मराठी भाषा ही शक्ती आणि भक्तीची भाषा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिहास लाभला आहे. मराठी भाषेचे साहित्य, संस्कृती आणि इतिहास हा खुप मोठा आहे. मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने शक्ती आणि भक्तीची भाषा असून आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मराठी शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन विधेयक मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मांडले. हे विधेयक विधान परिषदेत एकमताने संमत करण्यात आले. या विधेयकाच्या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री बोलत होते. मराठी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा असून आज्ञापत्र देणारी ही मराठी भाषा आहे. समाज म्हणजे काय, जगायचं कसे हे मराठी भाषेने शिकविले. इंग्रजांना वठणीवर आणणारी मराठी भाषा होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे ठणकावून मराठी भाषेतूनच लोकमान्य टिळकांनी सांगितले. देशाची राज्यघटना लिहिलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे महात्मा फुले हेही मराठी होते हीच मराठीची शक्ती असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कुठल्याही भाषेचा दुःस्वास करावा असे, शिकविले नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या आपण जपल्या पाहिजेत, आत्मसात केल्या पाहिजे. मराठीची संस्कृती आपण जपली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य दिवाकर रावते, शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी भाग घेतला.
विधानपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठी विषयक भाषणातील ठळक मुद्दे
भाषा जपायची म्हणजे काय तर आपली संस्कृती जतन करणे होय. आजही मातोश्रीच्या अंगणात तुळस आहे आणि तिच्यासमोर दररोज दिवा लावला जातो.
मराठी ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे मात्र आता ती सक्तीची करण्याची गरज आहे. ही गोष्ट तशी चांगली नाही. पण पुढच्या पिढीला या भाषेचे सामर्थ्य कळायला हवे, यासाठी प्रयत्न करावे लागतील त्यासाठी हा कायदा आणावा लागतोय.
आता जातीवरच्या ओव्या गेल्या आणि जातीवाचक शिव्या आल्या.
मराठी अमृताहून गोड मानतो. म्हणजे आपण अन्य भाषांचा दुस्वास करतो असे नाही. अन्य भाषा या शिकायलाच हव्या असा आग्रह आहे. कित्येकांनी टीका केली की यांची मुलं इंग्रजी शाळांत शिकतात म्हणून. पण ती घरीदारी उत्कृष्ट मराठी बोलतात. मराठी ही आपली संस्कृती आहे. ती ते जपतातही.
मला आजोबांचा प्रबोधनकारांचा वारसा आहे. त्यांचे आणि माझे वडिलांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान मोठे होते. हे सर्व जाणतातच. या दोघांची वैशिष्ट्यपूर्ण  मराठी भाषा होती. प्र. के. अत्र्यांची एक भाषा होती. इंग्रजांना आव्हान देणारे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हे ठणकावून विचाणाऱ्या लोकमान्य टिळकांची भाषाही मराठी होती. देशाची घटना लिहीणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी होते ,अशी ही सामर्थ्यशाली मराठी आहे.
या भाषेसाठी मोलाचे प्रयत्न करण्याची संधी मिळाली आहे, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे विधेयक दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांनी मांडावे अशी भूमिका घेतली. कारण मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या  बाळासाहेब ठाकरे यांचे ते खंदे वीर असे सहकारी आहेत. त्यांनी हे विधेयक मांडावे आणि योगायोगाने मी मुख्यमंत्री म्हणून उपस्थित आहे हे माझे भाग्य समजतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!