मनोराच्या ढासळत्या चिरांना आठवणींचा ओलावा … – निलेश मदाने  

 आमदार निवास या वास्तूची ओळख आमदारांच्या नावाने असली तरी स्वीय सहाय्यक आणि कार्यकर्ते, गरजू नोकरदार, मुंबईत नशिब अजमावण्यासाठी गावाकडून आलेले स्ट्रगलर्स, रुग्णांचे आप्त यांच्याच वास्तव्याने ही वास्तू ‘पुनीत’ झालेली असते. त्यामुळे अवघे २५ वर्षाचे वयोमान असूनही जराजर्जर मनोरा आमदार निवासचा चिरा परवा पुनर्बांधणीच्या निमित्ताने बुलडोझरच्या धक्क्याने ढासळला तेव्हा संघर्षकाळात आसरा देणाऱ्या या वास्तूच्या आठवणींनी माझ्यासह अनेकांच्या काळजात चर्र झाले.  मुंबईत शतकोत्तरी जन्मोत्सव साजरा करीत दिमाखदारपणे छाती काढून उभ्या असलेल्या ब्रिटिशकालीन वास्तू ‘मनोरा’च्या अल्पायुषीपणाबद्दल मनातल्या मनात काय म्हणत असतील कोण जाणे ! गोऱ्या साहेबाच्या काळात ‘पीडब्ल्युडी’ असते तर… असा एक प्रबंधविषय बी.ई.सिव्हिलसाठी किंवा आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी ठेवला जावा !
 अवघ्या महाराष्ट्राचं मुंबईत प्रतिरुप कोठे बघायचं असेल तर त्यासाठी आमदार निवास शिवाय दुसरं योग्य ठिकाण नाही. महाराष्ट्रात दर बारा मैलानंतर भाषा बदलते असं म्हणतात… आमदार निवासमध्ये ती दर मजल्यागणिक बदले. अधिवेशन काळात आपले ‘बॉस’ म्हणजे आमदार सोबत असल्याने नरमलेले ‘पीए’ नंतर मात्र श्री.गडकरी साहेब म्हणतात त्याप्रमाणे, ‘चहापेक्षा किटली गरम’चे चटके देत असतात. आमदार निवास व्यवस्थापक आणि तेथील उपहारगृहाचे संचालक यांचेसमवेत मला फक्त अर्धादिवस कामानिमित्त रहावे लागले होते. जेजे त्यावेळी बघितले, तेव्हापासून या दोन्ही संस्थांबद्दल माझ्या मनात असलेला आदर शतपटीने वाढला आहे.
 आमदार निवासातील प्रत्येक कक्ष म्हणजे लोकशिक्षणाचं मुक्त विद्यापीठ असतं. एका स्वीय सहायकाच्या अफलातून विनोदबुध्दीला दाद द्यावी असा हा किस्सा. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या. नवनिर्वाचित आमदारांची आमदार निवासात कक्ष मिळवण्यासाठी धावपळ सुरु होती. पराभूत आमदारांचे कक्ष जमा केले जात होते. नवीन मंत्र्यांचे नवीन पीए, ओएसडी नियुक्त केले जात होते, असा तो सारा गडबडीचा संक्रमणकाळ होता. अशातच एका पराभूत आमदाराच्या स्वीय सहायकाने स्वत:ची कॅबिनेट मंत्र्याचा पीए म्हणून ‘अंगीभूत गुणसामर्थ्या’वर वर्णी लावून घेतली, आमदार निवासात एक कक्षही मिळविला. याच दरम्यान काही कामानिमित्त त्याच्याच जिल्ह्यातील अन्य दोन पराभूत आमदारांचे ‘पीए’ मंत्रालयात त्याच्याकडे काही कामानिमित्त आले. तिघांचे रात्री साग्रसंगीत भोजन झाल्यावर पराभूत आमदारांच्या  दोन्ही ‘पीएं’नी रात्रीचा प्रवास करण्याऐवजी उद्या सकाळी निघू असे ठरविले. मुक्कामासाठी साहजिकच तिघे आमदार निवासात आले. आमदार निवासातील त्या कक्षात दोनच पलंग असल्याने तिघांपैकी एकाला जमिनीवर गादी टाकून झोपणे क्रमप्राप्त होते. तिघेही ‘तुल्यबळ’ असल्याने गप्पा लांबत गेल्या परंतु खाली गादी अंथरायला कोणी तयार नव्हते! तिघांपैकी आमदार निवासात कक्ष मिळविलेला जो कॅबिनेट मंत्र्याचा पीए होता तो दोघांना म्हणाला, हे पहा, मी तुमच्याप्रमाणे पराभूत आमदारांचा ‘पीए’ असलो तरी आता कॅबिनेट मंत्र्यांचा पीए झालो आहे. त्यामुळे एका पलंगावर तर मी झोपणार. आता उरला प्रश्न उरलेल्या पलंगावर तुमच्या दोहोंपैकी कोणी झोपायचे आणि जमिनीवर कोणी गादी टाकायची… तुमच्यापैकी ज्याचा आमदार जास्त मतांच्या फरकाने पराभूत झाला असेल तो खाली झोपेल… कमी मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या आमदाराचा पीए दुसऱ्या पलंगावर झोपेल… मतांची आकडेवारी ताजीच असल्याने जास्त फरकाने पराभूत आमदाराच्या ‘पीए’ने निमूटपणे कपाटातून गादी काढत जमिनीवर अंथरली ! आमदार निवासाच्या भिंती अशा अनेक गंमतीदार प्रसंगांच्या साक्षीदार आहेत. मनोरा आमदार निवासाचे अ,ब,क आणि ड असे चारही मनोरे आता एकामागोमाग एक याप्रमाणे जमिनदोस्त होत आहेत. परवा मुख्य स्वागत कक्षाची कमान, उपहारगृह पाडण्यात आले. याचठिकाणी सुसज्ज आणि प्रशस्त आमदार निवास साधारणता सन २०२३ पर्यंत बांधले जाईल.
