मनसे नेत्याला तडीपारची नोटीस, कारवाईच्या विरोधात सोशल मीडियावर नेटीझन्सकडून मोहिम

वसई (वार्ताहर) : मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे. मुंबईसह उपनगरातून त्यांना तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नांदगावकर यांची तडीपारी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे मनसेसह नेटीझन्सकडून या कारवाईला विरोध सुरू झाला आहे. फेसबुक, टिवटरवर #isupportnitinnandgaonkar या नावाने मोहिम सुरू केली आहे.

मुंबईत पासपोर्ट घोटाळा, ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकर यांनी उघड केली होती. त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नांदगावकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा ठपका ठेवत तडीपार करण्यात आले आहे.

सर्वसामान्यांच्या समस्येला प्रसंगी धावून जाणाऱ्या, मुजोर व्यवस्थेला क्ष्मनसेदणका देणाऱ्या नितीन नांदगावकरांवरच खंडणीचे खोटे आरोप लावत सरकार 2 वर्ष तडीपार करण्यासाठी तत्पर पण अन्यायाला ‘वाचा’ फोडणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी सामान्य माणूस ठाम उभा आहे.

नितीन नांदगावकर यांनी फेसबुक व्हिडीओच्या माध्यमांतून ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या नोटिशीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया नांदगावकर यांनी फेसबुकवर दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले आहेत. महाराष्ट्र माझा आहे. कुठे कुठे मला तडीपार करणार? जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय? मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नांदगावकर यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर #isupportnitinnandgaonkar या नावाने मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सकडून नांदगावकर यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!