास करत भाजपामध्ये येऊन विधान परिषदेचे आमदार आणि नंतर जादूची कांडी फिरवावी तसे थेट विरोधीपक्ष नेते झालेले प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीतून भाजपात येऊन देवेंद्र फडणवीस यांचे एकमेव निष्ठावंत आमदार प्रसाद लाड व खासदार संजय काकडे हे सगळे नेते पाहून आपल्यासारखे निष्ठावंत आता उपरे वाटू लागले आहेत. हा उल्लेख केल्याबद्दल तुम्हाला राग येईल, पण माझा नाईलाज आहे. जे सत्य आहे ते ऐरणीवर आणले पाहिजे, म्हणून हे स्पष्ट करतो.

तर विषय होता आपल्या म्हाडा मुंबई मंडळाच्या सभापतीचा… भाजपा सर्वात मोठा पक्ष असूनही आज पक्षाला विरोधीपक्ष म्हणून बसण्याची नामुष्की आली आणि 30 वर्षांचा मित्र पक्ष शिवसेना सत्तेत आहे. हा आकडयांच्या खेळ आणि सेनेने त्यात बाजी मारली. त्यामुळे सत्तेत आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व महामंडळे बरखास्त करण्याचे आदेश दिलेत व त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मधुजी, माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की, गेल्या १६ महिन्यात पुनर्वसनाची कामे आपण केलीत त्याला खरोखर तोड नाही. अजातशत्रू, सर्वपक्षीय मित्र आणि आपण आमदार असो वा सभापती पण सतत लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणारा नेता म्हणून तुमची खरी ओळख. या स्वभाव वैशिष्टयमुळे आपल्या म्हाडाच्या कार्यालयात लोकांचा व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी पाहून मला आर.आर. पाटील यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. म्हाडाचे कार्यालय सोडताना आपण आपल्या  कर्मचा-यांना कामासाठी कोण बाहेर आहे का याची खात्री करूनच आपण म्हाडाचे कार्यालय सोडून जात होता. असं क्वचितच आढळून येते.

म्हाडा म्हणजे लोकांच्या टीकेचा विषय. दलाल आणि भ्रष्टाचारी कर्मचारी यांचे संगनमत याचे कथन करावे तेवढे कमी आहे. मात्र आपण अधिकारांच्या पहिल्या बैठकीत गैरप्रकार थांबले नाही तर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम दिला होता आणि १६ महिन्याच्या कालावधीत आपण काही अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले. मास्टर लिस्ट घोटाळयातील अधिका-यावर केलेल्या कारवाईने, काही का असेना, म्हाडावरचा डाग पुसण्याचा तो एक प्रयत्न होता, असे म्हणावे लागेल. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधून अनेक वर्षे म्हाडामध्ये दलाली करून गरीब व गरजू लोकांची फसवणूक करणा-या दलालांना तुरुंगाची हवा खाण्यास पाठविले. ही झाली कारवाई… परंतु ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळीचे अनेक वर्षं रखडलेले पुनर्वसनाचे काम मार्गी लावले. त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष बीडीडी चाळीतील राहिवाशांशी संपर्क साधून त्यांच्या मनातील शंकेचे निरसन केले. म्हाडाचे पुनर्वसनाचे काम म्हणजे मालकीचे घर मिळणे कठीण शिवाय इतर पुनर्वसन प्रकल्पातील लोकांचे संक्रमण शिबिरामधील हालअपेष्टा हा इतर रहिवाशांचा अनुभव पाहून नको ते पुनर्वसन, ही मानसिकता बदलण्याचे महान काम मधुजी आपण केलेत. आपल्याबद्दल ठाम विश्वास असल्यानेच बीडीडी चाळीच्या  पदाधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या कामाला विरोध करणाऱ्या रहिवाशांना मोक्का लावण्याची मागणी केली. त्यानंतर बीडीडी चाळीच्या पात्रता निश्चिती, संक्रमण शिबिरासाठी ऑॅन लाईन करार, नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने ऑॅन द स्पॉट नोंदणी, पॉज मशीनवर नोंदणी ही कामे म्हाडाचे कर्मचारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करत होते. म्हाडाचे कर्मचारी व रहिवाशी एकत्र व सामंजस्याने काम करीत असल्याचे हा योगायोग तुमच्यामुळे घडून आला होता. तिन्ही बीडीडी चाळीच्या ठिकाणी पुनर्विकासाठी २३  मजली आणि विक्रीसाठी ६० मजली इमारत बांधण्यात येणार आहे. ही किमया आपणच करू शकला, हे ही नाकारता येत नाही.