 ‘मनोरा’शी सन २००० मध्ये जोडलं गेलेल माझं नातं अगदी आजपर्यंत कायम आहे आणि यापुढेही आठवणींच्या रुपानं कायम राहिल. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे १२/१५ जागा निघाल्या होत्या, ज्यासाठी विभागीय केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती. ती उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीचे पत्र हाती पडले. सकाळी १० वा. मुलाखत असल्याने आदल्यादिवशी मुंबईत येऊन थांबणे आवश्यक होते. त्यावेळी विधान परिषद सदस्य असलेले आ.प्रतापदादा सोनवणे (नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ) यांनी तात्काळ मनोरा डी-१४१ ची चावी आणि शुभेच्छा असे दोन्ही दिले. माहिती महासंचालक श्रीमती नीला सत्यनारायण आणि संचालक श्री.प्रल्हाद जाधव यांनी मुलाखत घेतली. मुलाखत छान दिली पण निवड काही झाली नाही. नेमके काय घडले होते याची माहिती मला नंतर मिळाली, त्याविषयी परत केव्हातरी लिहिल….. पण मुद्दा हा की, दीड दिवसासाठी मनोरा – डी १४१ मध्ये आल्यावर त्यानंतर याचठिकाणी पुढे ४ वर्ष तळ ठोकावा लागला तो “मुंबई तरुण भारत ” मधील पत्रकारितेच्या निमित्तानं ! आर्थिक आरिष्टयाखाली मी, माझे कुटुंब भरडून निघत असतांनाचा तो अतिशय कठीण काळ मनोरा आणि मित्रपरिवार यांच्यामुळे पचविता आला.
 एप्रिल २००१ मध्ये सर्व प्रमुख कामगार संघटनांनी जागतीकीकरणासंदर्भातील काही धोरणांविरोधात बंद पुकारला होता. शिवसेना बंदमध्ये उतरली होती. हा बंद कव्हर करण्यासाठी सकाळी माहिती विभागातर्फे मंत्रालयापासून गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. आदल्यारात्री डी – १४१ मध्ये श्री.महेश म्हात्रे (मुंबई तरुण भारत), श्री. प्रकाश कोळवणकर (दै.सकाळ) हे माझ्याकडे मुक्कामी आले होते. रात्री उशिरापर्यंत गप्पाष्टक रंगले. सकाळी आम्ही तिघे, श्री. उदय तानपाठक व अन्य १/२ पत्रकार मुंबईच्या विविध भागात फिरुन बंदचे वार्तांकन करीत होतो. एरव्ही वर्दळीने गजबजलेले मुंबईचे रस्ते, गल्ल्या बंदमुळे शांत होत्या. चौकाचौकात कडक बंदोबस्त, शस्त्रधारी पोलीस तैनात होते. पण उदय तानपाठक बरोबर असल्यामुळे आम्हाला मात्र बंद कव्हर करतांनाही यात्रेत फिरल्याचा भास होत होता ! सभोवती गर्दी असतांनाही आपला स्तंभ लिहितांना एकाग्रता साधण्याचे कसब याच डी-१४१ ने शिकविले. आमदारांचे काही कार्यकर्ते पुढे त्यांचे पीए बनलेले वा येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन शासकीय सेवेत आलेले या वास्तूने बघितले आहे. इतकेच नव्हे तर श्री.संजय सावकारे यांनी आधी पीए नंतर आमदार आणि मंत्रीपदही भुषविले. मॅजेस्टिक ही हेरिटेज वास्तू असल्याने त्याचा रुबाब मात्र मनोराच्या तुलनेत जरा जास्तच. शिवसेनेचा दसरा मेळावा दै.देशदूतसाठी कव्हर करण्यासाठी नाशिकहून मुंबईत आलो की मॅजेस्टीक मधील आ.बबनराव घोलप यांची रुम म्हणजे आमचे हक्काचे ठिकाण. तेव्हा दसरा मेळावा स.११ वा. सुरु व्हायचा. रात्री पान १ चे काम आटोपून नाशिकरोडचे प्रतिनिधी कम कट्टर शिवसैनिक श्री.दिगंबर शहाणे यांचेबरोबर मुंबईकडे प्रयाण.
सर्वश्री वसंतराव गिते – विनायक पांडे – देवकिसन पारिक ही मंडळी शिवसैनिकांसह बसने मुंबईकडे रात्री उशिरा निघायची. बसमध्ये दिगंबर व माझ्यासाठी दोन जागा कायम आरक्षित ! गाडीत होईल तेवढीच झोप. मॅजेस्टीकला स्नान, न्याहारी करुन आम्ही स. ११ च्या आत शिवतीर्थावर हजर. महाराष्ट्राला श्री.देवेंद्रजी फडणवीसांच्या रुपाने तरुण मुख्यमंत्री देणारे मॅजेस्टीकही आता रिकामे करण्यात आले असून तेही पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत आहे.
‘मनोरा’ डी – १४१ च्या खाली डी –  ९१ मध्ये श्री.वसंत फडके (तेव्हाचे भाजपा विधीमंडळ कार्यालय सचिव) आणि श्री.रवी अनासपुरे (मा.गोपीनाथजी मुंडे साहेबांचे तेव्हाचे स्वीय सहाय्यक) दीर्घकाळ वास्तव्यास होते. आमच्या रुमवर जास्त गर्दी असेल तेव्हा हे दोघे मला त्यांच्या रुममध्ये सामावून घ्यायचे. वसंतरावांच्या सदाशीवपेठी खाक्याची तेव्हापासून माझ्यावर दहशत आहे. प्रदेश कार्यालयात सकाळी लवकर बैठक असल्याचे निमित्त साधून श्री.केशव उपाध्ये (सध्याचे प्रदेश भाजपा प्रवक्ते) डी – १४१ मध्ये मुक्कामी होते. ज्येष्ठ भाजपा नेते श्री.अण्णा डांगे आणि डॉ.दौलतराव आहेर पक्षावर रुसले, रागावले तेव्हा याच ‘मनोरा’ त त्यांची समजूत काढण्यात आली. मुंडे साहेब मनोरात पोहोचेपर्यंत  श्री.अण्णा डांगे यांच्याशी श्री.गिरीश बापट कितीतरी वेळ चर्चा करीत होते. गत २०-२२ वर्षात अशा अनेक राजकीय खलबते आणि घडामोडींची ही वास्तू साक्ष ठरली आहे. विलासराव देशमुख सरकार विरोधात विरोधीपक्षनेते श्री.नारायणराव राणे यांनी सन २००२ मध्ये आणलेला अविश्वास ठराव अनेक घटनांनी गाजला. त्यावेळी मी आणि (कै.)श्री.प्रकाश देशमुख (दै.सकाळ) यांनी ‘मनोरा’ येथे येत कॉपी लिहिली होती. विधान परिषद सदस्य होण्याअगोदर डॉ.वसंतराव पवार (राष्ट्रवादी) मविप्रच्या कामासंदर्भात डी – १४१ वर मुक्कामी होते. मी दै.देशदूतमध्ये असतांनापासूनचा परिचय असल्याने आणि मूळचे तेही पंचवटीकर असल्याने रात्री उशीरापर्यंत खूप गप्पा झाल्या. श्री.मनोज भोयर (टी.व्ही पत्रकार), श्री.संतोषकुमार लोळगे (तेव्हाचे गृहराज्यमंत्री श्री.कृपाशंकर सिंह यांचे पीए), श्री.सचिनभाऊ अहिर यांच्या रुममधील सख्खे शेजारी श्री लालासाहेब लोमटे, मंत्री श्री.दिवाकरजी रावते यांचे स्वीय सहाय्यक श्री.अशोक गव्हाणे, उपहारगृहाचे श्री.नवीनभाई शेट्टी, हरिष खेडेकर, संदिप, उत्तम आणि नाशिकहून येणारे अनेक कार्यकर्ते तेव्हा मित्ररुपाने जोडले गेले, जे आजतागायत कायम आहेत. ‘रेड टेप’ कार श्री.अभिजीत कुलकर्णी लोकसत्ता, नाशिकमध्ये असतांना मुंबईतील प्रशिक्षण काळात महिनाभरासाठी डी – १४१, मनोरा मित्रमंडळाचेच सदस्य होते. 
मुंबई-नाशिक साप्ताहिक रेल्वेप्रवासात मुंबईत कोठे रहायला, असा प्रश्न मला हमखास विचारला जायचा. मी थोडं, मोठ्यानंच सांगायचो ‘नरिमन पॉईंट’ला ! डब्यातले सहप्रवासी चमकून माझ्याकडे बघायचे. मग मी म्हणायचो, ‘मनोरा आमदार निवासा’त… त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मी निरखून ठेवायचो. विधानभवनाच्या सेवेत आल्यावरही ‘मनोरा’ मध्ये मुक्कामाचे अनेक प्रसंग आले. २६ जुलै, २००५ चे भीषण तांडव लक्षात घेता अतीवृष्टीचा इशारा, लोकल बंद होण्याची चिन्हे दिसताच माझे मुक्काम पोस्ट मनोरा असते. विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक पावसाळी अधिवेशनात होत असते. निवडणूक डयुटी लागल्यावर सकाळी ७ वाजताच रिपोर्टिंग असते. त्यावेळी सहसचिव (कै.) श्री. उमेश खडकीकर यांचे समवेत मी ‘मनोरा’तच मुक्कामी असायचो.
दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णास विशेषत: त्यासोबतच्या नातेवाईकांना आमदार निवास हा फार मोठा आसरा असतो. गावाकडील प्रत्येकाचा मुंबईत नातेवाईक असेलच असे नाही, असला तरी त्याच्याकडे अशांची व्यवस्था होऊ शकतेच असे नाही, अशा अनेक कुटुंबांना आमदार महोदयांच्या पत्रामुळे या वास्तूने मदतीचा दिलेला हात लक्षात घेतला की डोळे पाणावतात. ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या सर्वांनाच समुद्रदर्शनाचं आकर्षण असतं. मनोराच्या स्थान वैशिष्टयामुळे अन्य आमदार निवासांपेक्षा येथून लिफ्टने वर येताच सर्वांना समुद्रदर्शन घडते. हवेशीर पॅसेजमुळे खोल्यांबाहेरही अनेकजण झोपू शकतात.
मंत्रालयाप्रमाणे आमदार निवासातही काही ‘सिध्दपुरुष’ सर्वसत्ताकाळात सुखेनैव वावरत असतात. यांना कोणतेही काम सांगा, आम्ही ते करुन आणतो असेच हे सांगणार ! नाही म्हणून कशाला म्हणणार नाही. चैतन्यपेयाच्या आचमनानंतर अशा सिध्दपुरुषांचा सायंकालीन अवतार आणि आवेश बघण्यासारखा असतो. नवख्या कार्यकर्त्याला पहिल्या आचमनात आमदारकीचं तिकिट देऊ करणारे हे महाभाग तिस-या आचमनापर्यंत त्याला थेट मंत्रीपदावर बसविण्याची पतंगबाजी याच वास्तूच्या भिंतींनी अनेकदा अनुभवली आहे… “पैसा तुमचा, अनुभव आमचा” असे हे ‘सिध्दपुरुष’ अगोदर सांगतात पण कार्यकर्त्याला कळते तेव्हा पैसा त्यांचा झालेला असतो आणि कार्यकर्त्याकडे अनुभव मात्र फक्त उरलेला असतो !  वास्तू एक, आठवणी अनेक म्हणतात त्याप्रमाणे मनोरा अशा अनेक आठवणी मागे ठेवून थोडया काळासाठी आपल्याला बाय बाय करीत आहे. सुसज्ज आणि प्रशस्त अशा “मनोरा नवीन आमदार निवास (२)” ची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र, माझ्यासह अनेकांना आयुष्यात ‘उभं करणारे’ हे चार मनोरे ‘आडवे होतांना’ बघणं वेदनादायी आहे. या वेदनेवरील फुंकर म्हणजेच या वास्तूसंदर्भात जागविलेल्या या आठवणी….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!