बी.डी.डी चाळीमध्ये प्रकल्प पूर्ण झाल्यावर राहिवाशांसाठी, विक्रीकरिता सदनिका आणि व्यापारांसाठी दुकाने उपलब्ध होणार आहेत. तीन वर्षांत बीडीडी चाळीचा प्रकल्प होणार आहे. ही सर्व प्राथमिक प्रक्रिया आपल्या मार्गदर्शानाखाली केवळ वर्षभरात झाली, ती ही कोणतीही जाहिरात न करता, हे विशेष !

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार व स्तंभ लेखक/८३६९६९६६३९)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

मा. मधुजी, गोरेगाव मोतीलाल नगर येथे मुंबई म्हाडा मंडळातर्फे अत्याधुनिक मायक्रो सिटी उभारण्याचे आपलं एक स्वप्न…! मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने सर्व विकासक पनवेल, पालघर येथे महामुंबई उभारत आहेत. मात्र आपण मोतीलाल नगरातील सुमारे ३७ हजार रहिवाशांसाठी १२०० चौ.फु. सदनिका देत मायक्रो सिटी निर्माण करत आहात, तेही रहिवाशांना सक्रमण शिबीरात न पाठवता आणि विक्रीकरिता सर्वसामान्य गरजूंसाठी ३८ हजार परवडणारी सदनिका उपलब्ध होणार आहेत. मुबलक जागा असल्याने या मायक्रो सिटीमध्ये रुग्णालय, जिम, शाळा, महिलांसाठी वसतिगृह, वृध्दाश्रम, मैदान असणारा आहेत. विशेष म्हणजे म्हाडाला मायक्रो सिटी उभारल्या नंतर ४० हजार कोटींचा लाभ मिळणार आहे. मोतीलाल नगर प्रकल्प मार्गी लागला आहे ते केवळ आपण तेथील राहिवाशांशी गोरेगावमध्ये सभा घेऊन रात्री १० वाजेपर्यंत सर्वांच्या हरकतीचे निरसन केल्यामुळे…. हे मी बोलत नाही तर तेथील रहिवाशी बोलत आहेत. याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे पुनर्वसन करत आहात. ७१ वर्षांनंतर आदिवासींना हक्काचे घर मिळणार आहेत. याच उद्यानातील २९ हजार झोपडवासीयांची घरे मुंबई म्हाडा मंडळातर्फे बांधण्यात येणार आहेत. गिरणी कामगारांना श्रीनिवास मिल, बॉम्बे डाईंग मिलच्या जागेवर ५,०९० घरांची लॉटरी काढण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्याच कारकिर्दीत झाला, हे विशेष…! आपण कामगार विभागात राहात होता, त्यामुळे तुम्हाला गिरणी कामगारांविषयी सहानभूती असणे स्वाभाविक आहे. अशी बरीचशी कामे व निर्णय आपण घेतली आहेत, जसे अभ्युदय नगर रहिवाशांना सेवाशुल्क, पाणीपट्टी, अतिरिक्त विद्युत आकार माफ, म्हाडाची घरे दहा वर्षे विकण्यावर निर्बंध, मरेरा कायद्याचे संरक्षण, म्हाडा पुनर्वसन प्रस्ताव फाईल ९० दिवसात पूर्ण करण्याचा निर्णय, यामुळे पुनर्वसन कामांना गती मिळाली. सीआरझेड वसाहतीतील म्हाडाच्या रहिवाशांना लाभ आणि म्हाडाच्या ५६ वसाहतींना २५० कोटींचा निधी याचा ३,७०० इमारतीतील सुमारे ७६ हजार रहिवाशांना लाभ आपण मिळवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने हा चमत्कार घडला आहे हे तुम्ही वारंवार सांगत आहात. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे सरकार स्थापन होताच महामंडळाच्या रिक्त जागा त्वरित भरल्या असत्या तर आज म्हाडाचे पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले असते, किंबहुना या पुनर्वसन प्रकल्पाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असते. चव्हाणसाहेब स्पष्ट बोलतो म्हणून रागावू नका, खरी वस्तुस्थिती सर्वांसमोर येणे आता गरजेचे आहे, म्हणून हे धाडस…!

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व महामंडळे बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत नि त्याची प्रक्रिया सुरू आहे. आपण भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ नेते असल्याने मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळावर राहणार नाहीत. क्रिकेटपटूने मैदानावर १० गोलंदाजात १०० धावा काढाव्यात तसे आपल्या कामाची गती आहे असे म्हणता येईल. भावी सभापती तुमच्या कामाबद्दल राजकीय दृष्टिकोनातून स्पष्ट बोलणार नाहीत, पण म्हाडाचे रहिवाशी मनोमन आपले आभार मानतील. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मधु चव्हाण हे कमळातील वाघ आहेत, त्यांना सभापती म्हणून राहू द्या, असे बोलले असते,बरोबर ना चव्हाण साहेब…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: